‘जातीयवाद्यां’ना रोखण्यासाठी..

    दिनांक  22-Feb-2019   


 


राष्ट्रवादी काँग्रेस नामक (नामचीन?) एका पक्षाचे सर्वेसर्वा असलेले, केंद्रीय कृषिमंत्री आणि संरक्षणमंत्री, लोकसभेचे विरोधी पक्षनेते, महाराष्ट्राचे तीनवेळा मुख्यमंत्री अशी विविध महत्त्वाची पदे सांभाळलेले आणि १९९१ पासून सातत्याने पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असणारे (किंवा आहेत असे भासवणारे) ज्येष्ठ नेते शरद पवार आज वयाच्या ७८व्या वर्षी नव्या दमाने लोकसभेची निवडणूक लढण्यास सज्ज झाले आहेत. शरच्चंद्र पवार साहेबांचे वय ७८ असले तरी त्यांची बुद्धी एखाद्या तरुणाला लाजवेल, अशी आहे हे उभा महाराष्ट्र जाणतोच! या तल्लख बुद्धीसोबतच स्वाभाविकरित्या त्यांची स्मरणशक्तीही तगडी आहे. तथापि, दोनेक दिवसांपूर्वी एका सभेत बोलताना पवारसाहेबांनी जे वक्तव्य केलं, ते पाहता साहेबांच्या स्मरणशक्तीत अलीकडे अर्धा-पाऊण टक्क्याची घट झाली आहे की काय, अशी शंका येते. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे पक्ष सत्तेसाठी एकत्र आले, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. शरद पवारांनी काय टीका केली, यापेक्षा ही टीका शरद पवारांनी केली, हे जास्त महत्त्वाचं आहे. शरद पवार असं काहीतरी बोलून जातात आणि मग इच्छा नसताना उगाचच काही लोक इतिहासाची पानं चाळू लागतात. आता ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ या काँग्रेसच्या उदरातून जन्मलेल्या गोंडस अपत्याचंच उदाहरण घ्या. सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा घेऊन पवारांनी काँग्रेस सोडून ‘राष्ट्रवादी’ स्थापन केली. त्यानंतर काही दिवसांतच त्याच विदेशी सोनिया गांधींच्या काँग्रेस पक्षाशी साहेबांच्या या राष्ट्रवादीने आघाडी केली. ही आघाडी थेट २०१४च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत टिकली. नंतर विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर ही आघाडी तुटली, परंतु भाजपच्या तडाख्यांमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पुन्हा एकत्र यावं लागलं. त्यामुळे महाराष्ट्रात १९९९ पासून २०१४ पर्यंत सलग १५ वर्षं आणि केंद्रात २००४ पासून २०१४ पर्यंत सलग १० वर्षं विदेशी सोनियांच्या काँग्रेससोबत पवारांच्या राष्ट्रवादीने आघाडी केली आणि दोन्हीकडे मंत्रीपदं उपभोगली. ही आघाडी झाली ती ‘जातीयवादी शक्तीं’ना रोखण्यासाठी आणि भाजप-शिवसेनेची युती मात्र सत्तेसाठी! आता काय म्हणावे पवारांच्या या दुटप्पीपणाला. असो. कदाचित शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे सेना-भाजप युती होणार नाही आणि त्याचा फायदा आपल्याला पदरात पाडता येईल, असा साहेबांचा यदाकदाचित (गैर)समज झालाही असावा.

 

हा लगाम नेमका कुणावर?

 

यावेळेसही काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे आणि ती सत्तेसाठी नसून जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी असेल, यात काही शंकाच नाही. तथापि, पवारसाहेबांच्या या धर्मनिरपेक्ष, पुरोगामी चळवळीच्या सुरुवातीलाच काही अपशकुन घडू लागल्याने ही चळवळ आपल्या इच्छित स्थळी कशी पोहोचणार, असा प्रश्न पडतो. आता पवार घराण्यातील अजितदादा पवार, त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढण्याचं जवळपास निश्चित झालं होतं, असं म्हणतात. घराण्यातील एका गटात (?) त्यामुळे भलतंच उत्साहाचं वातावरण होतं, अशीही माहिती मिळत होती. परंतु, अचानक काय झालं कुणास ठाऊक, थोरल्या साहेबांनी यातलं काहीच होणार नसून “मी आणि सुप्रियाच निवडणूक लढणार” असं जाहीर करून टाकलं. त्यामुळे बिचारे अजितदादा नेहमीप्रमाणे बारामतीतून विधानसभा लढतील, असंच दिसतं. पार्थ पवारांना लोकसभा नाहीतर विधानसभा मिळणार का, याबाबतही काही शाश्वती नाही. पवार घराण्यातील चार-चार जण लोकसभा निवडणूक लढणार, या वृत्तामुळे कार्यकर्त्यांमध्ये भलताच उत्साह होता. यामुळे राष्ट्रवादीच्या खासदार संख्येत आणखी दोघांची तरी भर पडेल, असंही काहींना वाटत होतं. परंतु, शरद पवारांनी या सगळ्यांच्याच उत्साहाला एका वाक्याने लगाम घालून ठेवला. आता हा ‘लगाम’ कार्यकर्त्यांसाठी की आणखी कुणासाठी, हे मात्र पवारसाहेबांनाच ठाऊक! शरद पवारांच्या या घोषणेमुळे राष्ट्रवादीतील (काही विशिष्ट?) कार्यकर्त्यांचा मूड ‘ऑफ’ झाल्याचं जाणवलं. त्यातच पुन्हा अजितदादांना महाआघाडीत हव्या असलेल्या मनसेलाही साहेबांनी प्रवेश नाकारला. राज ठाकरे एकेकाळी अजित पवारांबद्दल जाहीर सभांतून काय काय बोलत होते, हे युट्यूबवर भाषणं पाहिली तरी लक्षात येईल. तरीही, अजितदादांना मनसेची साथ हवी होती. एका पुतण्याला दुसऱ्या पुतण्याची साथ कशासाठी हवी होती, असाही प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातो आहे. तेवढ्यात दुसरीकडे माढा मतदारसंघातच पवारसाहेबांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. आता हे बाचाबाची करणारे दोन गट कोणते, कोणाचे निकटवर्तीय, हा भाग बाजूला ठेऊ. तसंही, या साऱ्या घटनांचा परस्परांशी काहीच संबंध नाही. तरीदेखील, एक सावधगिरीचा भाग म्हणून आगामी घटनांकडे बारीक लक्ष ठेवलेलं बरं!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat