तुमने अपुनको बहुत मारा. अपुनने तुमको एकही मारा. लेकिन सॉलिड मारा,” हा ‘अमर, अकबर, अँथनी’ या हिंदी चित्रपटातला संवाद इथे आठवायचे कारण म्हणजे, आपला महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष स्थापन करून उणेपुरे दोन वर्षे उलटत नाही, तोच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 आमदार विधानसभेत दाखल झाले होते.
निवडणूक आटोपताच पत्रकारांसोबत चर्चा करताना, राज ठाकरे यांनी हा डायलॉग उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला होता. या गोष्टीला आता 16 वर्षांचा काळ लोटला असून, पुलाखालूनही बरेच पाणी वाहून गेले आहे. परंतु, आता मराठी माणसाच्या हिताचे कारण पुढे करत, या दोन्ही बंधूंना एकत्र आणण्याच्या शिळ्या कढीला उत आणला जात आहे. त्यासाठी वरळी डोम येथे नुकताच ‘विजयोत्सव’ असे गोंडस नाव देत, मोठा इव्हेंटही पार पाडला गेला. मात्र, एक दिवस सरत नाही, तोच उबाठा गटासोबतच्या युतीबाबत कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांनी एकही अवाक्षर न काढण्याचा सूचनावजा आदेश राज यांनी जारी केला. अगदी कालपरवा नाशिकच्या इगतपुरीत मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्यातही राज ठाकरे यांनी हीच री ओढली. त्यातच मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येऊन बरेच दिवस लोटूनही एकत्र येण्याबाबत अद्याप कोणतीही घोषणा होऊ शकली नाही.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पक्षाच्या शिबिरासाठी इगतपुरी येथे आले. तेथे दोन भावांच्या एकत्र येण्याविषयी अनौपचारिक चर्चा करण्याचेही त्यांनी टाळले. ‘मराठीच्या समर्थनार्थ व्यासपीठावर आम्ही एकत्र आलो होतो. मुंबईत झालेला मेळावा फक्त मराठी भाषेसाठी आणि जनतेच्या भावना व्यक्त करण्यासाठीच होता,’ अशी मखलाशीही त्यांनी केली. मुळातच राज ठाकरे इगतपुरीला फक्त एक दिवसासाठी आले. दि. 14 जुलै रोजी दुपारी आले आणि दुसर्या दिवशी लगेच मुंबईकडे कुच करते झाले. त्यातही इगतपुरीचे ‘कार्यकर्ता शिबीर’ यशस्वी करण्यासाठी राबलेल्या नाशिकच्या पदाधिकार्यांनाच प्रवेश नाकारला गेला. त्यामुळे नाशिकच्या शिबिराबाबत सगळ्यांचीच उत्कंठा ताणली गेली; पण नाशिकमधील अवघ्या चारजणांना प्रवेश दिला गेल्याने, बाकीच्यांना रित्या हातीच परतावे लागले. त्यामुळे आता आगामी मनपा निवडणुकीत पक्षाची भूमिका काय? या संभ्रमातच कार्यकर्ते पडले आहेत.
मनसे उरली नावाला
कधीकाळी महापौर आणि तीन-तीन आमदार शहरात असलेल्या मनसेला, नाशिक शहरात चांगलीच उतरती कळा लागली आहे. मागील मनपा निवडणुकीत निवडून आलेल्या पाच नगरसेवकांपैकी चारजणांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली. उरलेला एक नगरसेवक कधी दुसर्या पक्षात उडी मारेल याची शाश्वतीच नाही. राहता राहिला प्रश्न विधानसभा निवडणुकीत भाजपमधून आलेले दिनकर पाटील यांचा, तर ते एकट्याच्या बळावर दोन आकडी नगरसेवक निवडून आणू शकत नाहीत. त्यामुळे कोणाच्या नेतृत्वाखाली निवडणुकांना सामोरे जायचे, या संभ्रमात कार्यकर्ते आणि पदाधिकारीही आहेत. परिणामी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी, अनेकजण पक्ष सोडत आहेत. तत्पूर्वी राज यांनी ‘एकदा नाशिकची सत्ता हातात द्याच, मग बघा कसे सर्वांना सुतासारखे सरळ करतो. नाही नाशिकचा विकास केला, तर पुन्हा मत मागायला येणार नाही,’ अशी भावनिक साद नाशिककरांना घातली.
नाशिककर राज यांच्या बोलण्याला भुलले आणि मनपाच्या चाव्या त्यांच्या हवाली केल्या. मात्र, पर्यटनाला आल्याप्रमाणे राज ठाकरे नाशिकमध्ये येत राहिले आणि नाशिकचा विकास हवेतच विरला. तरीही मनसेच्या पदरात नाशिककरांनी मतांचे भरभरून दान टाकत, तीन आमदारही विधानसभेत धाडले. मात्र, या तिघांपैकी एक वसंत गीते विधानसभेत अबू आझमी यांच्यासोबत झालेल्या राड्याने प्रकाशझोतात आले, तर इतर दोघांनी पाच वर्षे फक्त आमदारकी उपभोगली. मग, नाशिककर जनताही चांगलीच खमकी निघाली. पुढील सर्व निवडणुकीत जनतेने राज ठाकरे आणि पर्यायाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सपशेल नाकारले. सत्तेचे पाच वर्षे सोडले, तर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लागलेली गळती अजूनही रोखण्यात पक्ष नेतृत्वाला यश आलेले नाही. आता नाशिक महापालिका निवडणुकीचे पडघम वाजण्याआधीच आपला टिकाव लागण्याची शक्यता धूसर झाल्याचे दिसू लागताच, चार नगरसेवकांनी दुसर्या पक्षाची वाट धरली. आता निवडणुका कोणाच्या बळावर लढवायच्या आणि मैदान कसे मारायचे अशा द्विधा मनस्थितीत कार्यकर्ते सापडले असून, पुढील काळात पक्षाला आणखी गळती लागली, तर नवल वाटायला नको.