ठाकरेंचे पलायन

    18-Jul-2025   
Total Views | 58

मन शुद्ध असेल तर देव पावतो, असे म्हणतात. पण, मनात पाप दडलेले असेल, तर ना देव पावतो, ना जनता! आदित्य ठाकरे यांच्या कालच्या विधानसभेतील वर्तनातून हेच दिसून आले. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांना उत्तर देण्याऐवजी त्यांनी सभागृहातून पळ करणे पसंत केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत ठाकरे गटाच्या महापालिकेतील कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. मराठीच्या नावे गळे काढणार्‍यांनी मिठी नदीच्या गाळ सफाईचे काम मराठी माणसाला का दिले नाही? असा थेट सवाल त्यांनी केला. "दिनोने तोंड उघडले तर अनेकांचा ‘मोरया’ होईल,” असे म्हणत त्यांनी गुप्त सौद्यांकडेही इशारा केला. गिरणी कामगारांचे प्रश्न, पत्राचाळ घोटाळा, खिचडी आणि बॉडी बॅग कंत्राटातील गैरव्यवहारांवरही शिंदेंनी बोट ठेवले.

या सगळ्या आरोपांचे पुराव्यांसह खंडन करणे आणि एकनाथ शिंदेंना कठोर भाषेत प्रत्युत्तर देण्याची संधी आदित्य ठाकरेंकडे होती. कारण, त्यांनीच ‘नियम २९३’ अंतर्गत प्रस्ताव मांडला असल्याने, त्यांना ‘राईट टू रिप्लाय’चा अधिकार होता. ते या संधीचे सोने करतील, अशी अपेक्षा असताना, आदित्य ठाकरेंनी सभागृहातून पळ काढला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वारंवार त्यांचे नाव घेऊन बोलण्याची संधी देऊ केली. पण, भास्कर जाधव यांच्या साथीने त्यांनी गोंधळ घातला. हातवारे करत, सत्ताधारी आमदारांना डिवचत त्यांनी वातावरण तापवले. शेवटी, कामकाज तहकूब करावे लागले.

सभागृहातून बाहेर पडताच आदित्य ठाकरे माध्यमांसमोर आक्रमक झाले. ‘गद्दार, एहसान फरामोश, नमकहराम, निर्लज्ज, बिनलाजी’, अशी दुषणे त्यांनी शिंदेंना लगावली. ‘अध्यक्ष दुतोंडी आहेत, खिचडी कंत्राटवाला शिंदेंच्याच पक्षात आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली. पण, ही टीका सभागृहात केली असती, तर ती शासकीय नोंदीत गेली असती. वास्तवात ठाकरे गटाकडे ना पुरावे आहेत, ना शिंदेंच्या आरोपांना सडेतोड उत्तरे. त्यामुळे प्रत्यक्ष चर्चेला सामोरे जाण्याऐवजी आदित्य ठाकरेंनी राजकीय अभिनय केला. सभागृहात प्रश्न टाळून आणि बाहेर अशी भावनिक आवाहने करून जनतेला आणखी किती काळ फसवणार? जनता आता जागी झाली आहे. तुम्ही केलेल्या पापांची शिक्षा ती येत्या निवडणुकीत देईल, हे निश्चित!

पवारांचे कुटुंबप्रेम

राष्ट्रवादी शरद पवार गटात नुकताच झालेला नेतृत्वबदल हा पूर्वनियोजित होता की केवळ कौटुंबिक राजकारणाचा भाग, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा जोरात सुरू आहे. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या काही तासांतच सुप्रिया सुळे यांनी समाजमाध्यमांवर रोहित पवार यांच्या सरचिटणीसपदी नियुक्तीची घोषणा केली. ही घाई इतकी होती की, जयंत पाटील कधी खुर्ची सोडतील, याची आत्या आणि पुतण्या जणू वाटच पाहत बसले होते की काय, अशी शंका यावी. जयंत पाटील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते. संकटकाळी असो वा निवडणुकीच्या रणधुमाळीत, त्यांनी नेहमीच पक्षाला खंबीरपणे सांभाळले. लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशात त्यांचा वाटा मोठा होता. ‘जयंतराव किंगमेकर’ असे बॅनर पक्ष कार्यालयाबाहेर लागले, तेव्हा त्यांची ताकद आणि लोकप्रियता अधोरेखित झाली. मात्र, ही प्रसिद्धी पक्षातील काही मंडळींना खटकली आणि तेव्हापासून जयंत पाटलांचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न सुरू झाले.

जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर रोहित पवार यांना सरचिटणीसपद, सर्व ‘फ्रंटल सेल्स’चे नेतृत्व सोपवण्यात आले. रोहित पवार तरुण, उत्साही आणि तंत्रस्नेही नेते आहेत, यात शंका नाही. पण, कामाचा आवाका विचारात न घेता एवढी मोठी जबाबदारी त्यांना का मिळाली, याचे उत्तर त्यांच्या ‘पवार’ या आडनावात दडले आहे. यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांना गटनेता आणि रोहित पाटील यांना प्रतोद नेमले गेल्याने रोहित पवार नाराज होते. त्यावेळी जयंत पाटील यांनी त्यांना फारसे पुढे येऊ दिले नव्हते, असे म्हणतात. आता जयंतराव बाजूला झाल्यावर रोहित पवार थेट केंद्रस्थानी आले. याचाच अर्थ शरद पवार यांनी नातवासाठी जयंत पाटलांचा बळी दिला. पक्षात नेतृत्व हे कामगिरीवर आधारित असावे, केवळ आडनावावर नाही. अनेक वर्षे पक्षासाठी काम करणार्‍या नेत्यांना बाजूला सारून पवार कुटुंबातील सदस्यांना पुढे आणण्याचा हा मार्ग आता नित्याचा झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट सध्या राजकीय पक्ष आहे की कौटुंबिक कंपनी, हा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांनी आता विचारायला हवा, नाहीतर उद्या पक्षाची अशी अवस्था होईल की, ज्यांचे आडनाव ‘पवार’ असेल त्यांनाच पदे मिळतील आणि इतरांना फक्त सतरंज्या उचलाव्या लागतील!

सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121