लोकसहभाग हाच निसर्ग संवर्धनाचा एकमेव मार्ग !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2019   
Total Views |महाराष्ट्रातल्या पश्चिम घाटाचा उत्तर भाग हा पर्यावरणदृष्ट्या विशेष महत्त्वाचा प्रदेश. प्रचंड पाऊस आणि तीव्र उन्हाळा, सदाहरित - पानझडी जंगल, गवताळ प्रदेश आणि काटेरी - झुडूपी वन, डोंगर उतारावर वास करणारा वनवासी समाज आणि संस्कृती, शेती-पशुपालनाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धती असा विविधतेने नटलेला हा परिसर. या परिसरात गेली ८ ते १० वर्षे उत्तमप्रकारे पर्यावरणविषयक काम करणाऱ्या जुई पेठे यांची विशेष मुलाखत...

 
 

ज्या परिसरात तुम्ही पर्यावरणविषयक काम करत आहात, त्या प्रदेशाची भौगोलिक आणि पर्यावरणीय वैशिष्ट्ये, तिथले समाजजीवन याबद्दल थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल.

- मी नाशिक इथे लहानपणापासून स्थायिक आहे आणि नाशिक, अहमदनगर, ठाणे, नंदुरबार, धुळे या परिसरात म्हणजेच पश्चिम घाटाच्या उत्तर भागात पर्यावरणविषयक काम गेली आठ-दहा वर्षे करत आहे. पश्चिमेकडे कोकण किनारपट्टी आणि पूर्वेकडे दख्खनचे पठार याच्यामध्ये हा भाग येतो. त्यामुळे पश्चिमेकडे प्रचंड पाऊस, थोडे पूर्वेकडे आल्यानंतर गवताळ प्रदेश आणि आणखी पूर्वेकडे गेल्यावर पर्जन्य छायेचा, अत्यंत कमी पावसाचा प्रदेश असा या परिसराचा भूगोल आहे. पश्चिमेकडे साडेतीन हजार मिमीपर्यंत पाऊस आणि पूर्वेकडे ४०० मिमीपर्यंत पाऊस एवढा फरक असल्यामुळे हा परिसर पर्यावरणदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहे. निम्न सदाहरित वने, पानझडी वने, गवताळप्रदेश, काटेरी-झुडूपी जंगल असे सगळे प्रकार या परिसरात आढळतात. गोदावरी, वैतरणा, गिरणा, प्रवरा इ. इथल्या परिसराला पाणीपुरवठा करणार्‍या मुख्य नद्या आहेत. या परिसरातल्या डोंगराळ भागांमध्ये महादेव कोळी, ठाकर, वारली, कोकणी, कातकरी इ. वनवासी समाज वसलेले आहेत. या समाजाची जीवनशैली, शेतीच्या पद्धती हे सगळं येथील निसर्गाशी समतोल राखणारे आहे. अजूनही काही भागात विशेषतः कळसुबाई - हरिश्चंद्रगड परिसरात स्थलांतरित शेती, ज्याला ’कुमरी’ म्हणतात, ती केली जाते. नागली, वरई, हुलगा, खुरसणी ही पिके ठरलेल्या क्रमाने घेणे, त्यानंतर एक वर्ष जमीन पडिक ठेवणे अशा पारंपरिक शेतीच्या पद्धती शेतकर्‍यांनी जपलेल्या आढळतात. ज्या शास्त्रीयदृष्ट्याही योग्य आणि शाश्वत शेतीची हमी देणार्‍या आहेत. 

कळसुबाई - हरिश्चंद्रगड परिसरात महादेव कोळी समाज आढळतो. जो पिढ्यान्पिढ्या पशुपालक आहे. दुधापासून खवा तयार करण्याचे पारंपरिक तंत्र त्यांच्याकडे आहे. ’राखणरान’ ही या समाजाची एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. ज्यात लोकांनी गुरांना वर्षभर भरपूर चारा उपलब्ध होईल अशा पद्धतीने चराऊ क्षेत्राचे व्यवस्थापन केले आहे. जवळजवळ १०० ते १२५ देवराई या परिसरात आहेत. ज्या माध्यमातून सुमारे दीड हजार हेक्टर जंगल लोकांकडून स्वयंस्फूर्तीने राखले गेले आहे. या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर गावरान बियाणी आहेत. शेतीच्या कामांसाठी उपयोगी पडणारी ’डांगी’ नावाची गुरांची देशी जात इथल्या महादेव कोळी समाजाने जोपासली आहे.

 

 
 पश्चिम घाट 
 

या परिसरात निसर्गाच्या र्हासाची सद्यस्थिती काय आहे ? भविष्यात कोणकोणते धोके संभवतात?

- ब्रिटिशकाळापासून कोळशासाठी या भागात भरपूर प्रमाणात वृक्षतोड होत आलेली आहे. हा भाग मुंबईच्या जवळ असल्याने शहरीकरण हा इथल्या निसर्गासाठी मोठा धोका आहे. मुंबईतल्या लोकांकडून ’सेकंडहोम’ अथवा ’फार्महाऊस’साठी मोठ्या प्रमाणावर येथील जमिनींचे प्लॉट्स विकत घेतले जातात. त्यांना कुंपण घालून तसेच ठेवले जातात. त्यामुळे स्थानिक लोकांना गुरे कुठे चारायची याची अडचण होऊन बसते. ’कर्टुला’सारख्या रानभाज्या येथील रानात आढळतात. ज्या स्थानिक लोकांच्या आहाराचा मोठा भाग आहे. त्याही लोकांना अनुपलब्ध होतात. शहरीकरणामुळे जमिनीचा वापर झपाट्याने बदलतोय. गवताळ प्रदेशात अतिदुर्मीळ माळढोकसारखे पक्षी दिसायचे. परंतु, शेती पद्धतीतील बदल व जमीन वापरातील बदलांमुळे आता ते या भागांमधून नामशेष झाले. इतर जैवविविधता धोक्यात आली आहे. औद्योगिकरणाला प्रोत्साहन द्यायला हरकत काहीच नाही. परंतु, त्याआधी त्या परिसराचा काळजीपूर्वक अभ्यास झाला पाहिजे. तो आपल्याकडे होत नाही. वेड्यासारखे वाढणारे पर्यटन हादेखील येथील निसर्गाला धोका आहे. निसर्गही उपभोगाची वस्तू मानून येणार्‍या पर्यटकांच्या झुंडी जैवविविधतेला मारक ठरतात. ठाणे -नाशिकच्या सीमेवर असणार्‍या ’अशोका’ धबधब्यावर सुरू झालेले रॅपलिंग, तिथे मोठ्या आवाजात लावले जाणारे ’संगीत’, काजवा महोत्सव, खेकडे महोत्सव यासगळ्याचा निसर्गावर किती विपरीत परिणाम होतो आहे, याचा कुठलाच विचार होत नाही. त्यामुळे येणार्‍या काळात निसर्गाचे भरपूर नुकसान होऊन आता निसर्गाकडून मिळणारे आर्थिक लाभ भविष्यात मिळणार नाहीत हे निश्चित.

 

 
 गवताळ प्रदेश 
 

पर्यावरणाशी संबंधित अभ्यासात्मक आणि संवर्धनात्मक पातळीवर कोणत्या प्रकारची कामे आपण आजवर केली आहेत / करत आहात ?

- माझ्या कामाचा बहुतांश भाग हा अभ्यासात्मक राहिलेला आहे. कारण, या परिसराची जैवविविधता, नैसर्गिक आणि सामाजिक पर्यावरण यांचा सखोल शास्त्रीय अभ्यास आत्तापर्यंत फारसा झालेला नाही. सुरुवातीला मी अंजनेरी पर्वतावरच्या वनस्पतीवैविध्याचा अभ्यास केला. ज्यात सुमारे साडेतीनशे वनस्पतींची नोंद झाली. ’सिरोपेजिया अंजनेरिका’ ही अंजनेरी पर्वतावरील प्रदेशनिष्ठ (जगात इतरत्र कुठेही न आढळणारी) वनस्पती व संभाव्य धोक्यांचा अभ्यास यातून करण्याची संधी मिळाली. या वनस्पतीच्या संवर्धनासाठी वन खाते आणि स्थानिक लोक यांच्या सहभागातून काम करायला सुरुवात केली. यामध्ये शाळेतली मुले आणि तरुण वर्ग यांना जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न होता. अंजनेरी परिसराला संरक्षित क्षेत्र म्हणून दर्जा मिळविण्यासाठी ही गेली अनेक वर्षं प्रयत्न सुरू होते. अखेर २०१७ मध्ये सरकारकडून हा प्रदेश संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केला गेला.२०१५-१७ मध्ये मी कळसुबाई-हरिश्चंद्रगड परिसरातल्या गावांमध्ये असणारी ‘डांगी’ जातीची गुरे कुठल्या प्रकारचा चारा खातात याचा अभ्यास केला. त्यात असे लक्षात आले की, ही गुरे जेव्हा बाहेर मोकळी फिरतात तेव्हा २१६ प्रकारच्या वनस्पती खातात. त्यातल्या अनेक औषधी असतात. गोठ्यात बांधून ठेवलेल्या गायींपेक्षा रानात चरणार्या गाईचं दूध जास्त पौष्टिक असण्यामागे हे एक कारण निश्चितपणे असावे. ’राखणरान’ या वनवासींच्या परंपरागत चारा व्यवस्थापन पद्धतीचाही मध्यंतरी अभ्यास केला. कळसुबाई-हरिश्चंद्रगड परिसरातल्या देवराईंचा फारसा अभ्यास आत्तापर्यंत झाला नव्हता. तो आम्ही या दरम्यान केला. यामध्ये आम्ही १०३ देवराईंची नोंद केली. ज्यांच्या माध्यमातून सुमारे दीड हजारपेक्षा जास्त हेक्टरचे जंगल लोकांकडून राखले गेले आहे. यातली विशेष बाब म्हणजे कळसुबाई अभयारण्य आणि भीमाशंकर अभयारण्यांच्या मधला जो पट्टा आहे, तिथे हे सगळे देवराईंचे टापू आहेत. त्यामुळे या देवराईंच्या रूपाने वन्यप्राण्यांच्या वहिवाटीचे नैसर्गिक मार्ग (कॅरिडोर) जपले गेले आहेत. केवळ जंगल नव्हे, तर असे मार्ग जपणे हेसुद्धा वन्यजीव संवर्धनासाठी अत्यंत आवश्यक असते. २०१४-१४ मध्ये मी त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या परिसरातल्या रानभाज्यांचा अभ्यास केला. त्यामध्ये सुमारे १२५ रानभाज्यांची नोंद केली. नंदुरबार आणि सातपुडा भागातही मी रानभाज्यांचा काही अभ्यास केला. पारंपरिक ज्ञान हे एका पिढीकड़ून दुसर्‍या पिढीकडे कसे जाते, त्यात काय काय बदल होतात याचाही अभ्यास आम्ही केला.

 
 

 
 रानभाज्या 
 

दिवस-रात्र रानोमाळ भटकून निसर्गाचा अभ्यास करण्याचे काम, तुम्ही घर आणि संसार सांभाळून कसे करता? एक स्त्री म्हणून तुम्हाला काही मर्यादा पडतात का ?

- घरच्यांचा पाठिंबा असल्याशिवाय असे काम करणे कोणालाही शक्य होण्यासारखे नाही. ही खरी गोष्ट आहे. सुदैवाने माझ्या या कामाला माझे आई-वडील, सासू-सासरे, नवरा, भाऊ हे कुटुंबातले सर्वच सदस्य मनापासून प्रोत्साहन देत असतात आणि मदत करत असतात. त्यामुळे घरची कामे कशी पार पाडायची, लहान मुलीला कुठे ठेवायचे असे प्रश्न मला सतावत नाहीत. मी माझ्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकते. एक महिला असल्याचे मला माझ्या कामात फायदेच भरपूर झाले आहेत. वनवासी भागातल्या महिलांशी मला सहजपणे संवाद साधता येतो. शेती वा लाकडे गोळा करण्याच्या निमित्ताने महिलांचा निसर्गाशी खूप संपर्क येतो. त्यामुळे त्यांच्याकडून त्यांच्या जीवनपद्धती आणि त्यांचे निसर्गाविषयीचे ज्ञान जाणून घेणे मला एक स्त्री असल्यामुळे सहज शक्य होते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथल्या परिसरात फिरताना मला खूप सुरक्षित वाटते. शहरात एकटे फिरताना एखाद्या महिलेला जी असुरक्षितता जाणवू शकते ती मला इथल्या वनवासी भागात फिरताना मुळीच जाणवत नाही.

 
 

 
     देवराई
 

लोकसहभागातून निसर्ग संवर्धन हे अनेकांना दिवास्वप्न वाटते. याबाबतीत तुमचे मत आणि अनुभव काय ?

- मला असे वाटते की, निसर्ग संवर्धनही गोष्ट लोक सहभागाशिवाय अशक्यच आहे. स्थानिक समाजाचा सहभाग असेल तर आणि तरच संवर्धन शक्य आहे. हे अवघड आहे हे निश्चित. कारण, जिथे जिथे लोक असतात तिथे तिथे निसर्ग संवर्धनाची प्रक्रियाही संथ असते. ही स्वाभाविक गोष्ट आपण मान्य करायला हवी आणि त्यानुसार काम करायला हवे. उदाहरणच द्यायचे झाले, तर अंजनेरी पर्वत संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केला गेला. परंतु, तिथे लोकांकडून होणारी लाकूडतोड, गुरेचराई, अलीकडे वाढलेले पर्यटन इ. प्रकारांनी मानवी हस्तक्षेप सुरूच आहे आणि वाढतो आहे. हे तेव्हाच थांबेल अथवा याचे सुयोग्य व्यवस्थापन तेव्हाच केले जाईल जेव्हा स्थानिक लोक जागृत होतील. या परिसरातून मिळणारे अन्न, लाकूड, गुरांना मिळणारा चारा, पर्यटनाच्या माध्यमातून मिळणारा पैसा हे सगळे लाभ जर शाश्वत राहायला हवे असतील, तर पर्यावरणतज्ज्ञ, सरकार आणि स्थानिक लोकांनी मानवी हस्तक्षेपाची मर्यादा ठरवून घ्यायला हवी.

पश्चिम घाट हा जगातला असा एकमेव पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील प्रदेश आहे. ज्यामध्ये भरपूर लोकसंख्या आहे. त्यामुळे माणसांना वगळून इथला निसर्ग वाचवायचा विचारच होऊ शकत नाही. असा विचार जर केला गेला तर माणूस विरुद्ध निसर्गही दुफळी वाढेल आणि लोकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटून आहे त्या निसर्गाचे नुकसान होईल. त्यामुळे लोक सहभागातून निसर्ग संवर्धन हे कितीही अवघड वाटत असले तरी हाच निसर्ग संवर्धनाचा एकमेव मार्ग आहे.

 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@