कथा इंदू वडापावची - २५ पैसे ते कोट्यवधींची उलाढाल

    दिनांक  04-Oct-2018   
 


जळगावमधलं मेहुण गाव. गाव कसलं खेडेगाव म्हणावं असंच त्याचं स्वरूप होतं ऐंशीच्या दशकात. “इथे आपल्या कुटुंबाला काहीच भविष्य नाही. त्यापेक्षा आपण मुंबईत जाऊ,” असं मेहुण गावातल्या साहेबराव आणि इंदुबाई या दाम्पत्याने ठरवलं.

 

नवी मुंबईच्या सानपाड्यात हे दोघे नवरा-बायको आले. ते वर्ष होतं १९७९. सुरुवातीला मिळेल ते काम करावं लागलं. सगळीच कामं कष्टाची होती. त्याचदरम्यान बेलापूरमध्ये सिडको नव्याने विकसित होत होते. आजूबाजूला इमारती उभ्या राहत होत्या. या इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकाम कामगार काम करत. त्यांना खाण्यासाठी स्वस्त आणि चांगलं असं काहीच मिळत नसे. त्यांची खाण्यावाचून होणारी ही आबाळ इंदूबाईंनी पाहिली. “आपण वडापाव विकायला सुरुवात केली तर...” साहेबरावांना, आपल्या पतीला त्यांनी विचारलं. साहेबरावांना कल्पना आवडली. एका छोट्या बाकड्यावर वडापाव बनवून विकायला सुरुवात झाली.

 

कालांतराने बाकड्याऐवजी गाडीवर वडापाव विकणं सुरू झालं. झोपडीवजा घरातून चाळीवजा घरात इंगळे कुटुंबीय आले. तिथेच मुलगा संतोष जन्मला. काही वर्षांनी मुलगी ममता जन्मली. एव्हाना त्या भागात ’मावशीचा वडापाव’ म्हणून तो वडापाव प्रसिद्ध झाला होता. या वडापावचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची चटणी आणि वापरला जाणारा मसाला यामुळे एक वेगळीच चव वडापावला होती. अगदी दूरवरून मंडळी मावशीचा वडापाव खाण्यासाठी आवर्जून येत असत. सगळं काही सुरळीत चाललंय असं वाटत असतानाच इंदूबाईंवर नियतीने एक आघात केला. सावलीसारखी सोबत करणार्‍या साहेबरावांना २१ जुलै १९९३ रोजी काळाने हिरावून नेले. पदरी दोन मुलं. १० वर्षांचा संतोष आणि ३ वर्षांची ममता. या दोन बाळांना आता इंदूबाईंशिवाय कोणाचा आधार होता? इंदूबाईंनी या दोन्ही बाळांकडे पाहिले. पुन्हा कंबर कसली. वडापावची गाडी परत सुरू झाली.

 

दु:ख कायमस्वरूपी राहत नाही. इंदूबाईंनी मोठ्या हिमतीने मुलांना मोठ्ठं केलं. स्वत: निरक्षर असूनही त्यांना चांगलं शिक्षण दिलं. संतोष वाणिज्य शाखेचा पदवीधर झाला, तर ममतानेसुद्धा त्याच शाखेत पदवी मिळवली. संतोष एका चांगल्या कॉर्पोरेट कंपनीत नोकरीस लागला. पगार चांगला होता. नोकरीनंतर मिळालेल्या वेळेत तो आईला वडापावच्या गाडीवर मदत करायचा. चाळीवजा घराचं आता रो-हाऊसमध्ये रूपांतर झालं. पुन्हा एकदा सगळं सुरळीत सुरू आहे असं वाटत असतानाच ममताच्या पोटात दुखू लागलं. तपासणी केल्यावर अपेंडिक्स असल्याचं निदान झालं. एक विश्वासू डॉक्टर होते. त्यांनी ऑपरेशनचा सल्ला दिला. खर्च सांगितला फक्त ३५ हजार रुपये. मात्र, डॉक्टरांच्या निष्काळजीपणाने वा त्यांना योग्य ते निदान न झाल्याने खर्च काही लाखांपर्यंत गेला. इतके पैसे तर जवळ नव्हते. करणार काय, हा इंदूबाईंपुढे यक्षप्रश्न होता. ”बाळा, घाबरू नगस. तुला मी कायबी होऊ देणार न्हाय,” अशा शब्दांत इंदूबाईंनी ममताला धीर दिला. स्वत:चं राहतं घर इंदूबाईंनी विकलं आणि त्या पैशातून मुलीच्या उपचारावर खर्च केला.

 

परिस्थितीने परत एकदा इंदूबाईंना डिवचलं होतं. राहतं घर विकण्याची पाळी आली होती. मात्र, इंदूबाईंनी धीर आणि चिकाटी सोडली नाही. परत शून्यातून मावशीचा वडापाव दिमाखात सुरू झाला. यावेळी मात्र इंदूबाईंसाठी एक जमेची बाजू होती ती म्हणजे मुलगा संतोष आता इंदूबाईंना मदत करू लागला होता. त्याने त्याची चांगली नोकरी सोडली. बहिणीच्या आजारपणात आईची होणारी ओढाताण त्याने पाहिली होती. आपल्या आईची ओळख म्हणजे ’मावशीचा वडापाव.’ या वडापावला, या व्यवसायाला आपण मोठ्ठं करायचं असं त्याने मनोमन ठरवलं. सर्वांत पहिल्यांदा त्याने वडापावची चटणी बनवायची शिकून घेतली. त्यामध्ये भर म्हणून त्याने खोबर्‍याची चटणी सुरू केली. वर्तमानपत्राच्या कागदात वडापाव बांधून न देता कागदी पिशव्यांतून वडापाव देणं चालू केलं. मावशीचा वडापाव ही मौखिक ओळख बदलून ’इंदू वडापाव’ असं नामकरण केलं. अवघ्या वडापावच्या गाडीचा कायापालट केला. परिणामी धंदा पाचपट वाढला.

 

याचदरम्यान संतोषने उद्योजकीय व्यावसायिकतेचे धडे देणार्‍या संस्थेमध्ये उद्योजकतेविषयीचे प्रशिक्षण घेतले. त्या संस्थेचे प्रमुख अतुल राजोळी यांनी संतोषला उद्योगाचं व्यापक चित्र दाखवलं. संतोषने मग हॉटेल व्यवसायात उतरायचं ठरवलं. ११ सप्टेंबर २०१७ साली ’बैठक’ नावाचं पहिलं हॉटेल सुरू झालं आणि अवघ्या वर्षभरात नवी मुंबईमध्ये त्याचे ४ आऊटलेट संतोषने वाढविले. संतोषच्या कल्पकतेमुळे ‘इंदू वडापाव’ आणि ‘बैठक हॉटेल’ची उलाढाल काही कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. संतोषने जेव्हा वडापावच्या गाडीचा व्यवसाय आपल्या पद्धतीने सुरू केला, तेव्हा त्याने या क्षेत्रातील नावाजलेल्या वडापाव विक्रेत्यांची भेट घेतली. त्यांच्याकडून उद्योगाचे बाळकडू घेतले. ‘फ्रोझन वडापाव’ हा प्रकार तिथेच त्याला कळला. मात्र, आपण आपल्या ग्राहकांना ताजा आणि उत्तम चव असलेलाच वडापाव द्यायचा. चव आणि दर्जा यामध्ये कुठेही तडजोड करायची नाही. आईच्या नावाला धक्का लागेल असं कोणतंही अनैतिक काम करायचं नाही, या तत्त्वांमुळेच कोणतीही हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री नसणारा संतोष आज काही कोटी रुपयांची उलाढाल करत आहे. सध्या साठीमध्ये असणार्‍या इंदूबाई आजही स्वत: वडापावच्या गाडीवर उभ्या राहतात. अगदी परदेशातून आपल्या घरी आलेली माणसे आवर्जून मावशीचा वडापाव सोबत परदेशात घेऊन जातात. २५ पैशांचा वडापाव ते कोटी रुपयांची हॉटेल इंडस्ट्री हा इंदूबाईंचा प्रवास वाखाणण्यासारखा आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/