देवरुखमधून प्रथमच वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध; सड्यांना मिळाली नवी ओळख

    26-Feb-2025
Total Views | 341
 Iphigenia from devrukh
 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुखच्या सड्यावरुन 'इपिजिनिया' कुळातील नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (Iphigenia from devrukh). या प्रजातीचे नामकरण 'इपिजिनिया देवरुखेन्सिस' (Iphigenia devrukhensis), असे करण्यात आले आहे (Iphigenia from devrukh). देवरुखमधून प्रथमच वनस्पतीच्या एखाद्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (Iphigenia from devrukh). पावसाळ्यात फुलणारी ही प्रजात जगात केवळ देवरुखच्या सड्यांवर आढळत असल्याने इथल्या सड्यांच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. (Iphigenia from devrukh)
 
 
'काॅलचीकेसी' (Colchicaceae) या वनस्पतींच्या गटातील 'इपिजिनिया' या कुळात भारतात सात प्रजाती आढळतात. त्यामधील पाच प्रजाती या महाराष्ट्रात आढळतात. यामध्ये आता एका नव्या प्रजातीची भर पडली आहे. आठल्ये-सप्रे- पित्रे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रताप नाईकवडे आणि 'सह्याद्री संकल्प सोसायटी'चे कार्यकारी संचालक प्रतिक मोरे यांनी 'इपिजिनिया देवरुखेन्सिस' या प्रजातीचा शोध लावला आहे. न्यूझीलंडमधून प्रकाशित होणाऱ्या 'फायटोटॅक्सा' या नामांकित संशोधन नियतकालिकामध्ये या शोधाचे वृत्त बुधवार दि. २६ फेब्रुवारी रोजी प्रकाशित झाले.
 
 
'इपिजिनिया देवरुखेन्सिस' ही प्रजात देवरुखमधील साडवली आणि आंबिवलीच्या सड्यावर पावसाळी हंगामात फुलते. जून ते सप्टेंबर या काळात ती आपल्याला या दोन सड्यावर दिसून येते. या वनस्पतीवर गुलाबी रंगाची फुले फुलतात. 'इपिजिनिया' या प्रजातीला मराठीत भुईचक्र म्हटले जाते. 'इपिजिनीया रत्नागिरीका' ही प्रजात या नव्या प्रजातीशी साध्यर्म असणारी आहे. कोकण दिपकाडी या प्रजातीचा अभ्यास करताना मोरे आणि नाईकवाडे यांनी या नव्या प्रजातीचे निरीक्षण केले. त्यावेळी त्यांना देवरुखमधील 'इपिजिनिया'चे काही भाग हे 'इपिजिनीया रत्नागिरीका' या प्रजातीपेक्षा वेगळे जाणवले. सूक्ष्म निरीक्षणाअंती देवरुखमधील 'इपिजिनिया' नवीन असण्यावर शिक्कामोर्तब झाले. 'देवरुख शिक्षण प्रसारक मंडळा'च्या नावातील पहिले अक्षर घेऊन देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याप्रति कृतज्ञता म्हणून वनस्पतीच्या प्रजातीला 'देवरुखेन्सिस' हे नाव देण्यात आले आहे.
 
 
'इपिजिनीया रत्नागिरीका'पेक्षा वेगळी
रत्नागिरीका या प्रजातीमध्ये स्त्रिकेसरावरील कूक्षी ही सरळ एकेरी असते. तर नवीन प्रजातीत ती त्रिदलीय आहे. बियांचा आकार लहान आहे. तसेच बियांची संख्या ही देखील रत्नागिरीका प्रजातीपेक्षा कमी आहे. बियांची रचना देखील एका बाजुला चपटी आहे. फुलातील अंडाशय हा थोडा गोलाकार आहे. फुलातील पुंकेसरातील वृंत हे परागकोषापेक्षा जास्त लांब आहेत. नव्या प्रजातीच्या फुलांच्या देठांची लांबी कमी आहे. तसेच जमिनीतील कंद हा लहान आकाराचा असून पानांची संख्याही कमी आहे. या वैशिष्ट्यामुळे तसेच फरकामुळे देवरूख परिसरात आढळणारी प्रजात ही रत्नागिरीका प्रजातीपासून भिन्न आणि नवीन असल्याचे सिद्ध झाले.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121