मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (ASI Survey of Dwarka) समुद्रात बुडलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या द्वारका नगरीचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाकडून शोधमोहिम सुरु झाली आहे. एएसआयचे अतिरिक्त महासंचालक प्रा. आलोक त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखालील पाच पुरातत्वशास्त्रज्ञांच्या पथकाने पुरावे गोळा करण्याच्या उद्देशाने मंगळवारी द्वारका किनाऱ्याजवळ पाण्याखालील शोध सुरू केला. प्राथमिक तपासणीसाठी गोमती खाडीजवळील परिसराची निवड करण्यात आली असून या शोधातून द्वारका शहराचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पुरावे गोळा केले जाणार असल्याची माहिती आहे.
हे वाचलंत का? : ...आणि अन्नामलाईंनी घेतली शपथ! तमिळनाडूच्या ४४ हजार मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मूक्त करणार
एएसआय सर्वेक्षणाची ही पहिलीच वेळ आहे की मोठ्या संख्येने महिला पुरातत्वशास्त्रज्ञांचा यावेळी एका टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. एएसआयचे अंडरवॉटर आर्कियोलॉजी विंग १९८० पासून पाण्याखालील पुरातत्व संशोधनात आघाडीवर आहे. २००१ पासून, विंग बंगाराम बेट (लक्षद्वीप), महाबलीपुरम (तामिळनाडू), द्वारका (गुजरात), लोकटक तलाव (मणिपूर) आणि एलिफंटा बेट (महाराष्ट्र) यांसारख्या ठिकाणी शोध घेत आहे. यापूर्वी २००५ ते २००७ या कालावधीत द्वारकामध्ये समुद्र किनारी उत्खनन केले होते. त्यादरम्यान सुमारे २०० नमुने गोळा केले गेले होते.