विश्वप्रवक्ते आणि उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी, आपल्या नावे नवीन पराक्रम केला आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मंजूर केलेल्या विकासकामांचे भूमिपूजन करण्याचा पराक्रम संजय राऊत आणि दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी करण्याचे काम केले. माजी मंत्री आणि दिंडोरीच्या तत्कालीन खासदार भारती पवार यांनी निवडून आल्यानंतर लगेच कामाला सुरुवात केली. प्रसंगी कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांनी नागरिकांसमोरच अधिकार्यांना जाब विचारला. त्यामुळे भारती पवारांच्या कामावर जनता समाधानी होती. अनेक वर्षांपासून रेंगाळत पडलेल्या, पेठ महामार्गाचे नुतनीकरण करत जनतेला दिलासा दिला. अवनखेड येथील कादवा नदीवर पूल उभारण्याचे कामही त्यांच्याच कार्यकाळात झाले. गेल्या ३० ते ४० वर्षांपासून रखडलेली कामे, भारती पवार यांच्या सततच्या पाठपुराव्याने मंजूर झाली. परंतु, आचारसंहितेमुळे उद्घाटन करण्यात आले नाही. त्यात विरोधकांनी कांदाप्रश्न अस्मितेचा करत मतदारांची दिशाभूल केल्याने, अनुभव नसताना भास्कर भगरे यांना निवडून दिले.
कोणतेही भरीव काम न करता, भारती पवार यांनी मंजूर केलेल्या म्हेळुस्के आणि लखमापूर गावाला जोडणार्या कादवा नदीवरील पुलाचे उद्घाटन आणि म्हेळुस्के गावातील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा संजय राऊतांच्या साथीने उरकून घेतला. मुळात मागच्या पंचवार्षिकमध्ये भारती पवार यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत कोट्यवधींचा निधी खेचून आणला. मोदी सरकारने केलेल्या वचनपूर्तीच्या कामांचे उद्घाटन, गुपचूप करण्याचा राऊत आणि भगरे यांनी घातलेला घाट निश्चितच शोभनीय नाही. एकवेळ संजय राऊत यांचा वाचाळवीरपणा कानामागे टाकता येईल, मात्र आता कुठे राजकारणात पाय रोवायला सुरुवात केलेल्या दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनीतरी या कामांच्या उद्घाटनासाठी, माजी मंत्री भारती पवार यांना बोलावण्याचे औदार्य दाखवायला पाहिजे होते. परंतु, रोजच आरोपांच्या फैरी झाडून राज्याच्या राजकारणात राळ उठवून देणार्या राऊतांना यात काही नवल वाटत नसले, तरी सर्वसामान्य जनता मात्र त्यांना विटली आहे. हे त्यांना आता कान धरून सांगण्याची गरज निर्माण झाली असून, विश्व प्रवक्त्यांच्या आगळीकीला जनतेनेच उत्तर देण्याची गरज निर्माण झाली आहे.
झारीतील शुक्राचार्य
‘व्होट जिहाद’, नामको बँक घोटाळा आणि बांगलादेशी घुसखोर यांमुळे पुन्हा एकदा मालेगावचे नाव देशाच्या पटलावर उमटत आहे. लोकसभा निवडणुकीवेळी सहा विधानसभा क्षेत्रांमधून मताधिक्य घेतलेल्या भाजपच्या उमेदवाराला एकट्या मालेगाव मध्य विधानसभा क्षेत्राने पराभूत केले. तेव्हापासून आतापर्यंत मालेगावचे नाव कोणत्या ना कोणत्या कारणाने गाजत आहे. ‘व्होट जिहाद’ होत नाही, तोच नामको बँक घोटाळा पुढे आला. हा घोटाळा १०० कोटी रुपयांच्या पुढे असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले. आता मालेगावात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी घुसखोर वास्तव्य करत असल्याची बाब भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रकाशझोतात आणली. येथे १०० पेक्षा जास्त नागरिक बेकायदेशीरपणे राहात असल्याचे सोमय्या यांचे म्हणणे आहे. त्याबाबतचे पुरावे त्यांनी प्रशासनाला दिले इथपर्यंत ठीक होते. मात्र, पकडण्यात आलेल्या बर्याचशा बांगलादेशी घुसखोरांकडे, भारतीय असल्याची बनावट कागदपत्रे आढळली आहेत, ही खरी चिंतेची बाब आहे.
पैशांच्या लोभापायी या घुसखोरांना जन्म दाखला, आधार कार्ड, रहिवासी दाखला मिळवून देण्यात, मोठी यंत्रणा कार्यरत असल्याची चर्चा आहे. ही यंत्रणा उद्या कोणत्याही देशविघातक शक्तींना मदत करून, देशात दहशतवादी कारवायांना खतपाणी घालण्याचेच एक प्रकारचे काम करत आहे. त्यामुळे देशाच्या आंतरिक सुरक्षेला धोका निर्माण होत आहे. सोमय्या यांनी बांगलादेशी घुसखोरांच्या प्रश्नाला वाचा फोडून, प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आणला आहे. झारीतील हे शुक्राचार्य शोधून त्यांना शासन करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. त्यामुळेच या प्रकरणातील तपासासाठी, विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली ‘एसआयटी’ नेमण्यात आली. त्यानुसार आता मालेगावातील चार हजार नागरिकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. यात दोषी बांगलादेशी घुसखोरांवर तातडीने कार्यवाही करत, देशाच्या बाहेर हाकलून देण्याची गरज निर्माण झाली आहे. आज बांगलादेशी घुसखोर आले, उद्या बिनबोभाटपणे दहशतवादी येतील, इथे देशविघातक कारवाया करतील आणि निघून जातील. त्यामुळेच प्रशासनाला आतून पोखरणार्या झारीतील शुक्राचार्यांचा शोध घेऊन, त्यांच्यावर कठोर कारवाई करत प्रशासनात वचक निर्माण करण्याची गरज आहे.
विराम गांगुर्डे