भविष्यात दुपारी जेवण काय करायचे? याबाबतचे आदेशही उबाठाच्या खासदारांना येतील

मंत्री उदय सामंत यांचा टोला

    14-Feb-2025
Total Views |
 
Uday Samant
 
नांदेड : आता आमच्याकडे जेवायला येताना परवानगी घ्यावी, असे आदेश उबाठा गटाच्या खासदारांना आलेत. भविष्यात जेवण काय करायचे? याबाबतचे येऊ शकतात, असा टोला मंत्री उदय सामंत यांनी लगावला. शुक्रवार, १४ फेब्रुवारी रोजी त्यांनी नांदेड येथे माध्यमांशी संवाद साधला.
 
मंत्री उदय सामंत म्हणाले की, "शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार केल्याने काही लोकांच्या पोटात पोटशूळ उठला. शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचे कौतूक केल्याने काही लोकांच्या जिव्हारी लागले. त्यानंतर मंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला उबाठा गटाचे खासदार उपस्थित राहिल्याने काही लोकांना दु:ख झाले. उबाठा गटाच्या खासदारांना भविष्यात शिंदे साहेबांच्या सहकाऱ्यांकडे जेवायला जायचे असल्यास आदेश पाळायला हवा, असे सांगण्यात आले. आता आमच्याकडे जेवायला येताना परवानगी घ्यावी, असे आदेश आलेत. भविष्यात नाश्ता काय करायचा? जेवण काय करायचे? याबाबतचे आदेशही उबाठाच्या खासदारांना येऊ शकतात, असे मला वाटते," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  शरद पवार आम्हाला पितासमान! पवारांवरील टीकेनंतर संजय राऊतांचा युटर्न
 
ते पुढे म्हणाले की, "एकनाथ शिंदे साहेबांनी केलेल्या उठावामागे एक महत्वाचे कारण होते. काँग्रेसमय शिवसेना मी होऊ देणार नाही, असे बाळासाहेब ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले होते. काँग्रेससोबत जाऊ नये ही आमची भूमिका होती. काँग्रेसने काढून घेतलेला आमचा धनुष्यबाण पुन्हा आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी उठाव केला आणि आम्ही त्यात सहभागी होतो. विधानसभा निवडणूकीनंतर एकनाथ शिंदेंचे शिवसेनेचे नेतृत्व देशभरात सर्वमान्य झाले आहे. तेच बाळाळासाहेबांच्या विचारांवर शिवसेना चालवत आहेत, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. शिंदे साहेबांच्या कामावर विश्वास ठेवून उबाठातील अनेक लोक आमच्याकडे येत आहेत," असेही त्यांनी सांगितले.