मुंबई : शरद पवार आम्हाला पितासमान असून आम्ही फक्त आमची भूमिका मांडली, असा युटर्न संजय राऊतांनी घेतला आहे. शरद पवारांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुरस्कार मिळाल्याने राऊतांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता त्यांनी यावर सारवासारव केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, "माझे आणि पवार साहेबांचे संबंध त्यांना माहिती नाही. शरद पवार साहेब आम्हाला पितासमान आहेत. पण मी माझ्या पक्षाची एक भूमिका मांडली. मी त्यांच्यावर टीका केली नाही तर माझ्या पक्षाची भूमिका मांडली. महादजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार एखादी खाजगी संस्था देते आणि त्याचा एवढा गवगवा होतो. एकनाथ शिंदेंना हा पुरस्कार देणे हा स्वाभिमान आणि शौर्याचा अपमान आहे. शरद पवारांनी तिथे जाणे महाराष्ट्राला आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांना रुचलेले नाही. शरद पवार मोठे नेते आहेत," असे ते म्हणाले.
शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र, यावरून संजय राऊतांना पोटशूळ उठला. "ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तोडली त्यांना शरद पवारांनी सन्मानित केल्यामुळे मराठी माणसाच्या हृदयाला वेदना झाल्या असतील. आम्हाला तुमचे दिल्लीचे राजकारण काय आहे ते माहित नाही. पण आम्हालासुद्धा थोडे राजकारण कळते," अशी टीका संजय राऊतांनी केली होती. मात्र, आता शरद पवार आण्हाला वडीलांसमान असल्याचे सांगत राऊतांनी सारवासारव केली.