वाढवण बंदरासाठी कुशल मनुष्यबळ तयार करणार : मंत्री नितेश राणे
12-Feb-2025
Total Views | 80
मुंबई : वाढवण बंदरासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी बुधवार, १२ फेब्रुवारी रोजी दिल्या.
बुधवार, १२ फेब्रुवारी रोजी मत्स्योत्पादन वाढ आणि मच्छिमारांचा कौशल्य विकास, रोजगार आणि या व्यवसायामध्ये नाविन्यता आणण्याच्या दृष्टीने तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.
मंत्री नितेश राणे म्हणाले की, "२०२६ पर्यंत पालघर जिल्ह्यात उभारण्यात येत असलेले वाढवण बंदर कार्यान्वित होणार असून या बंदरासाठी लागणाऱ्या कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी एक प्रशिक्षण कार्यक्रम तयार करावा. किनारपट्टीच्या भागात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होण्याकरिता या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी किनारपट्टीच्या जिल्ह्यांना प्राधान्य द्यावे. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तरतूद करण्यासाठी विभागाने पुढाकार घ्यावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तरतूद करण्यात येईल. वाढवण बंदरासाठी मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असून ती राज्यातूनच पूर्ण करण्यासाठी या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उपयोग होणार आहे. त्यामुळे तात्काळ हा प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात यावा," अशा सूचना त्यांनी दिल्या.
मत्स्योत्पादन वाढीसाठी मच्छिमारांना प्रशिक्षण देणार
ते पुढे म्हणाले की, राज्यातील गोड्या पाण्यातील आणि सागरी मत्स्योत्पादन वाढीसाठी मच्छिमारांना प्रशिक्षण देण्यात यावे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तसेच किनारपट्टीच्या एका जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर प्रशिक्षणाचा एक कार्यक्रम सुरू करण्यात यावा. मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाने या प्रशिक्षण कार्यक्रमाचे मूल्यमापन करावे. तसेच या माध्यमातून मत्स्य उत्पादनामध्ये किती आणि कशी वाढ झाली, मच्छिमारांना याचा कसा फायदा झाला याचेसुद्धा मूल्यमापन करावे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी विभागाने संबंधित जिल्ह्यांच्या नियोजन समितीच्या निधीतून तरतूद करावी," अशा सूचना त्यांनी दिल्या. मच्छिमारांसाठी देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये शाश्वत मासेमारी व्यवसाय, पर्यावरण स्नेही मच्छिमारी, मच्छिमारांना व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवणे, त्यांची सुरक्षा यासह अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या बाबींचा समावेश असेल.