ससून डॉक येथे उभारणार एआय आधारित सुरक्षा प्रणालीचे पहिले मॉडेल
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश : एआय प्रणालीमुळे राज्यात दुसरी निल क्रांती
12-Feb-2025
Total Views | 67
मुंबई : ससून डॉक येथे एआय तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणालीचे एक मॉडेल प्रायोगिक तत्वावर उभारण्यात यावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या आहेत.
बुधवार, १२ फेब्रुवारी रोजी सागरी सुरक्षा आणि मत्स्य उत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाच्या वापराविषयी मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
मंत्री नितेश राणे म्हणाले की, "मत्स्य उत्पादन वाढीसोबत मच्छिमारांची सुरक्षाही महत्वाची आहे. यासाठी एआय तंत्रज्ञानावर अधारित प्रणालीचा वापर ही काळाची गरज आहे. या प्रणालीच्या वापरामुळे राज्यात दुसरी निल क्रांती शक्य आहे. मत्स्यव्यवसाय विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या पारदर्शी अंमलबजावणीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत आराखडा तयार करावा. मासळीच्या उत्पादनामध्ये वाढ करणे, मच्छिमारांची सुरक्षा निश्चित करणे, मच्छिमार नोंदणी, मच्छिमारी नौका नोंदणी, गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय, मासळी विक्रीची व्यवस्था, त्यांची वाहतुक, आपत्तीच्या काळात राबवायची सुरक्षा आणि प्रतिसाद यंत्रणा यासाठी एआयचा वापर करावा. ससून डॉक येथे अशा सुरक्षा प्रणालीचे एक मॉडेल प्रायोगिक तत्वावर उभारण्यात यावे. त्याचे मुल्यमापन करून सर्व राज्यभरात ही प्रणाली लागू करण्यासाठी चाचपणी करावी. एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मच्छिमारांचे जीवनमान उंचावणे तसेच राज्याच्या मत्स्य उत्पादनात वाढ करुन राज्याच्या अर्थव्यवस्थेत महत्वाचा वाटा उचलणे शक्य आहे," असे ते म्हणाले.
एआय आधारीत सुरक्षा प्रणालीमध्ये काय असणार?
ससून डॉक येथे उभारण्यात येणाऱ्या एआय तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणालीमध्ये मासळीचे मूल्यमापन, आपत्तीच्या काळात मच्छिमारांची सुरक्षा, मासळी आजारांचा शोध घेणारी प्रणाली, एआय आधारित मासळी बाजार प्रणाली, सागरी सुरक्षा, सागरी गस्त, बेकायदेशीर मासेमारीवर लक्ष ठेवून त्याला आळा घालणारी प्रणाली, मच्छिमार कल्याणाच्या योजनांची देखरेख करणारी प्रणाली इत्यादी बाबींचा समावेश असेल.