पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू-काश्मीरमधील सोनमर्ग बोगद्याचे राष्ट्रार्पण
14-Jan-2025
Total Views | 11
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी सोमवार, दि. १३ जानेवारी रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, त्यांनी जम्मू-काश्मीर आणि भारताच्या विकासासाठी कठोर परिश्रम करणार्या आणि आपले आयुष्य पणाला लावणार्या कामगारांचे आभार मानले. त्यांनी कामगारांच्या दृढ निर्धार आणि बांधिलकीचे तसेच काम पूर्ण करताना आलेल्या सर्व अडथळ्यांवर मात केल्याबद्दल यांचे कौतुक केले.सोनमर्ग बोगद्याच्या प्रत्यक्ष कामाला भाजप-रालोआ सरकार सत्तेत आल्यानंतर २०१५ मध्ये सुरुवात झाली, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. त्यांच्या प्रशासनाखालीच या बोगद्याचे बांधकाम पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. हिवाळ्यात सोनमर्गसोबत संपर्कव्यवस्था कायम राखण्याचे काम हा बोगदा करेल आणि या भागातील पर्यटनात वाढ करेल, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. येत्या काही दिवसांत जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक रस्ते आणि रेल्वे संपर्कव्यवस्था प्रकल्प प्रकल्प पूर्ण होणार असल्यावर त्यांनी भर दिला. जवळच काम सुरू असलेल्या आणखी एका महत्त्वाच्या संपर्कव्यवस्था प्रकल्पाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला आणि काश्मीर खोर्यासोबत जोडणार्या या आगामी रेल्वे जोडणी प्रकल्पाविषयी असलेल्या उत्सुकतेची दखल घेतली. नव्या जम्मू आणि काश्मीरचा भाग म्हणून नवे रस्ते, रेल्वे, रुग्णालये आणि महाविद्यालयांच्या निर्मितीला त्यांनी अधोरेखित केले.
२१व्या शतकातील जम्मू-काश्मीर विकासाचा नवा अध्याय लिहीत आहे, असे त्यांनी सांगितले. हा भूप्रदेश आपला सर्व कठीण काळ मागे सारत पृथ्वीवरील नंदनवन ही आपली ओळख पुन्हा नव्याने मिळवत आहे. लाल चौक भागात लोक आता रात्रीच्या वेळीदेखील आईस्क्रीमचा आनंद घेत असतात आणि हा भाग अतिशय वर्दळीचा असतो, असे ते म्हणाले. पोलो व्ह्यू मार्केटला नवीन निवासस्थान केंद्रात रुपांतरित केल्याबद्दल त्यांनी स्थानिक कलाकारांचे कौतुक केले. संगीतकार, कलाकार आणि गायक या ठिकाणी वरचेवर सादरीकरण करतात. श्रीनगरमधील जनता आता चित्रपटगृहात चित्रपटांचा आणि दुकानांमध्ये कुटुंबासमवेत सहजतेने आनंद घेऊ शकते. असे लक्षणीय बदल एकट्या सरकारद्वारे केले जाऊ शकत नाहीत, असे सांगून लोकशाही मजबूत करण्याचे आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करण्याचे श्रेय जम्मू-काश्मीरच्या लोकांनाही तितकेच जाते, असे ते म्हणाले.
सोनमर्ग बोगदा प्रकल्प १२ किमी लांबीचा असून त्यासाठी २ हजार, ७०० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. त्यामध्ये ६.४ किमी लांबीचा मुख्य सोनमर्ग बोगदा, त्याला जोडणारे मार्ग समाविष्ट आहेत. हा बोगदा समुद्रसपाटीपासून ८ हजार, ६५० फूट उंचीवर असून लेहमार्गे श्रीनगर ते सोनमर्ग या प्रवासासाठी सर्व मोसमांमध्ये उपयोगी पडेल. या प्रकल्पामुळे कोसळणार्या दरडी व हिमस्खलनाचा धोका असणार्या मार्गांना सुरक्षित पर्याय मिळाला असून लडाख या लष्करी महत्त्वाच्या भागाकडे होणारे दळणवळण सुरक्षित व सुकर होईल. या मार्गामुळे सोनमर्गकडे बारमाही सुरक्षित प्रवास करता येईल. अशा रितीने हिवाळी पर्यटन व साहस पर्यटनाला चालना मिळेल त्यायोगे स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होतील.
झोजिला बोगदा २०२८ सालापर्यंत पूर्ण होणार असून सोनमर्ग प्रकल्पामुळे या मार्गाचे अंतर ४९ किमीवरून ४३ किमी इतके कमी होईल व वाहनांचा वेग सध्याच्या ३० किमी प्रतितासावरून ७० किमी प्रतितासापर्यंत वाढेल. यामुळे श्रीनगर खोरे ते लडाखपर्यंत जाणार्या राष्ट्रीय महामार्ग क्र.-१ वरील प्रवास अधिक सुरळीत होईल.