पाटणा : (Tejashwi Yadav's Dual Voter Id Row) विशेष सखोल पडताळीचा (एसआयआर) भाग म्हणून निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदारयादीतून आपले नाव गायब असल्याचा आरोप करणारे बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राजद नेते तेजस्वी यादव अडचणीत आले आहेत. निवडणूक आयोगाने त्यांनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेला मतदार ओळखपत्र क्रमांक अधिकृतरित्या जारी करण्यात आला नसून, सखोल चौकशीसाठी आपल्याकडील हे ओळखपत्र जमा करावे, अशी नोटीस तेजस्वी यांना पाठवण्यात आली आहे.
तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषदेत त्यांचे नाव मतदार यादीत नाही असे म्हणत आरएबी ९१६१२९ हा आपला मतदार ओळखपत्र क्रमांक असल्याचे नमूद केले होते. मात्र, "हा ओळखपत्र क्रमांक अधिकृतपणे जारी करण्यात आला नसल्याचे आमच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे तुमच्याकडील मतदार ओळखपत्र मूळ रूपात जमा करावे. त्याची सखोल चौकशी केली जाईल", असे निवडणूक नोंदणी कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे. निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी ‘एक्स’वर हे पत्र प्रसिद्ध केले आहे.
तेजस्वी यांचे नाव १८१-दिघा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक २०४च्या मतदारयादीत अनुक्रमांक ४१६वर नोंदवले गेले असल्याचे सांगत या अधिकाऱ्यांनी तेजस्वी यांचा मतदार ओळखपत्र क्रमांकही प्रसिद्ध केला आहे. "२ ऑगस्ट २०२५ रोजी तुम्ही तुमचे नाव प्रारूप मतदारयादीत नसल्याचे पत्रकार परिषदेत नमूद केले होते. मात्र, आम्ही केलेल्या तपासणीत तुमचे नाव मतदान केंद्र क्रमांक २०४च्या (बिहार प्राणी विज्ञान विद्यापीठाची ग्रंथालय इमारत) अनुक्रमांक ४१६वर नोंदणीकृत आहे, ज्याचा ओळखपत्र क्रमांक आरएबी ०४५६२२८ आहे", असे यात स्पष्ट करण्यात आले आहे.
"तेजस्वी यांचा मतदारयादीत नोंद असलेला मतदार ओळखपत्र क्रमांक हा २०२०च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रतिज्ञापत्रात सादर केलेला क्रमांक आहे. त्यांच्याकडे दुसऱ्या क्रमांकाचे दुसरे ओळखपत्र असेल तर त्याची चौकशी व्हायला हवी", असे पत्रात म्हटले आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\