नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते शिबू सोरेन यांचे सोमवारी सकाळी ८१ व्या वर्षी नवी दिल्ली येथे दीर्घ आजाराने निधन झाले.
झारखंडचे मुख्यमंत्री आणि त्यांचे पुत्र हेमंत सोरेन यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून निधनाची पुष्टी केली. दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात शिबू सोरेन मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांना दीड महिन्यांपूर्वी पक्षाघात झाला होता. गेल्या एक महिन्यापासून ते व्हेंटिलेटरवर होते.
शिबू सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्चाचे ३८ वर्षे नेतृत्व केले आणि पक्षाचे संस्थापक संरक्षक म्हणून ओळखले जात. ते झारखंडचे तिसरे मुख्यमंत्री होते. राजकारणातील चार दशकांच्या कारकिर्दीत, सोरेन आठ वेळा लोकसभेवर निवडून आले आणि दोन वेळा राज्यसभेचे खासदार म्हणूनही कार्यरत होते.
शिबू सोरेन यांचा जन्म ११ जानेवारी १९४४ रोजी रामगडजवळील नेमरा गावात झाला होता. त्यांचे वडील सोब्रन मांझी हे व्यवसायाने शिक्षक होते. सोब्रन हे आजूबाजूच्या परिसरातील सर्वात शिक्षित वनवासी व्यक्ती मानले जात. शिबू सोरेन यांच्या वडिलांची हत्या ते वसतिगृहात शिकत असताना झाली. त्यांच्या वडिलांच्या हत्येने ते राजकीय आणि सार्वजनिक जीवनात आले. त्यांनी वनवासी समाजाला एकत्र केले आणि सावकारांविरुद्ध घोषणाबाजी केली. त्यानंतर त्यांनी धनकटनी चळवळ सुरू केली. ज्यामध्ये ते आणि त्यांचे साथीदार सावकारांचे भात जबरदस्तीने कापून घेऊन जात असत. या चळवळीदरम्यान शिबू सोरेन यांना दिशोम गुरु ही पदवी मिळाली. संथालीमध्ये दिशोम गुरु म्हणजे देशाचे गुरु.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची आदरांजली
शिबू सोरेन यांचे निधन सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात एक मोठे नुकसान आहे. त्यांनी वनवासी समुदायास आपली ओळख निर्माण करण्यासाठी सक्षम करण्याचे काम केले. झारखंड राज्याच्या निर्मितीतही त्यांची प्रमुख भूमिका होती. झारखंडचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि संसद सदस्य म्हणूनही योगदान दिले. लोकांच्या, विशेषतः वनवासी समुदायांच्या कल्याणावर त्यांचा भर नेहमीच लक्षात राहील.
पंतप्रधानांनी घेतले अंत्यदर्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर गंगाराम रुग्णालयात शिबू सोरेन यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांनी हेमंत सोरेन आणि त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. पंतप्रधानांनी ‘एक्स’वर म्हटले की, शिबू सोरेन हे एक समाजातील वंचितांचे नेते होते. त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात विविध स्तरांवरून जनतेसाठीच काम केले. वनवासी समुदाय, गरीब आणि दलितांना सक्षम बनवण्याबाबत त्यांना विशेष आवड होती.