मुंबई, दि. २० : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशातच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस (Congress)आणि शिवसेना उबाठा गट (Shivsena UBT) यांच्यात मुख्यंमत्रिपदासाठी सामना रंगताना दिसत आहे. शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी काँग्रेसला जागावाटप आणि मुख्यमंत्रिपदाचा चेहरा देण्यावरून डिवचले असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही संजय राऊतांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपने महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या रस्सीखेचीकडे लक्ष वेधले आहे.
दरम्यान, शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत म्हणाले की, “महाविकास आघाडीत तीन प्रमुख पक्ष आहेत. आम्ही एकत्र निवडणुका लढू. कोणाला खुमखुमी असेल की, लहान भाऊ, मोठा भाऊ, लाडका भाऊ तर महाराष्ट्रात काय चित्र आहे, हे भविष्यात कळेल. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भूमिका स्पष्ट आहेत. काँग्रेसला लोकसभेत जागा जास्त मिळाल्या. पण त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की, त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचे योगदान किती आहे. हे त्यांनी लक्षात घ्यावे,” असे राऊत म्हणाले.
“कोल्हापूर, रामटेक, अमरावतीची आमची जिंकलेली जागा आम्ही त्यांना दिली. या तीन जागा शिवसेनेमुळे वाढल्या आहेत. ते जर हे विसरले असतील, तर योग्य नाही. पण काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशा भूमिका कधी घेणार नाहीत,” अशी टीका राऊत यांनी केली.
संजय राऊतांच्या टीकेचा समाचार घेत काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, “महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती आणि लोकसभेचा निकाल पाहता, काँग्रेसचाच स्ट्राईक रेट जास्त राहील. जागावाटपाबाबत आमची चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडी 288 जागा लढणार असून मेरिटच्या आधारावर जागावाटप व्हावे, ही आमची भूमिका आहे. त्यामुळे यात लहान भाऊ, मोठा भाऊ असे काही नाही. आमच्यात काहीही वाद नाही. तुम्ही संजय राऊतांचे फार ऐकू नका,” असे म्हणत पटोलेंनी संजय राऊतांची कानउघाडणी केली.
ठाकरेंना बेईमान काँग्रेस कळली असेल! : भाजप
“ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, परंतु काँग्रेस आणि शरद पवार त्यांना मुख्यमंत्री करायला तयार नाहीत. उद्धव ठाकरे यांना काँग्रेस किती बेईमान आहे, हे आता कळले असेल. महाविकास आघाडीमध्ये खरी लढाई मुख्यमंत्रीपदासाठी सुरू आहे. काँग्रेस आणि शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांचा जेवढा वापर करायचा तेवढा केला. मुख्यमंत्री कोण हे जाहीर करावे लागेल, या भीतीने महाविकास आघाडीचे मेळावे बंद झाले आहेत,” असा टोला भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.