ठाणे, दि. 20 : (Jitendra awhad) बंगल्यावर अभियंत्याला नेऊन बेदम मारणे, चित्रपटगृहात शो बंद पाडून प्रेक्षकाला बदडणे, महिलेचा विनयभंग करणे, असे नाना कारनामे करणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह 22 जणांवर खोट्या गुन्ह्याचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी अटक टाळण्यासाठी आ. आव्हाडांची अक्षरशः पळापळ सुरू आहे. अटक टाळण्यासाठी आव्हाडांनी ठाणे न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. शुक्रवार, दि. 20 सप्टेंबर रोजी न्यायालयात झालेल्या सुनावणीत दि. 3 ऑक्टोबर ही तारीख दिली आहे. दरम्यान, पीडित महिला रिदा रशीद यांनी आव्हाड व त्यांच्या हस्तकांवर अटकेची कारवाई होणार असल्याचा दावा माध्यमांशी बोलताना केला.
भाजपच्या महिला नेत्या रिदा रशीद यांनी जून महिन्यात आ. जितेंद्र आव्हाडांसह 22 जणांवर मुंब्रा पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याप्रकरणी अटक टाळण्यासाठी आव्हाड यांनी दोन दिवसांपूर्वी ठाणे न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. शुक्रवारी या अर्जावर ठाणे न्यायालयात सुनावणी होऊन पुढील सुनावणी दि. 3 ऑक्टोबर रोजी होणार असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. दरम्यान, या संदर्भात बोलताना रिदा रशीद यांनी, आ. आव्हाडांची पोलखोल झाली असून सर्व आरोपींना न्यायालयात धाव घ्यावी लागली. या सर्व आरोपीना नक्कीच सजा व्हायला पाहिजे. ज्या हिशोबाने यांनी कट रचून मला बदनाम केले. त्यांना नक्कीच सजा व्हायला पाहिजे. आव्हाड यांच्यासोबत जेवढे सुपारीबाज आहेत, ज्यांनी माझी सुपारी घेतली, त्यांनाही न्यायालयाकडून सजा मिळेल, असा विश्वास व्यक्त करीत यासाठी सातत्याने लढत राहण्याचा निर्धार बोलून दाखवला.
जामीन घेणार नाही म्हणणार्या आव्हाडांची जिरली
विनयभंगाच्या गुन्ह्यानंतर ‘जामीन घेणार नाही’ म्हणणार्या जितेंद्र आव्हाड यांची पोलखोल झाली असुन आता खोटे गुन्हे दाखल करून पीडित महिलेची प्रतारणा तसेच मानसिक छळ केला. त्याच गुन्ह्यात आव्हांडांना अटक टाळण्यासाठी धावाधाव करावी लागत असल्याने चर्चा रंगली आहे.