मुंबई : मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन सध्या जोरदार गाजत आहे. नुकतंच या घरात एविक्शन प्रक्रिया पार पडली. सुरुवातीपासून म्हटल्याप्रमाणे बिग बॉस यांनी यावेळी आपलं रुप बदललं असून त्यांनी यावेळी एकाचवेळी दोन सदस्यांना घराबाहेर केलं. योगिता चव्हाण आणि निखिल दामले यंदाच्या आठवड्यात बेघर झाले असून जाता जाता त्यांनी दिन सदस्यांना त्यांच्या म्युचूअल फंडचे नॉमिनी केले आहे.
या आठवड्यात अभिजीत, निखिल, योगिता आणि सूरज हे चौघेजण नॉमिनेट होते. यापैकी सुरुवातीलाच निखिलचं एविक्शन झालं. निखिलचं एविक्शन झाल्यावर योगिता घराबाहेर जाण्याचं रितेश देशमुखने जाहिर केल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला.
दरम्यान, गेल्या दोन आठवड्यात आर्या योगिताची चांगली मैत्रीण झाल्यामुळे योगिता बेघर झाल्यावर आर्याला अश्रू अनावर झाले होते.
रंगमंचावर योगिता आणि निखिलाचं रितेशने स्वागत केलं. यानंतर रितेशने या दोघांना एक मोठी पॉवर दिली. ती पॉवर म्हणजे या दोघांच्या नावे असलेले म्युच्युअल फंडचे कॉइन हे दोन्ही स्पर्धक दुसऱ्याच्या नावे करून त्यांना नॉमिनी करू शकतात. त्याप्रमाणे योगिताने आर्याला नॉमिनी केलं तर, निखिलने ही संधी धनंजय म्हणजेच डीपी दादांना दिली. त्यामुळे आता मिळालेल्या संधीचा वापर आर्या आणि धनंजय कशा प्रकारे करणार हे नव्या भागांमध्ये पाहायला हवं.