मुंबई : धर्मवीर आनंद दिघे यांचे जीवन मोठ्या पडद्यावर मांडणारा धर्मवीर १ आणि धर्मवीर २ हे चित्रपट प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र आहेत. नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धर्मवीर २... साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील तीन दिग्गज कलाकार अशोक सराफ, महेश कोठारे आणि सचिन पिळगांवकर उपस्थित होते. यावेळी सचिन यांनी भाषणात केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
सचिन पिळगावकर काय म्हणाले?
“साहेब, तुम्ही आज मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन दोन वर्ष झाली आहेत. मी मंगेशला विचारतोय, मुख्यमंत्री म्हणून दहाच वर्ष का? पुढे का नाही? मुख्यमंत्री साहेब तुम्ही या चित्रपटात काम केलंय, असं कळलं. तुमचं सिनेसृष्टीत स्वागत”, असं सचिन पिळगावकर म्हणाले. सचिन पिळगावकर यांच्या या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चित्रपटात खरंच काम केलंय का? त्यांनी खरंच काम केलं असेल तर ते सिनेमात मोठ्या पडद्यावर दिसतील का? अशा अनेक प्रश्नांनी लोकांना संभ्रमात पाडले आहे.
मंगेश देसाई काय म्हणाले?
चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांनी मुख्यंत्रिपदाची शपथ घेऊन दोन वर्षे पूर्ण झाली. माझी इच्छा आहे की ते दहा वर्षे मुख्यमंत्री रहावेत. मी बाप्पाच्या चरणी तशी प्रार्थना करतो. धर्मवीर २ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट असं सिनेमाचं नाव आहे. हा सिनेमा ९ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे”.
महेश कोठारे आणि अशोक सराफ काय म्हणाले?
महेश कोठारे म्हणाले की, “पहिला सिनेमा ही एक कमाल कलाकृती होती . आम्हाला वाटलं की अभिनेता क्षितीज हाच शिंदे साहेब आहे, असं वाटत होतं. २ वर्ष झाली, खरं तर तुमचं काम हे १० वर्षाचं काम केलं आहे. तुम्ही २० वर्ष मुख्यमंत्री राहा आणि महाराष्ट्र सुपरहीट काम करा. येताना मी कोस्टल रोडने आलो किती भारी काम केलं आहे”. तर अशोक सराफ म्हणाले की, “धर्मवीर चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचं शूटिंगही झाले आहे. पहिल्या धर्मवीरने एक वेगळी पसंती प्रेक्षकांनी दिली होती. आता धर्मवीर २ ची उत्सुकता आहे. हा चित्रपटही पहिल्या भागासारखा चांगला होईल”.