
संसदेत ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा सुरू असताना, भारतीय सुरक्षा दलांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधाराचा खात्मा केला आणि ‘ऑपरेशन महादेव’ पूर्णत्वास गेले. मात्र, या मोहिमेबद्दल फारसे कोठेही बोलले गेले नाही. म्हणूनच, या महत्त्वपूर्ण कारवाईची सविस्तर माहिती घेणे क्रमप्राप्त ठरते.ठवड्याच्या प्रारंभी संसदेत ‘ऑपेरशन सिंदूर’वर चर्चा सुरू असतानाच, पहिल्या श्रावण सोमवारी ‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत लष्कराने पहलगाम हल्ल्याचा ‘मास्टरमाईंड’ अर्थात मुख्य सूत्रधार सुलेमान शाह याचा खात्मा केल्याचे वृत्त धडकले. याच कारवाईत दहशतवादी अबू हमजा आणि यासिर हेदेखील मारले गेले. सुलेमान शाहवर २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. या कारवाईबाबतची माहिती लष्कराच्या ‘चिनार कॉर्प्स’ने त्यांच्या ‘एस’ हॅण्डलवर दिली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ हिंदूंची अतिशय निर्घृणपणे त्यांचा धर्म विचारून हत्या करण्यात आली. त्यामुळे या हल्ल्यात ज्यांनी सहभाग घेतला, अशा दहशतवाद्यांचा करण्यात आलेला खात्मा ही निश्चितच स्वागतार्ह बाब! मात्र, देशातील एकाही विरोधी पक्षाने या कारवाईचे स्वागत करण्याचे औद्यार्य दाखवले नाही. त्याउलट, विरोधी पक्षनेते राहुल गांधी संसदेत ‘पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कुठे आहेत?’ अशी विचारणा निलाजरेपणाने करताना दिसून आले. काँग्रेसी नेत्यांची मजल तर ‘हा हल्ला म्हणजे तमाशा आहे,’ असे म्हणण्यापर्यंत गेली. हे तेच नेते होते, ज्यांच्या पूर्वासूरींनी ‘हिंदू दहशतवाद’ देशात पेरण्याचा अपयशी प्रयत्न केला होता. मात्र, संसदेत एकीकडे ‘ऑपरेशन सिंदूर’वरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे पाप विरोधक करत असताना, लष्कराने यातील सहभागी दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. इतरवेळी विरोधकांच्या बिनबुडाच्या आरोपांना महत्त्व देणार्या, अमेरिका, पाक यांची तळी उचलून धरणार्या डाव्या माध्यमांनीही ‘ऑपरेशन महादेव’बद्दल सविस्तर वार्तांकन देण्याचे टाळले. म्हणूनच, या कारवाईची सविस्तर माहिती जाणून घेणे हे क्रमप्राप्त ठरते.
मुख्य म्हणजे, गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ऑपरेशन महादेव’मध्ये मारले गेलेले पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार अमरनाथ यात्रेला लक्ष्य करण्याचा कट रचत होते. गांदरबलच्या जंगलात लपलेल्या या दहशतवाद्यांचे ‘मॉड्यूल’ तांत्रिक मदतीने तसेच, गुप्तचर खात्याने दिलेल्या माहितीद्वारे शोधण्यात आले. गांदरबल हा अमरनाथ यात्रेकरूंसाठी महत्त्वाचा मार्ग असल्याने संवेदनशील असल्याचे मानले जाते.
लष्कराच्या अधिकार्यांच्या मते, गुप्तचर माहितीच्या आधारे लिडवास परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये अनेक तास चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले. ‘ऑपरेशन महादेव’ हे काश्मीर खोर्यातील दहशतवादाविरुद्धची एक मोठी मोहीम मानली जाते. "जे तीन दहशतवादी मारले गेले, त्यापैकी सुलेमान हा ‘लष्कर-ए-तोयबा’चा कमांडर होता आणि पहलगाम हल्ल्यात त्याचा सहभाग होता. हे तेच दहशतवादी होते, ज्यांनी बैसरन खोर्यात पर्यटकांची हत्या केली होती,” असे अमित शाह यांनी संसदेत स्पष्ट केले. या कारवाईबाबत जेव्हा सविस्तर खुलासा करण्यात आला, तेव्हा लष्कराने किती अचूकपणे मोहीम राबवली, हे स्पष्ट झाले.
पहलगाम हल्ल्यानंतर दि. २३ एप्रिल रोजी सुरक्षा बैठक झाली. सर्व सुरक्षा दलांसोबत झालेल्या या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील आरोपी पाकिस्तानात पळून जाऊ नयेत, यासाठी विशेष व्यवस्था केली गेली. तीन महिन्यांपासून सुलेमान, अफगाणी आणि जिब्रान हे दहशतवादी लपून बसले होते. हे तिघेही पाकी नागरिक असून, त्यांना पळून जाण्यापासून रोखण्याच्या सुरक्षा दलांच्या रणनीतीमुळे ते परत जाऊ शकले नाहीत. पहलगाम हल्ल्यानंतर काही तासांनी ही रणनीती आखली होती. "दहशतवाद्यांना पाकिस्तानात परतण्यात यश येऊ नये,” असे अमित शाह यांनीच सुरक्षा दलांना स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या होत्या. सुरक्षा दलांनी आठ किमीचा मार्ग निश्चित केला, ज्याचा वापर दहशतवादी पाकमध्ये परत जाण्यासाठी करू शकत होते. त्या भागात सुरक्षा वाढविण्यात आली. दहशतवाद्यांनी घुसखोरीसाठी वापरलेले गुप्त बोगदे सुरक्षा दलांनी शोधून काढले आणि त्यात पाणी भरण्यासाठी खोदकाम केले. यामुळे ते मार्ग बंद झाले. अशा रितीने त्यांना परत पाकमध्ये जाता येणार नाही, याची काळजी घेण्यात आली. अखेर सैन्याने त्यांचा शोध घेऊन त्यांचा खात्माही केला.
दाचीगाममध्ये दहशतवादी असल्याची माहिती लष्काराला मिळाली. मे ते दि. २२ जुलै या कालावधीत याची पुष्टी केली गेली. त्यानंतर या तीन दहशतवाद्यांना घेरण्यात आले. सुलेमान उर्फ फैजल जाट, अफगाण आणि जिब्रान या दहशतवाद्यांना म्हणूनच लष्कराने ठार केले. बैसरन येथील घटनास्थळावरून सापडलेली काडतुसे आणि लष्करी कारवाईतील काडतुसे यांची बॅलेस्टिक तपासणी करण्यात आली. रायफल्सही चंदीगढला पाठवण्यात आल्या. या सर्व तपासात हे तिघेही तेच दहशतवादी असल्याचे सिद्ध झाले. ‘ऑपरेशन महादेव’मध्ये सापडलेल्या गोळ्या आणि पहलगाममध्ये झाडल्या गेलेल्या गोळ्या एकच असल्याचे यातून निष्पन्न झाले.
या दहशतवाद्यांबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि. ५ जुलै रोजीपासून ही शोध मोहीम राबविण्यात आली. गांदरबलमध्ये भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि बीएसएफ यांनी संयुक्तपणे हे ऑपरेशन हाती घेतले. दहशतवाद्यांचा शोध सुरूच होता. या काळात ते स्वतःचे ठिकाण बदलत राहिले. सुरक्षा दलही त्यांचा सातत्याने माग काढत होते. अखेरीस, २४ दिवसांनंतर सुरक्षा दलांना यश मिळाले. रविवारी रात्री उशिरा मुलनार गावाजवळ महादेवच्या टेकड्यांमध्ये त्यांच्या हालचालींची माहिती मिळाली. सोमवारी सकाळी सुमारे १० वाजता दहशतवाद्यांचा नेमका ठिकाणा मिळाला. ‘ऑपरेशन महादेव’ या दहशतवाद्यांसाठी काळ ठरले आणि तिघांनाही कंठस्नान घालण्यात आले. त्यांच्याजवळ मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा सापडला. श्रीनगरच्या डाचीगाम जंगलाजवळ चालवल्या गेलेल्या या मोहिमेत सुरक्षा दलांना यात विदेशी शक्ती कार्यरत असल्याचे ठोस पुरावे मिळाले आहेत. चकमकीत ठार केलेल्या दहशतवाद्यांकडून जी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत, ती विदेशी आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कटाचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. यात विशेष उल्लेख ‘अमेरिकी एम४ कमांडो कार्बाईन’चा उल्लेख करावा लागेल. ‘नाटो’ दलांत तिचा मुख्यत्वे वापर केला जातो. भारतात यापूर्वी मोठ्या स्तरावरील प्रशिक्षित दहशतवादीच तिचा वापर करताना आढळले आहेत.
सोमवारी सकाळी सुमारे १० वाजता दहशतवाद्यांना टेकड्यांमध्ये शोधण्यात आले आणि त्यांना कंठस्नान घालण्यात आले. त्यांच्याजवळ मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा सापडला. श्रीनगरच्या डाचीगाम जंगलाजवळ चालवल्या गेलेल्या ‘ऑपरेशन महादेव’ या दहशतवादाविरोधी कारवाईदरम्यान सुरक्षा दलांना परदेशी कटाचे ठोस पुरावे मिळाले आहेत. चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून जी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत, ती अनेक देशांशी संबंधित आहेत, ज्यामुळे या नेटवर्कच्या आंतरराष्ट्रीय कटाचे स्पष्ट संकेत मिळतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन महादेव’ यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल सुरक्षा दले तसेच केंद्रीय गृहमंत्री यांचे विशेषत्वाने कौतुक केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ असो वा ‘महादेव’ देशातील विरोधक राजकीय स्वार्थासाठी सुरक्षा यंत्रणांच्या यशावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, ही अतिशय दुर्दैवी बाब. मात्र, केंद्र सरकारने पहलगाम हल्ल्याशी संबंधित सर्वांनाच चोख उत्तर देण्याचे काम केले आहे, असे आज निश्चितपणे म्हणता येते.