मालेगाव येथे २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल ‘एनआयए’च्या विशेष न्यायालयाने नुकताच दिला. त्या गुन्ह्यात हेतुपुरस्सर गोवण्यात आलेल्या सात आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. गुन्हा घडला असल्याने त्यामागील गुन्हेगार शोधून काढणे हे यंत्रणांचे कर्तव्य; पण म्हणून कारस्थान रचून कोणालाही आरोपीच्या पिंजर्यात उभे करून त्याचा अनन्वित छळ करणे, त्याची प्रतिमा मलीन करणे हा वावदूकपणा झाला. आता बाधितांकडून या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार का, हे लवकरच समजेल. तसे ते देण्यात आले, तरी त्यावर आक्षेप घेण्यात शहाणपण नाही. ते यासाठी की आता विशेष न्यायालयाने सातजणांची मुक्तता केली आहे, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले, तर या खटल्यातच नव्हे, तर तत्सम अनेक खटल्यांत तत्कालीन काँग्रेस सरकारने हिंदुत्ववाद्यांना हेतुपुरस्सर गोवले होते, याची सबळ पुष्टी होईल. परिणामतः काँग्रेसची अधिकच कोंडी होईल. त्यानिमित्ताने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी ‘एनआय’ विशेष न्यायालयाने नोंदवलेल्या निकालाची ठळक निरीक्षणे आणि काँग्रेसरचित ‘भगव्या दहशतवादा’च्या कपटी कथानकाचा पर्दाफाश करणारा हा लेख...आता आलेल्या निकालानंतर सावध प्रतिक्रिया देऊन काँग्रेसने आपल्या झालेल्या कोंडीचा प्रत्यय आणून दिला आहेच. मालेगाव बॉम्बस्फोटांचा तपास करणार्या दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) एक सदस्य मेहबूब मुजावर यांनी तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना ताब्यात घेण्याचा आपल्यावर दबाव असल्याचा गौप्यस्फोट केल्याने काँग्रेस सरकारचे मनसुबे चव्हाट्यावर आले. तथापि, मुद्दा केवळ मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा व निकालाचा नाही. व्यापक मुद्दा आहे तो ‘भगवा दहशतवाद’ नावाच्या एका कपटी कथानकाचा (नॅरेटिव्ह). विशेषतः २००४ ते २०१४ या काळात काँग्रेसने हे कथानक आक्रमकपणे पुढे नेले आणि काँग्रेसधार्जिण्या माध्यमांनी, संस्थांनी ते रेटले. केवळ मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालानेच नव्हे, तर यापूर्वीच्या हैदराबाद मक्का मशीद बॉम्बस्फोटापासून समझौता एसप्रेस बॉम्बस्फोट खटल्यापर्यंत न्यायालयीन निवाडे ‘भगवा दहशतवाद’ नावाच्या कपटी कथानकाच्या ठिकर्या उडवणारे आहेत. तेव्हा काँग्रेस व बेगडी सेयुलरवाद्यांच्या या कारस्थानाचा समाचार घेणे गरजेचे; मालेगाव निकालाच्या पार्श्वभूमीवर ते औचित्याचेही.
मतपेढीचे राजकारण‘भगवा दहशतवाद’ या कथानकाचा जन्म अजाणतेपणाने झालेला नाही. याची बीजे स्वातंत्र्यानंतर भारताच्या राजकारणाने घेतलेल्या वळणांमध्ये सापडतील. भारताला स्वातंत्र्य मिळाले, तरी ते फाळणीसह. तथापि, भारताने कधीही धर्माधिष्ठित राज्याची कल्पना केली नव्हती किंवा मांडलेली नव्हती. याचेही महत्त्वाचे कारण म्हणजे, भारत हा हिंदुबहुल आहे हेच होय. मात्र, हिंदूंच्या सहिष्णुतेचा वेगळाच अर्थ तत्कालीन काँग्रेस व सेयुलरवाद्यांनी काढला. तो मतपेढीच्या लालसेने! हिंदू समाज एकत्र येऊ शकत नाही, तेव्हा त्या भेदाभेदांचा फायदा करून घेताना मुस्लीम समाजाच्या एकगठ्ठा मतदानावर निवडणूक जिंकता येते, हा शोध त्यावेळच्या राजकारण्यांना लागल्याने हिंदू समाजाचा तेजोभंग आणि अल्पसंख्याक समाजाचे तुष्टीकरण हा प्रघातच झाला.
शाहबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल फिरविणारा कायदा राजीव गांधी सरकारने केला तो या लांगूलचालनाचा परिपाक. मात्र, हिंदू समाजाला एकत्र येऊ द्यायचे नाही; हिंदू समाजात जागृती होऊ द्यायची नाही हे काँग्रेस, डावे व सेयुलरवाद्यांचे मनसुबे हळूहळू निष्प्रभ ठरू लागले. १९७० साली भिवंडीत झालेल्या धार्मिक दंगलीनंतर ‘आता हिंदू मार खाणार नाहीत’ असा इशारा अटल बिहारी वाजपेयी यांनी दिला होता. १९९० सालच्या दशकात रामजन्मभूमी आंदोलनाने हिंदू समाजाच्या संघटनेचे आणि चैतन्याचे विलोभनीय दृश्य दिसले. मतपेढीच्या राजकारणाला तडे जाऊ लागले. काँग्रेसची सद्दी संपू लागली आणि भाजपला सत्तेची संधी मिळू लागली. हिंदुत्ववादी संघटनांना मिळणारा प्रतिसाद प्रचंड प्रमाणात वाढू लागला. हे सर्व सेयुलरवाद्यांना पसंत पडणेच नव्हे, तर पचनी पडणे शय नव्हते.
जगभरात इस्लामी दहशतवादाची झळ अमेरिकेपासून अनेक देशांना बसू लागली होती. भारतही त्यातून अस्पर्शित नव्हता. पण, तसे कबूल करणे म्हणजे, देशातील मुस्लीम समाजाला दुखावणे आणि मुख्य म्हणजे मतपेढीला पारखे होणे, याही चिंता असलेल्या काँग्रेस व सेयुलरवाद्यांना त्या संकल्पनेला बोथट करण्यासाठी काही आयुध हवे होते. त्यासाठी त्यांनी ‘भगवा दहशतवाद’ हे कपटी कथानक रचले. वास्तविक जगभरात झालेल्या कोणत्याही दहशतवादी हल्ल्यात हिंदूंचे नाव आलेले नाही. तेव्हा भारतातच हिंदू समाज दहशतवाद करेल, हे असंभवनीय. मात्र, काँग्रेस व सेयुलरवाद्यांची अगतिकता अशी की, हिंदू समाजाचे कार्य करणार्यांना रोखण्याकरिता आणि आपली परंपरागत मतपेढी जपण्याकरिता त्यांची मजल ‘भगव्या दहशतवादा’चे खोटेनाटे कथानक रचण्यापर्यंत गेली.
बनावट कथानकाची पायाभरणीया शब्दांचा प्रत्यक्ष वापर काँग्रेस नेत्यांनी कालांतराने केला असला, तरी त्या कथानकाचा जन्म काही वर्षे अगोदरच झाला होता असे दिसते. तोही एका हिंदूद्वेष्ट्या नियतकालिकात. विशेष म्हणजे, पाकिस्तानस्थित ‘सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अॅण्ड कॉन्टेम्पररी रिसर्च’ या ‘थिंक टँक’ने त्याची दखल घेतली होती. २००२ साली प्रवीण स्वामी या पत्रकाराने त्या पाक्षिकात लिहिलेल्या एका लेखात ‘भगवा दहशतवाद’ हा शब्द वापरला होता, असे या थिंक टँकच्या लेखात म्हटले आहे. दि. २३ जून २०२० रोजी या ‘थिंक टँक’चे सजाद अहमद यांनी ‘अंडरस्टॅण्डिंग सॅफ्रन टेररिझम’ नावाचा लेख त्यांच्या संकेतस्थळावर प्रकाशित केला होता. त्यात त्यांनी स्वामी यांच्या लेखाचा उल्लेख केला आहे. या सामी यांनी २००२ सालच्या दि. १६ मार्च रोजीत्या पाक्षिकात लिहिलेल्या लेखाचे शीर्षकच मुळी ‘सॅफ्रन टेरर’ असे आहे. मुस्लीम वस्त्यांमध्ये हिंदुत्ववादी दंगली करत आहेत, असा जावईशोध त्यांनी त्यातून लावला होता. याचीच री आंतरराष्ट्रीय माध्यमांनी ओढली. वास्तविक, गुजरात दंगलींच्या मुळाशी होता तो गोध्रा येथे कारसेवकांवर झालेला हल्ला. मात्र, तो मुद्दा बाजूला टाकून स्वामी यांच्यासारखे पत्रकार हिंदू समाजाच्या प्रतिक्रियेस ‘भगवा दहशतवाद’ ठरवून मोकळे झाले. काँग्रेसने तीच री ओढत पुढच्या चार-पाच वर्षांत घडलेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांत हिंदुत्ववाद्यांना गोवण्यास सुरुवात केली. त्यातूनच ‘भगवा दहशतवाद’ कथानकाला पुष्टी मिळणार होती आणि त्यामुळेच हिंदुत्ववाद्यांना लक्ष्य करून तुरुंगवासात घडविण्याची संधी मिळणार होती.
हिंदुत्ववाद्यांना गोवले२००७ साली हैदराबाद येथील मक्का मशिदीजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात; त्याचवर्षी अजमेर शरीफ दर्गा येथे झालेल्या बॉम्बस्फोटात व समझौता एसप्रेस बॉम्बस्फोटात; २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोटात; २००९ सालच्या गोवा बॉम्बस्फोटात हिंदुत्ववादी सामील असल्याचे चित्र काँग्रेसने तयार केले. तसे ते करण्यामागचा हेतू संघासह हिंदुत्ववादी संघटना, कार्यकर्ते यांना लक्ष्य करणे; त्यांचे खच्चीकरण करणे आणि त्यातून आपले मतपेढीचे राजकारण साधणे हाच होता. साहजिकच ते खटले जरी चालले, तरी त्यांतून काँग्रेस व सेयुलरवाद्यांना अपेक्षित असे काहीही निष्पन्न होऊ शकले नाही. याचे कारण त्या आरोपांत ना तथ्य होते, ना त्या खटल्यांना काही पाया होता. उलट या कपटी कथानकाच्या कहाण्या चव्हाट्यावर येऊ लागल्या. याचे एक कारण हेही होते की, त्या खटल्यांमध्ये ज्यांना गोवण्यात आले होते, अशांना न्यायालयांनी निर्दोष ठरविले. तेव्हा त्यांच्यावर दाखल खटले हे कपोलकल्पित होतेच; पण यंत्रणांचा गैरवापर करून दाखल करण्यात आले होते. या आरोपांना पुष्टी मिळू लागली. मालेगाव खटल्याचा निकाल आता आला आहे. पण, तत्पूर्वी स्वामी असीमानंद यांना अशाच छळातून जावे लागले होते. पानिपतजवळ समझौता एप्रेसमध्ये २००७ साली बॉम्बस्फोट झाला होता आणि त्यात काही पाकिस्तानी नागरिकांसह ६८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात स्वामी असीमानंद यांना गोवण्यात आले. त्याशिवाय २००७ सालामधील हैदराबाद मक्का मशीद बॉम्बस्फोट आणि अजमेर दर्गा बॉम्बस्फोट प्रकारणांतही त्यांना गोवण्यात आले होते. ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’ने २०११ साली १ हजार, ५०० पानी आरोपपत्र दाखल केले होते आणि २०१२ व २०१३ साली पुरवणी आरोपपत्र दाखल केली. त्यात आठजणांना आरोपी करण्यात आले होते; पण प्रत्यक्षात चार आरोपींवरच खटला चालला. त्यांतील एक स्वामी असीमानंद. ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’चा असा युक्तिवाद होता की, अक्षरधाम, जम्मूमधील रघुनाथ मंदिर, वाराणसी येथील संकट मोचन मंदिर येथे झालेल्या इस्लामी जिहादी दहशतवादी हल्ल्यांमुळे अस्वस्थ झालेले स्वामी असीमानंद सूडाच्या भावनेतून समझौता एस्प्रेस बॉम्बस्फोट कटात सामील झाले. न्यायालयाने स्वामी असीमानंद यांची निर्दोष सुटका केली. अन्य दोन खटल्यांतूनदेखील असीमानंद यांना निर्दोष ठरवीत, न्यायालयाने त्यांची मुक्तता केली होती. समझौता एसप्रेस खटल्याचा निकाल २०१९ साली आला. गोवा बॉम्बस्फोट प्रकरणातदेखील ‘सनातन’ संस्थेच्या कार्यकर्त्यांना विशेष न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले; पुढे उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाच्या निकालावर शिक्कामोर्तब केले. त्या बाबतीतदेखील तपास यंत्रणा पुरावे सादर करू शकले नाहीत. ज्या ज्या प्रकरणात हिंदुत्ववाद्यांना गोवण्यात आले, त्यापैकी कोणत्याच प्रकरणात तपास यंत्रणांना पुरावे गोळा व सादर करता येऊ नयेत, हा योगायोग नव्हे. क्षुद्र मनोवृत्तीने आणि राजकीय स्वार्थासाठी रचण्यात आलेल्या कारस्थानाचे हे ओंगळवाणे रूप होते.
कपटी कथानकाला काँग्रेसची फूसतोवर अनेक वर्षे काँग्रेस व सेयुलरवाद्यांनी भगव्या दहशतवादाची पिपाणी वाजवली होती. त्याचा उल्लेख प्रथम एका पत्रकाराने केला, तरी राजकीय स्वार्थासाठी त्या शब्दांचा आणि कथानकाचा वापर काँग्रेस नेत्यांनी २०१० सालापासून सर्रास सुरू केला. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी ऑगस्ट २०१० साली पोलीस अधिकार्यांच्या बैठकीत बोलताना ‘भगवा दहशतवाद’ शब्दाचा वापर केला. पण, चिदंबरम यांनीही तो शब्द वापरण्याची प्रेरणा बहुधा त्यांचे नेते राहुल गांधी यांच्याकडून घेतली असावी. २००९ साली तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी लिंटन यांच्यासाठी भोजन समारंभाचे आयोजन केले होते. तेथे राहुल गांधी उपस्थित होते आणि अमेरिकेचे राजदूत टिमोथी रोमर यांच्याशी बोलताना राहुल यांनी ‘लष्कर-ए-तोयबा’पेक्षा जास्त धोका हिंदू कट्टरवाद्यांकडून असल्याचे म्हटले होते. ही बाब ‘विकिलिस’च्या गौप्यस्फोटांवरून उघड झाली, तेव्हा काहूर माजले. तेव्हा राहुल यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला; पण असीमानंद यांच्यापासून प्रज्ञा ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांच्यापर्यंत अनेकांना काँग्रेसच्या काळात वेगवेगळ्या गुन्ह्यांत ज्या पद्धतीने बिनबुडाचे आरोप करून गोवण्यात आले, त्यावरून राहुल यांचे विधान काय ध्वनित करीत होते, याची कल्पना येऊ शकते.
चिदंबरम यांच्यानंतर गृहमंत्री झालेले सुशीलकुमार शिंदे यांनी तर २०१३ साली बोलताना ‘समझौता एसप्रेस’पासून अन्य बॉम्बस्फोटांत रा. स्व. संघ व भाजपचा हात असल्याचा गंभीर आरोप केलाच; पण दहशतवाद पसरविण्यासाठी संघ प्रशिक्षण वर्ग आयोजित करत असल्याची गरळही ओकली. वास्तविक, या स्फोटांत पाकिस्तान, ‘लष्कर-ए-तोयबा’ अथवा "सिमी” संघटना यांचा हात असल्याचे पुरावे असतानाही त्यांकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करण्यात आला. हैदराबाद येथील मक्का मशीद बॉम्बस्फोटानंतर तेथील पोलिसांनी शंभरेक मुस्लीम संशयितांना ताब्यात घेतले होते. मात्र, नंतर ‘भगवा दहशतवाद’ कथानकाला पुष्टी मिळावी, म्हणून त्या १०० जणांना केवळ सोडून देण्यात आले नाही, तर आंध्र प्रदेश सरकरने त्यांना भरपाई देण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ‘भगव्या दहशतवादा’चे कथानक कसे पद्धतशीरपणे पेरले आणि त्याची तितकीच पद्धतशीर अंमलबजावणी करण्यात येत होती, याचा प्रत्यय येईल.
सुशीलकुमार शिंदे यांनी २०१३ साली जयपूर येथे पक्षाच्या झालेल्या चिंतन शिबिरात ‘भगव्या दहशतवादा’ची चर्चा केली. त्यात नेमके कोणते चिंतन होते, याचा थांगपत्ता त्यांनी लागून दिला नसला, तरी राजकीय स्वार्थ नक्की होता, हे लपून राहिले नाही. काँग्रेसचे आणखी एक उल्लूमशाल नेते दिग्विजय सिंह यांनी दहशतवादी झाकीर नाईकचा उल्लेख ‘शांतिदूत’ असा केला होता आणि ओसामा बिन लादेनला ‘ओसामाजी’ असे संबोधले होते. (पान ४ वरुन) हे केवळ जीभ घसरल्याने झाले असे नाही, तर त्यामागची मनोवृत्तीच सडकी असल्याने ते ओठांवर आले. त्याच दिग्विजय सिंह यांनी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी ‘एटीएस’ प्रमुख हेमंत करकरे यांची हत्या इस्लामी दहशतवाद्यांनी नव्हे, तर हिंदू दहशतवाद्यांनी केल्याचा आरोप केला होता. पुढे त्या हल्ल्यात पाकिस्तानच सामील असल्याचे सिद्ध झाले; कसाबला फाशीची शिक्षा झाली, तेव्हा खरे म्हणजे दिग्विजय सिंह यांचा मुखभंग झाला. तथापि, मुंबई दहशतवादी हल्ला असो वा मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल; त्यानंतर काँग्रेसने आपल्या अगोदरच्या वक्तव्यांसाठी व कृत्यांसाठी माफी मागितल्याचे उदाहरण नाही.
कथानकाचा प्रतिवादपरंतु, काँग्रेसने तेवढा उमदेपणा दाखविला नाही, तरी काँग्रेसने पसरवलेल्या या कपटी कथानकाचा प्रतिवाद अनेकांनी मधल्या काळात आक्रमकपणे केला. त्यांतील काही पुस्तकांचा उल्लेख येथे करणे उचित ठरेल. आर. व्ही. एस. मणी यांनी २०१८ साली ‘दि मिथ ऑफ हिंदू टेरर: इन्साईडर अकाऊंट ऑफ होम अफेयर्स २००६-२०१०’ नावाचे पुस्तक लिहिले. मणी हे केंद्रीय गृहखात्यात अधिकारी होते आणि २००६ ते २०१० सालादरम्यान अंतर्गत सुरक्षा विभागात कार्यरत होते. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात हिंदुत्ववाद्यांना गोवण्यासाठी त्यांच्यावर कसा दबाव सत्ताधार्यांकडून आणण्यात येत होता, त्याचा खळबळजनक इतिवृत्तांत त्यांनी दिला आहे. दहशतवादी हल्ल्यांत इस्लामी दहशतवाद्यांचा हात असल्याचे ढळढळीत दिसत असतानाही काँग्रेसच्या मंत्र्यांनी ते कथानक बदलून त्याला ‘भगव्या दहशतवादा’चा चेहरा देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. ‘भगव्या दहशतवादा’चे कथानक पुढे रेटण्यासाठी बनावट कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आला; रा. स्व. संघाच्या पाच पदाधिकार्यांना गोवण्यासाठी आपल्याला दबाव टाकण्यात आला इत्यादी गौप्यस्फोट मणी यांनी केले आहेत. मालेगाव बॉम्बस्फोटात ‘हल-ए-हदीथ’ नावाच्या कट्टरवादी मुस्लीम संघटनेचा हात असल्याची प्रारंभिक माहिती मिळाली असूनही, नंतर तथ्यांना तिलांजली देत हिंदुत्ववाद्यांना त्यात गोवण्यात आले; हेतू हाच की ‘भगव्या दहशतवादा’चे कथानक पुढे रेटता यावे आणि हिंदूंनादेखील ते खरे वाटण्यास सुरुवात व्हावी. भारतीय लष्करातील गुप्तहेर विभागात दीर्घकाळ काम केलेले कर्नल कंवल खतना यांनी लिहिलेल्या ‘दि गेम बेहाईंड सॅफ्रन टेरर’ पुस्तकाची सुरुवात २००६ साली काँग्रेस मुख्यालयात रचण्यात आलेल्या कारस्थानाच्या माहितीपासून होते. या पुस्तकात आंतरराष्ट्रीय दहशतवादावर भाष्य असले, तरी ‘भगवा दहशतवाद’ हे एक मिथक आहे आणि ते रचण्यामागे स्वार्थी कारस्थान आहे, असा दावा करण्यात आला आहे. ‘ऑर्गनाईझर’ साप्ताहिकाला अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत कर्नल खतना यांनी २००६ सालामधील नांदेड बॉम्बस्फोटातदेखील रा. स्व. संघ, ‘बजरंग दल’ यांसारख्या हिंदुत्ववादी संघटनांना गोवण्याचा काँग्रेस सरकारचा दबाव आणण्यात येत असल्याचा खुलासा केला आहे. अनुप सरदेसाई यांच्या ‘अॅन इनव्हिजिबल हॅन्ड बिहाईंड सॅफ्रन टेरर’ या पुस्तकातदेखील अस्तित्वात नसलेल्या ‘भगव्या दहशतवादा’चे बनावट कथानक पुढे रेटण्यात कोणत्या शक्ती कारणीभूत व आघाडीवर आहेत, याचा पाढा वाचण्यात आला आहे. हे पुस्तक काल्पनिक घटनांवर आधारित असल्याचे म्हटले जात असले, तरी त्यातून ‘भगव्या दहशतवादा’च्या कथानकाचा करण्यात आलेला प्रतिवाद महत्त्वाचा आणि अनेकांच्या डोळ्यांत अंजन घालणारा.
मनसुब्यांच्या ठिकर्याहैदराबाद मक्का मशीद बॉम्बस्फोट प्रकरणापासून मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणापर्यंतच्या सर्व खटल्यांत हिंदुत्ववाद्यांचा कोणताही हात नसल्याचे न्यायालयानेच मान्य केले आहे. ज्यांना यात गोवण्यात आले होते, त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली असली, तरी इतया प्रदीर्घ काळ आरोपींची झालेली बदनामी; शारीरिक छळ, मानसिक खच्चीकरण हे दुर्लक्ष करता येण्याजोगे नाही. आपल्या मतपेढीच्या राजकारणासाठी ‘भगव्या दहशतवादा’चे कुभांड रचण्यामागे हेतू केवळ आपल्या मतपेढीची चिंता हा नव्हता; हिंदू धर्माची बदनामी; हिंदुत्ववाद्यांना लक्ष्य करणे; हिंदू समाजाची दिशाभूल करणे हा होता. तो हेतू सफल झाला नाहीच; उलट त्या मनसुब्यांच्या ठिकर्या उडाल्या. आता काँग्रेस, डावे, सेयुलरवादी आणि त्यांची माध्यमे यांनी वरकरणी आपल्याला उपरती झाल्याची कितीही सारवासारव केली, तरी हिंदू समाजाची बिनशर्त माफी, हे त्या कपटाचे काही अंशी प्रायश्चित्त असू शकते.
९८२२८२८८१९
राहूल गोखल