आपला अभ्यासाचा विषय सोडून ज्या विषयाची माहिती नाही, अशा विषयांवर बेताल आणि बेछूट विधाने फक्त भारतीय बुद्धिजीवीच करतात. अमर्त्य सेन हे नावाजलेले अर्थतज्ज्ञ असले, तरी त्यांनी आजवर भारतातील राजकीय स्थितीवर व्यक्त केलेल्या मतांनी फक्त वादच निर्माण केले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर त्यांनी व्यक्त केलेले विचार हे त्यांची राजकीय आणि सामाजिक समज किती संकुचित, अपूर्ण आणि अतर्क्य आहे, तेच दाखवून देते.
एखाद्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या व्यक्तीला जगातील सर्व विषयांतील सर्व काही कळते, अशी बहुतेक भारतीयांची धारणा. पण, वस्तुस्थिती याच्या नेमकी उलट. नोबेल पुरस्कारविजेते अमर्त्य सेन हे भारतविरोधी वक्तव्यांबद्दल प्रसिद्ध असून, त्यांनी आजवर भारतासंबंधी वादग्रस्त विधानेच अधिक केली आहेत. याचे कारण सेन यांना आपल्या विधानांद्वारे एक हिंदूविरोधी आणि भारतविरोधी अजेंडा स्थापित करायचा असतो. आताही त्यांनी काहीही कारण नसताना लोकसभा निकालांवर वादग्रस्त भाष्य केले आहे. “भारत हे हिंदूराष्ट्र नाही, हे नुकत्याच लागलेल्या लोकसभा निवडणुकांच्या निकालांतून स्पष्ट झाले आहे,” असे विधान सेन यांनी केले. मुळात हिंदूराष्ट्र हा लोकसभा निवडणुकांचा विषयच नव्हता. त्यामुळे या निकालांनी, भारतीयांनी हिंदूराष्ट्राला नाकारले आहे, असे म्हणणे हे अतिशयोक्ती आणि विपर्यस्तच.
तसेच हिंदूराष्ट्र म्हणजे नेमके काय, हेही अजून सर्वमान्य नाही. काहीजणांना अफगाणिस्तान ते म्यानमारपर्यंतचा प्रदेश एक करून अखंड भारत पुन्हा निर्माण करायचा असून तसे घडले, तरंच खरा भारत स्थापन होईल, अशी त्यांची भावना आहे. काहीजण विद्यमान भारतालाच हिंदूराष्ट्र समजतात. उलट, काही काँग्रेसजन तर भारताला एक देशच मानत नाहीत. त्यांच्या मते, भारत हा विविध राज्यांना एकत्र करून बनलेला भूप्रदेश आहे. भारताबद्दल अशा विविध संकल्पना असून हिंदूराष्ट्र ही एक अमूर्त सांस्कृतिक संकल्पना आहे. तिचे निकष निश्चित नाहीत. त्यामुळे भारत हे हिंदूराष्ट्र नाही, हे सेन कशाच्या आधारावर म्हणतात, ते कळायला मार्ग नाही. कदाचित, भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष असून या निवडणुकीत त्याला स्वबळावर बहुमत मिळाले नाही, म्हणजे हिंदुत्ववादी विचारांचा पराभव झाला, अशी काहीशी सोपी व्याख्या सेन यांनी केली असावी. तसे असेल, तर त्यांच्या राजकीय संकल्पना किती बालीश आहेत, तेच दिसून येते.
एखाद्या विशिष्ट क्षेत्रात नाव कमावलेल्या व्यक्तींनी सामान्यत: आपल्याच विषयाशी संबंधित विधाने करावीत, असा संकेत. पण, काही व्यक्तींना आपल्या अभ्यासाच्या विषयाबाबतही पुरेशी माहिती नसते. रघुराम राजन यांच्यासारख्या अर्थतज्ज्ञाला तर आर्थिक क्षेत्राचीही पुरेशी माहिती नसल्याचे दिसून आले आहे. दोन वर्षांपूर्वी राजन यांनी भारत पाच टक्केही विकासदर साध्य करू शकणार नाही, असे विधान केले होते. पण, भारताने गेली चार वर्षे सरासरी सात टक्के दराने विकास साध्य केला आहे. अजूनही करीत आहे. ज्या नामवंत व्यक्तींनी पाश्चिमात्य विद्यापीठांतून उच्च आर्थिक शिक्षण घेतले आहे, अशा व्यक्तींचे भारताच्या आर्थिक विकासाबद्दलचे अंदाज हे बहुतांश खोटेच ठरतात, असे दिसून आले आहे. कारण, हे कथित अर्थतज्ज्ञ पाश्चिमात्य देशांना लागू होणारे निकष भारतासारख्या देशाला लावण्याची चूक करतात. भारताची आर्थिकच नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक स्थिती अगदी वेगळी आहे. त्यामुळे कोणत्याही समस्येवर पाश्चिमात्य देशांतील घडामोडींसारखी प्रतिक्रिया भारतात उमटत नाही. पण, भारतातील सामाजिक वास्तवाशी नाते नसलेल्या व्यक्तींकडून हे समजून घेण्याची अपेक्षाच ठेवता येणार नाही. अमर्त्य सेन यांच्याबाबतही हे लागू होते. असो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच बिहारमधील नालंदा विद्यापीठाचे पुनरुज्जीवन करण्यात आले. यापूर्वी केंद्रातील संपुआ सरकारने 2007 मध्ये सेन यांची नालंदा विद्यापीठाचे कुलपती म्हणून नियुक्ती केली होती. स्वायत्ततेच्या नावाखाली सेन यांना अमर्याद अधिकार बहाल करण्यात आले होते. सेन यांनी केलेल्या कोणत्याही खर्चाचा हिशेब देणे त्यांच्यावर बंधनकारक नव्हते. त्यांना मासिक पाच लाख रुपये पगारही दिला जात होता. 2007 ते 2014 या आपल्या सात वर्षांच्या कार्यकाळात सेन यांनी या विद्यापीठावर तब्बल 2,730 कोटी रुपये खर्च केले. ते कशावर केले, त्याची कसलीही नोंद नाही किंवा त्याचा दृश्य आविष्कारही नाही. या विद्यापीठात त्यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या दोन्ही कन्यांची अतिथी प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली.
पण, यापैकी कोणीही कधीच तेथे जाऊन शिकविले नाही. त्या सर्व कायम अमेरिकेत वास्तव्यास होत्या आणि भरघोस पगारही घेत होत्या. त्या विद्यापीठात कोणतेही नवे संशोधन सुरू नव्हते. तरीही 2730 कोटी रुपये खर्च झाले. त्याबाबत सेन यांना जाब विचारता येत नाही, कारण भारत सरकारने त्यांना तसा अधिकार दिला होता. एखाद्या व्यक्तीने मोठा पुरस्कार मिळविला तरी तो त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा किंवा चरित्राचा निदर्शक नसतो. अशी व्यक्ती मनाने भ्रष्टही असू शकते. गेल्या काही वर्षांत नोबेल पुरस्काराची विश्वासार्हता आणि शान पूर्णपणे लयाला गेली आहे, ती सेन यांच्यासारख्या अजेंडाधारी व्यक्तींना हे पुरस्कार बहाल केल्यामुळेच, असे म्हटले तर ते वावगे ठरु नये.
अमर्त्य सेन यांच्याप्रमाणेच नोबेल पुरस्कार मिळालेले दुसरे भारतीय आहेत व्ही. एस. नायपॉल. नायपॉल हे धर्माने हिंदू व भारतीय वंशाचे. पण, ते कधी भारतीय नागरिक नव्हते. त्यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला. ते त्रिनिदाद अॅण्ड टोबेगो या कॅरिबियन (दक्षिण अमेरिकेजवळ) देशाचे नागरिक होते. त्यांनी आपल्या ‘इंडिया : ए वुण्डेड सिव्हिलायझेशन’ नावाच्या पुस्तकात भारतीयांच्या मानसिक गुलामगिरीचे चपखल वर्णन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की भारतीय हे एकमेव लोक आहेत, जे परकीयांनी लिहिलेल्या आपल्या इतिहासाला खरा मानतात.
त्यातही विलक्षण बाब म्हणजे, ज्यांनी त्यांना गुलाम बनविले आणि त्यांच्यावर राज्य केले, त्या ब्रिटिश लेखकांनी लिहिलेला भारताचा इतिहास भारतीय प्रमाणभूत मानतात, पण भारतीय इतिहासकारांनी लिहिलेल्या इतिहासावर वाद निर्माण करतात. नायपॉल आणि अमर्त्य सेन यांच्यात किती फरक आहे, ते यावरून दिसून येईल. अमर्त्य सेन भारतात राहिलेले भारतीय आहेत, पण नायपॉल हे भारताचे नागरिक कधीच नव्हते. तरीही सेन यांच्यापेक्षा नायपॉल यांचे भारतीयांबद्दलचे आकलन किती सत्य आहे, ते दिसून येते. सेन यांच्या वक्तव्याने भारतीयांच्या जीवनात फरक पडत नसला, तरी ते भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर बिघडवतात. त्यासाठीच त्यांच्या वक्तव्याचा लेखाजोखा घेणे भाग पडते.