मुंबई, दि.२५ : प्रतिनिधी मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रो ३चा पहिला टप्पा आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा मुंबईकरांसाठी सज्ज होतो आहे. भारतीय रेल्वेच्या संशोधन डिझाइन आणि मानक संघटना (RDSO) ने कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यासाठी चाचणी सुरू केली होती. ही चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली असल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल)ने दिली. सोमवार, दि.२४ जून रोजी या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.
यानंतर आता प्रवासी सेवा सुरू करण्याच्या परवानगीसाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (CMRS) यांच्याकडे संपर्क साधेल. CMRS कडून परवानगी मिळाल्यानंतर, सुरक्षा नियम आणि ऑपरेटिंग मानकांचे पूर्ण पालन सुनिश्चित केल्यानंतरच व्यावसायिक कामकाज सुरू केले जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया जुलै अखेरीपर्यंत चालण्याचा अंदाज आहे. मुंबईकर या मार्गाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मुंबईतील ही पहिली भूमिगत मेट्रो आहे, जी मुंबईकरांना अविस्मरणीय प्रवास देईल आणि रहदारीही कमी करेल. मुंबई मेट्रो लाइन-३ ही 'कुलाबा-वांद्रे-सिप्झ' अशी ३३.५ किमीची भूमिगत मेट्रो आहे. यामध्ये २७ प्रमुख स्थानके समाविष्ट आहेत, त्यापैकी २६ भूमिगत आणि १ उन्नत आहे.
पहिल्या टप्प्यातील स्टेशन
1. आरे
2. सीप्झ
3. एमआयडीसी
4. मरोळ नाका
5. CSMI T2
6. सहार रोड
7. CSMI T1
8. सांताक्रूझ
9. विद्यानगरी
10. बीकेसी