नरेंद्र मोदी - शेख हसीना यांची द्विपक्षीय बैठक; 'या' महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर झाली चर्चा
23-Jun-2024
Total Views | 28
नवी दिल्ली: बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यात शनिवार, दि. २२ जून २०२४ द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारत-बांगलादेश परस्पर सहकार्याच्या दीर्घकालीन अजेंडाला अंतिम रूप दिले.
बैठकीनंतर भारत आणि बांगलादेश यांच्याकडून 'व्हिजन फॉर द फ्युचर' नावाचा एक दस्तऐवज जारी करण्यात आला. यामध्ये भारताने बांगलादेशच्या अनेक मागण्या मान्य केल्या असतानाच बांगलादेशनेही आपल्या शेजारी देशाचे हित लक्षात ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. दोन्ही देशांनी दीर्घकालीन हित लक्षात घेऊन संरक्षण सहकार्याचे धोरण बनवण्याबाबत चर्चा केली आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील लष्करी आणि संरक्षण सहकार्य कमी आहे. आता भारताच्या सहकार्याने बांगलादेशचे सैन्य अत्याधुनिक होईल, बांगलादेशच्या गरजेनुसार संरक्षण उपकरणे तयार होतील आणि एकूणच संरक्षण क्षमता वाढवली जाईल. भारताने कोणत्याही शेजारी देशाशी असे संरक्षण सहकार्य केलेले नाही.
भारताने बांगलादेशची जुनी मागणी मान्य करून भारतीय रेल्वेच्या माध्यमातून भूतान आणि नेपाळसोबत व्यापार करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे बांगलादेशची निर्यात वाढण्यास मदत होईल. दोन्ही देशांमध्ये लवकरच विशेष व्यापार करार करण्याचीही तयारी सुरू आहे. भूतान, नेपाळ आणि बांगलादेश यांच्यात समान बाजारपेठ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. पुढे म्यानमार, श्रीलंका इत्यादी शेजारी देशही याच्याशी जोडले जाऊ शकतात.