संत नामदेव हे पहिले राष्ट्रीय संतकवी आहेत. ते मराठीएवढेच हिंदी भक्ती साहित्यामध्येही ख्यातकीर्त. गुरू नानक, कबीर, रवीदास हे त्यांना गुरुस्थानी मानतात, ही त्यांची थोरवी. हिंदी भाषेतील भक्ती साहित्याचे व रामोपासनेचे संत नामदेव हे प्रवर्तक मानले जातात. नामदेवांचे राष्ट्रीय योगदान समस्त मराठीजनांना अभिमानास्पद आहे. मराठीतील सगुणोपासक नामदेव, हिंदीमध्ये निर्गुणोपासक रामभक्त आहेत.संत नामदेवांच्या अभंगगाथेतील ‘रामकथा माहात्म्य’चा काही भाग आपण मागील लेखात पाहिला. उर्वरित भाग पाहून नामदेवांच्या हिंदी पदातील रामदर्शन घेऊ.
रामकथा माहात्म्य’ कथनपर एकूण २७ अभंगांमध्ये कौसल्यादी राण्यांचे डोहाळे, रामजन्माशिवाय नामदेवांनी सीतास्वयंवर (१ अभंग), सीतेसह रामाचे अयोध्या आगमन (२ अभंग), चित्रकूट वर्णन (३ अभंग), रामनाम माहात्म्य कथन (१ अभंग) असे विषय कथन केलेले आहेत. या उपरोक्त प्रसंगाच्या वर्णनात नामदेवांनी ‘वाल्मीकी रामायणाबाहेरील काही पौराणिक प्रचलित कथांचा आश्रय केलेला आहे. रामाचा उल्लेख नामदेवांनी ‘पिता’ असा केला असून, सीतेला माता व लक्ष्मणाला ‘चुलता’ म्हणून संबोधले आहे.
राम पिता, सीता माता। लक्ष्मण सोयरा चुलता ॥१॥
नामा म्हणे माझे गोत। चित्रकुटी असे नांदत ॥३॥ (अ.क्र.३१३)
चला चित्रकुटी जाऊ। राम दशरथाचा पाहू ॥३॥
अयोध्ये केला अवतारू। राम नाम या दातारू॥४॥ (अ.क्र.३१४)
रामकथा माहात्म्यातील अभंगात नामदेव रामनामाचे म्हणजेच नामभक्तीचे श्रेष्ठत्व प्रतिपादन करतात. त्यापैकी एक अभंग ४४ चरणांचा आहे. ‘श्रीराम सोयरा आला माझ्या घरा। दिधला म्या थारा हृदयी माझ्या॥१॥’ असा तो अभंग असून त्यामध्ये नामदेव रामाचा उल्लेख ‘केशव’ या नावाने करतात. विठ्ठलाच्या (केशव, माधव, गोविंद आदि) २४ प्रमुख नावांपैकी ‘केशव’ हे नाव संत नामदेवांच्या विशेष आवडीचे-जिव्हाळ्याचे आहे. ‘नामा म्हणे केशवा....’ अशा नाममुद्रेचे शेकडो अभंग आहेत.
‘विठ्ठलस्तुती’ प्रकरणातील रामदर्शन
संत नामदेवांनी ‘विठ्ठलस्तुती आणि भक्तवत्सलता’ या प्रकरणात विठ्ठलाची महाविष्णूंचा अवतार म्हणून स्तुती केलेली असून भक्तासाठी तो कसा धावून येतो, त्याच्या कथा सांगून विठ्ठलाची भक्तवत्सलता दर्शविली आहे. या प्रकरणात विठ्ठलासमवेतच श्रीरामाची विष्णूंचा अवतार म्हणून तसेच दशरथपुत्र म्हणून स्तुती केलेली आढळते. ‘अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी।’ या चरणाने नामदेव अभंगाचा प्रारंभ करतात आणि या अभंगात रामाचे वर्णन पुढीलप्रमाणे करतात-
सीतेचिया काजा रावण मर्दिला। सूर्यवंशी झाला रामचंद्र ॥९॥
अयोध्या नाम नगरी। जन्म कौसल्येच्या उदरी।
देवभक्ताचा कैवारी। दशरथनंदन राघव ॥१४॥
राम त्रैलोक्य वीर दारूण। तेथे वधिला रावण।
अढळपद देऊन । राज्यी बिभीषण स्थापिला॥१५॥ (अ.क्र.४४३)
या रामावतारात भक्त बिभीषणाचे रक्षण करून त्याला लंकेचे राज्य देऊन रामाने आपली भक्तवत्सलता दाखवून दिली. एवढेच नव्हे तर ‘परित्राणाय साधूनाम्।’ हे अवतारकार्याचे ब्रीद खरे करून दाखवले.
शिवस्तुती आणि रामनाम
संत नामदेवांनी ‘रामकथा माहात्म्य’ नावाचे स्वतंत्र प्रकरण लिहिले. तसेच ‘विठ्ठलस्तुती’ प्रकरणातही अनेक अभंग रामस्तुतीपर लिहिले, हे आपण पाहिलेच, पण नामदेवांची रामभक्ती इथेच थांबत नाही तर ते ‘शिवरात्र माहात्म्य व शिवस्तुती’ प्रकरणांतही रामाविषयी अभंग लिहून आपल्या रामभक्तीचे पुन्हापुन्हा दर्शन घडवतात.
‘शिवरात्र व शिवस्तुती’ हे ६० अभंगांचे प्रकरण आहे. शिवाचे वर्णन करताना या प्रकरणात नामदेव म्हणतात, भगवान शिव हे सर्वकाळ रामनामाचा जप करतात. ‘कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती’ अशा चरणाने नामदेव शिवस्तुतीच्या अभंगाचा प्रारंभ करतात आणि पुढे म्हणतात-
मैत्राचा पै मंत्र। बीज नाम हरीचे। तेचि हे शिवाचे।
रामनाम॥२॥ (अ.क्र.७६६)
आपण शिव आणि शक्ती। रामनाम ते जगती॥३॥ (अ.क्र.६४७)
शंभू उपदेशी भवानीसी। रामनाम जपे मानसी॥१॥ (अ.क्र.७१९)
नामा म्हणे ध्यान शिवाचे उत्तम। मंत्र हा परम रामनाम॥४॥ (अ.क्र.७८५)
अशा प्रकारे पार्वतीसह शिवशंकर रामनाम मंत्राचा जप करतात की, जो मंत्र सर्व जीवांना उद्धारक आहे. खुद्द पार्वतीदेवीला भगवान शिवानी रामनामाचा उपदेश केला, असेही नामदेव म्हणतात.
नामदेवांच्या हिंदी पदामधील ‘रामदर्शन’
संत नामदेवांची थोरवी म्हणजे हिंदी साहित्यातील संतमताचे ते आद्यप्रवर्तक मानले जातात. उत्तर भारतातील संत कबीर, संत नानकदेव, संत रविदास, संत दादू, संत मलुकदास, संत सुंदरदास आणि संत रामानंद यांना संत नामदेव हे गुरुस्थानी आहेत. या सर्व संतांनी नामदेवांच्या कार्याची कृतज्ञतापूर्वक आपल्या काव्यात स्तुती केलेली आहे. संत नामदेवांची २५० पदे हिंदीमध्ये असून, त्यापैकी ६१ पदांना शिखांच्या धर्मग्रंथात, ‘गुरू ग्रंथसाहिब’मध्ये अढळ स्थान प्राप्त झालेले आहे. प्रत्येक महाराष्ट्रीयाला अभिमान वाटावा असेच संत नामदेवांचे हे राष्ट्रीय-सांस्कृतिक, साहित्यिक कार्य आहे.
संत नामदेवांच्या हिंदी काव्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते निर्गुणोपासक आहेत. त्यांचे मराठी अभंग हे सगुणोपासक आहेत.
राम जुहारि न और जुहारि। जीवनि जाइ जनम कत हारौ॥१॥
आन देव सौ दीन न भाषौ। राम रसायन रसना चाषौ॥२॥
थावर जंगम कीट पतंगा। सत्य राम सब हिन के संगा॥३॥
भगत नामदेव जीवनि रामा। आनदेव फोकट बेकामा॥४॥
ऐसे रामहि जानौ रे भाई।’
संत नामदेवांची ही हिंदी पदं विशेष प्रसिद्ध आहेत. नामदेव म्हणतात, मला रामनाम रूपी नऊनिधी प्राप्त झाल्याने आता मला कसलेच बंधन उरलेले नाही.
राम भगति बिना गति न तिरन की। बिना राम हूं कैसे जीऊंं॥
संत नामदेवांच्या या वरील हिंदी पदांतून ‘रामनाम’ विषयीची त्यांची श्रद्धा, निष्ठा, भक्ती यांचे वैशिष्ट्यपूर्ण दर्शन घडते. रामनामाचे रसायन, रामनामाचे अमृत, रामतत्त्व हेच जीवन, सर्वव्यापी राम, रामनामाच्या नऊ निधीची प्राप्ती आणि त्यामुळे बंधमुक्त अवस्था. या गोष्टी खूप काही सांगणार्या आहेत. त्यामागे खूप मोठा व्यापक अर्थ आहे. तो समजून घेतला की, आपणास उत्तर भारतातील वैष्णव भक्तिधारेतील रामोपासक शाखेचे संत नामदेवांना मुख्य, आद्यअध्वर्यू का मानले जाते, ते लक्षात येते.
॥ जय श्रीराम ॥
(पुढील अंकात : संत नामदेव शिष्यांची ‘रामभक्ती’)
-विद्याधर ताठे
९८८१९०९७७५