मुंबई, दि.२३ : प्रतिनिधी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता करभरणा करण्याचा अंतिम दि. शनिवार २५ मे आहे. या मुदतीत करभरणा न करणाऱ्या मालमत्ताधारकांच्या थकीत करावर दरमहा २ टक्के दंड आकारला जाईल, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. करभरणा करण्याचा अंतिम देय दिनांकापर्यंतचा कालावधी लक्षात घेता नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून गुरुवार, दिनांक २३ आणि शुक्रवार, दिनांक २४ मे रोजी सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत तसेच शनिवार, दिनांक २५ मे २०२४ रोजी सकाळी ८ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत नागरी सुविधा केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दिलेल्या मुदतीत करभरणा करावा आणि दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून वेळोवेळी करण्यात आले. तथापि, अंतिम देय दिनांक जवळ येऊनही अद्यापही करभरणा न केलेल्या मालमत्ताधारकांकडे तीन दिवसांचा (दिनांक २५ मे २०२४ पर्यंत) कालावधी शिल्लक आहे. अशा मालमत्ताधारकांनी दिनांक २५ मे २०२४ रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत करभरणा न केल्यास त्यानंतर त्यांच्या थकीत करावर दरमहा २ टक्के दंड आकारण्यात येणार आहे. या कालावधीत मालमत्ता करासंबंधीत अडचणींच्या निराकरणासाठी सर्व विभागांमध्ये करनिर्धारण व संकलन खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित असतील. अद्यापही करभरणा न केलेल्या नागरिकांनी मुदतीपूर्वी त्यांच्या मालमत्तासंबंधी कराचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.