आज फेडरल रिझर्व्ह ओपन मार्केट कमिटीची बैठक संपणार आहे या दोन दिवसीय बैठकीत अमेरिकन बाजारातील व्याजदरात कपात होईल का ? याचा अंदाज मांडण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे. व्याजदरात वाढ का कपात या एका घटनेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतील तसेच व्याजदरात कपात होण्याची शक्यता का नसेल त्याबद्दल केलेले हे छोटेखानी विश्लेषण .....
आज आर्थिक दृष्ट्या महत्वाचा दिवस ठरणार आहे. आज १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन आहेच त्याचबरोबर आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या घडामोडींना आकार देणार दिवस ठरणार आहे.विशेषतः सकाळी जागतिक पातळीवरील क्रूड व सोन्याच्या किंमतीत घसरण झाली असली तरी 'जून' महिना हा तेजीत असू शकतो याबद्दल काही ठोकताळे संकेत देत आहेत. कालपासून अमेरिकन फेडरल रिझर्व्हची बैठक अमेरिकेत सुरू झाली आहे.
या दोन दिवसीय बैठकीत फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होणार का याबाबत शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत.अमेरिकन मागील महिन्यात महागाईचे अपेक्षित आकडे आले नव्हते.परवा आलेल्या कनज्यूमर कॉन्फिडन्स मधील आकड्यात एप्रिलमध्ये घट झाली आहे. सध्या अमेरिकेत असलेल्या कामगारांची स्थिती उद्योगधंद्यांची स्थिती व बदलेली रोजगार निर्मितीची क्षमता या पार्श्वभूमीवर अमेरिकन अर्थव्यवस्थेत मोठे बदल होणे अपेक्षित आहे.
परवा आलेले कनज्यूमर कॉन्फिडन्स व लेबर मार्केटचे आकडे नकारात्मक स्थितीत आले आहेत.अमेरिकन बाजारातील स्थितीबाबत अर्थतज्ज्ञ डाना पिटरसन यांनी 'अमेरिकन बाजारातील सध्याची कामगार स्थिती सकारात्मक नाही त्यामुळे आगामी काळातील नोकरी उद्योगांची स्थिती उत्पन्न याबाबत चिंता व्यक्त करावी लागेल' असे अमेरिकन प्रसारमाध्यमांना बोलताना व्यक्त केली आहे.
जुलै २०२२ पासू़न कॉन्फिडन्स निर्देशांकात झालेली घट ही जुलै २०२२ नंतर सर्वाधिक झालेली घट आहे. शुक्रवारी पर्सनल कंझमशन एक्स्पेंडिचर यामध्ये झालेली वाढ हा अर्थव्यवस्थेबाबत चिंतेचा विषय आहे. फेडरल रिझर्व्ह बँकेच्या २.७ टक्के मर्यादेत न राहता हा आकडा २.८ टक्क्यांवर पोहोचला आहे.बहुतांश अमेरिकन अर्थतज्ज्ञांनी 'रिसेशन' ची भीती व्यक्त केली आहे.यामुळे अन्नधान्य भाजीपाला यातील महागाई बरोबरच रोजगार निर्मितीत घट होताना दिसत आहे. अमेरिकेच्या ट्रेजरी डिपार्टमेंट मधील आकडेवारीनुसार अमेरिकेची अर्थव्यवस्थतेतील डेट ३४.५ ट्रिलियन डॉलरवर पोहोचले आहे.
यामुळे अर्थव्यवस्थेतील अडचणीत वाढ होताना अमेरिकेत जीडीपीची आकडेवारीही समाधानकारक आलेली नाही.फेब्रुवारी महिन्यातील कनज्यूमर इन्फ्लेशन इंडेक्स (महागाई दर निर्देशांक) हा ३.१५ टक्के असताना मार्चमध्ये तो ३.४८ टक्क्यांवर पोहोचला आहे.गेल्या महिन्यातील आलेले महागाई दर सुद्धा मर्यादेच्या बाहेर आले असताना आता अमेरिकेत अर्थव्यवस्थतेत वेगळे वळण येऊ पाहत आहे.
भारतीय व जगभरातील अर्थव्यवस्थांचे अमेरिकन बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदराबाबत अमेरिकन फेडरल रिझर्व्ह अध्यक्ष जेरोम पॉवेल काय निर्णय घेतात त्याकडे लक्ष लागले आहे.अर्थात व्याजदरात कपात केल्यास भारतीय अर्थव्यवस्थेला त्याचा मोठा फायदा होऊ शकतो परंतु यापूर्वीची आकडेवारी समाधानकारक नसताना ही शक्यता जगभरातील अर्थतज्ज्ञ फेटाळून लावत आहे. अमेरिकेत निवडणूकीचा ज्वरही आहे त्यामुळे जगाच्या दृष्टीने अमेरिकेत सुदृढ अर्थव्यवस्था असल्याचे अमेरिका नक्कीच सोंग करेल. त्यामुळे जून आधी फेड व्याजदरात कपात होईल ही शक्यता कमीच आहे.
आज भारतीय वेळेनुसार मध्यरात्रीनंतर फेडरल व्याजदराबाबत काय निकाल येतो याचा अंतिम निकाल येणार आहे.परिणामी भारतीय बाजारात तेजी असताना गेले दोन दिवस बाजारात शेअर्स प्राईजमध्ये प्राईज करेक्शन सुरू आहे. त्यामुळे आगामी काही दिवस बाजारात घसरण झाल्यास नवल वाटण्याचे कारण नाही. उच्चांकावर गेलेले भाव पुन्हा कमी होत उच्चांकावर जाण्याच्या तयारीत असताना निर्देशांकात घट दिसली तरी बाजारात स्थैर्य आहे कुठलेही दडपण बाजारात नाही. किंबहुना आता झालेल्या प्राईज करेक्शन जूनच्या सुरुवातीला मोठी चढणे पार करतील असा अंदाज आहे.त्याखेरीज भारतातील लोकसभा निवडणूकांचा निकाल ४ जूनला लागल्यावर शेअर बाजारात नवनवीन उच्चांक प्रस्थापित होऊ शकतात.
सध्या मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये मोठी हालचाल सुरू असताना लार्जकॅप शेअर प्राईज करेक्शन मधून जात आहेत.यामध्ये सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एखादा प्रथम क्रमांकावर येणारा दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर येतो व पुन्हा पहिल्या क्रमांकावर येण्याची संधी शोधतो याच प्रक्रियेतून ब्लू चिप्स शेअर जात आहेत.तिमाहीतील कंपन्याचे आलेले निकाल व अर्थव्यवस्थतेतील मजबूतीचे प्रमाणपत्र इंटरनॅशनल मॉनेटरी फंड अथवा मूडीज, आरबीआय अशा विविध पातळ्यांवर दिलेले असल्याने भारताला कुठलीही चिंता असण्याचे कारण नाही. जागतिक पातळीवरील आव्हान असताना देखील भारताची अर्थव्यवस्था स्थिर व वेगवान असल्याचे याआधी अनेअ अहवालात स्पष्ट झाले आहे.
आज युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्याची शक्यता कमी आहे.किंबहुना व्याजदर स्थिर राहिले तरी देखील गुंतवणूकदारांना भारतातील प्राईज करेक्शन मध्ये कुठलाही फरक पडणार नाही. तज्ञांच्या मते पुन्हा मोदी सरकार सत्तेवर येण्याची चिन्हे असल्यामुळे उद्योगांच्या धोरणात कुठलाही परिणाम जाणवणार नाही. किंबहुना भारतीय जीडीपी दर ७.५० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. 'इज ऑफ डुईंग बिझनेस ' हा एककलमी कार्यक्रम हाती घेतल्याने बाजारात पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
जरी फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात झालीच तरी भारताच्या आर्थिक धोरणांमुळे त्यावर मात करणे सोपे ठरणार आहे. कारण भारतातील परदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या गुंतवणूकीबरोबर इक्विटी व वेंचर कॅपिटलममध्ये वाढ होत असल्याने भारताला दिलासा मिळू शकतो. जूनमध्ये युएस फेडरल व्याजदरात कपात होऊ शकतानाच भारतातील निवडणूकीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याने याचा 'दुप्पट' फायदा गुंतवणूकदारांना मिळू शकतो. परिणामी आपल्या गुंतवणूकीत चांगले 'मार्जिन' कमावण्यासाठी गुंतवणूकदारांना बाजाराची साथ मिळू शकते.
फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल का या प्रश्नावर मुंबई तरुण भारतशी बोलताना तज्ञांनी आपले मत मांडले आहे. याविषयी बोलताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले,'काल पासून अमेरिकन फेडच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे. ३० एप्रिल व १ मे असे दोन दिवस ही बैठक चालणार आहे.अमेरिकेत महागाई अजुनही नियंत्रणात आलेली नाही.कच्चे तेलही तुलनेने महागच आहे.तसेच जीडीपीचे आकडेही खुपच खाली गेले आहेत. या परिस्थितीत अमेरिकेतील व्याज दर कमी होणे अवघड आहे.अशा प्रकाराची चर्चा कालच्या सभेत झाल्यावर डाओ जोन्स दीड टक्का घसरला. त्यांचे परीणामही सर्व बाजारात दिसतील .आपला बाजार आज सुट्टी असल्याने त्याची रिऍक्शन दिसणार नाही.आज डाओ जोन्स व अमेरिकेतील बाजारात काय घडतंय हे बघणं महत्त्वपूर्ण आहे.कालच्या व आजच्या फेडच्या बैठकीचा अंदाज जीडीपीच्या आकडे व महागाई चे आकडे मुळे व्याज दर 'जैसे थे' रहाणार हे स्पष्टच होते.जूनच्या बैठकीवर नजर ठेवून कंसोलीडेशनमध्ये आपलाही बाजार राहील जे बाजार मजबूत होण्यास मदतच करेल.'
आगामी काळात पुढील काही दिवस बाजारात चढ उतार होऊ शकतात परंतु नैसर्गिकरीत्या ही बाजारात वाढ होण्यास मदत होणार आहे. जूनमध्ये बाजारात मोठी रॅली होण्याची दाट शक्यता आहे. बाजारातील आज क्रूड तेलाची व सोन्याची घसरण अपेक्षित होती. मध्यपूर्वेतील दबाव गेला असला तरी अमेरिकेतील स्थिती मात्र नाजूक आहे.व्याजदरात वाढ केल्यास अमेरिकन क्रेडिट कार्ड दर,कर्जाचे दर व इतर उत्पादनाच्या मूल्यांकनात वाढ झाली होऊ शकते ती आत्ताच्या घडीला अमेरिकला परवडणारी नाही.