मुंबई (प्रतिनिधी) - पक्षी स्थलांतरामधील काही गुपिते उलगडण्यामध्ये संशोधकांना यश मिळाले आहे (bird migration).
मोठ्या स्थलांतरादरम्यान पक्ष्यांचा वेग काय असतो, ते आकाशमार्गाची निवड कशा पद्धतीने करतात अशा अनेक प्रश्नांची उकल काही अंशी संशोधकांनी केली आहे. जर्मनी आणि आॅस्ट्रेलियात केलेल्या पक्षी स्थलांतराच्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. (bird migration).
पक्षी हे आपल्या हंगामी स्थलांतरादरम्यान एका देशातून दुसऱ्या देशात किंवा एका महाद्वीपावरुन दुसऱ्या महाद्वीपापर्यंतचा प्रवास करतात. या प्रवासात पक्ष्यांची मानसिकता कशा पद्धतीची असते, याचा मागोवा 'युनिव्हर्सिटी ऑफ वायोमिंग आणि मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट ऑफ ॲनिमल बिहेव्हियर'च्या शास्त्रज्ञांनी घेतला आहे. त्यांनी २०१३ ते २०२० दरम्यान दक्षिण जर्मनी आणि ऑस्ट्रियामधील पाच प्रजनन क्षेत्रात पसरलेल्या २५० पांढऱ्या करकोचा पक्ष्यांना 'सॅटलाईट टॅग' लावून त्यांचे निरीक्षण केले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी या अभ्यासातील तथ्य 'प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस'मध्ये प्रकाशित केली. या तथ्यांनुसार पक्ष्यांना स्थलांतरासंबंधी अनुवांशिक स्वरुपात मिळालेले ज्ञान हे जेवढे महत्त्वाचे असते, तेवढेच स्थलांतरादरम्यान पक्ष्यांनी वैयक्तिक स्वरूपात मिळवलेले ज्ञान देखील त्यांच्या स्थलांतराच्या प्रवासाला आकार देते.
शास्त्रज्ञांनी केलेल्या निरीक्षणानुसार, प्रौढ पक्षी हे स्थलांतरासंदर्भात अनुभवी असतात. त्यामुळे ते नवीन ठिकाणं शोधून त्याठिकाणी थांबत नाहीत. ते आपल्या गंतव्य स्थानापर्यंत थेट आणि जलदरित्या पोहोचतात. परिणामी, अशा थेट आणि जलद स्वरुपाच्या उड्डाणासाठी त्यांची जास्त ऊर्जा खर्च होते. याउलट वयात आलेले पक्षी हे नवीन ठिकाणे शोधून त्या भागात थांबतात. त्यांच्या स्थलांतरामध्ये वयानुसार जलदता येते. उन्हाळ्यात प्रजनन आणि घरटे बांधण्यासाठी परतीचा प्रवास करताना ते अधिक थेट मार्ग शोधतात. शास्त्रज्ञांनी पक्ष्यांवर लावलेल्या सॅटलाईट टॅगने केवळ पक्ष्यांचे मार्गच दाखवले नाहीत, तर स्थलांतराची वेळ, वेग आणि उडण्यासाठी लागणारी ऊर्जा यांच्या नोंदी देखील केल्या.