‘ती’ लिहू लागली तेव्हा...

    07-Mar-2024   
Total Views |
Women's Autobiography

स्त्री जाणती झाली, तिला आवाज फुटला की ती बोलू लागते. बहुतेकदा हा आवाज घराच्या चार भिंतींबाहेर ऐकू येत नाही. पण, जागृत झालेले आत्मभान आणि भाषेची जोड याच्या आधारे ती काळाच्याही कराल भिंती लांघून बोलू लागते, ती लिहू लागते, जनमानसापर्यंत पोहोचते. तेव्हा आजच्या ‘जागतिक महिला दिना’निमित्त अशाच काही गाजलेल्या आणि भावलेल्या स्त्री आत्मचरित्रांचा घेतलेला हा कानोसा...

स्वातंत्र्यपूर्वकाळात स्त्रीवादी कादंबर्‍यांचे पेव फुटलेले जाणवते. पण, या नायिकाप्रधान कादंबर्‍या लिहिणारे बहुसंख्येने ‘लेखक’च. सुमती क्षेत्रमाडे, शांताबाई किंवा असे अपवाद वगळता, स्त्रियांनी आपले प्रश्न मोठ्या चतुराईने पुरुषांच्या लेखणीतून मांडल्याचे दिसतात. मग स्त्री केव्हा लिहू लागली? रमाबाई रानडेंच्या ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ या पहिल्या स्त्री आत्मचरित्रापासून ती लिहीत होतीच. सामाजिक, कौटुंबिक, धार्मिक विषयांवर लेखन करत होती. ती स्वतःबद्दल लिहू लागली, तो आपल्याला ज्ञात असलेला काळ ’स्मृतिचित्रा’चा! हे पुस्तक सर्वार्थाने गाजलं. ‘लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रे’पासून पुढे अगदी यावर्षी प्रकाशित झालेल्या माधवी महाजनींच्या ’चौथा अंक’पर्यंत. अज्ञात आत्मकथने म्हणजे गौतम बुद्धांच्या काळापासून ते अगदी बहिणाबाईंपर्यंत, आत्मभान जागृत झालेल्या स्त्रियांनी काव्यरचनांच्या माध्यमातून सांगितलेली आपली कथा-व्यथा याही अनुल्लेखाने टाळता येणार नाहीत. या आत्मकथांचा वेध घेणारा हा लेख...

’स्मृतिचित्रे’ मी शालेय वयात वाचले. जग न पाहिलेल्या माझा आणि वाचनाचा परीघ अगदीच एकांगी होता. त्यावेळी मनात उडालेली खळबळ अगदी आजही आठवतेय. आपल्या तत्त्वांशी किती सौम्य शब्दात त्यांनी विद्रोह केला. खरं तर या पुस्तकाकडे केवळ भावनिक दृष्टिकोनातून पाहू नये. वेगवेगळ्या वयात एकाच पुस्तकात आपल्याला नवे काही तरी सापडत जाते. १८६० ते १९२० या सबंध काळात समाज कसा होता, तो स्त्रीकडे कसा पाहत होता, टिळकांच्या कविता, ख्रिस्ती धर्म, धर्मांतर, माहेरचा संबंध संपतो, तेव्हा ’नवर्‍याने टाकलेली बाय म्हणजे बिनगोठ्याची गाय’ या म्हणीचा प्रत्यय व असे हे चरित्र. एकमेकांवर निरतिशय प्रेम असूनही, नवर्‍या वेगळी राहिलेली स्त्री प्रीतीच्या विरोधात धर्म तोलून पाहते आणि मग मनाचा कौल घेऊन निर्णय घेते. हा तिचा प्रवास विलक्षणच. पण, याच्या अगदी उलट म्हणजे विजया मेहतांचे ’झिम्मा.’ त्या स्वतः आपल्या चरित्राला ’आठवणींचा गोफ’ म्हणतात. एक प्रतिभावंत स्त्री तिच्या वाटेला आलेल्या लग्न, संसारादि गोष्टींमुळे एका स्थानावर बांधलेली राहत नाही. त्यांनी स्वतः तीन लग्ने केली, वेगवेगळ्या पतीसोबत भारतात व भारताबाहेर राहिल्या. उपजत अभिनय कला व दिग्दर्शनाचे अंग आणि त्याला मिळालेली समृद्ध करणार्‍या प्रवासाची जोड याने मराठी रंगभूमी आमूलाग्र बदलली. मराठी संस्कृती थेट सातासमुद्रापार जर्मनीशी जोडली गेली. स्नेही आणि नातेवाईकांकडून मिळालेले खंबीर पाठबळ आणि सृजनाची उर्मी डोंगराएवढे बदल घडवू शकते, हे सांगणारे एका स्वयंसिद्ध स्त्रीच हे आयुष्य. वर्तुळात आपल्याच तालात घुमणार्‍या स्त्रीचा हा झिम्मा!

घुमण्यावरून आठवले-’नाच गं घुमा!’ पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या वेळी कोणीतरी सगळी आवृत्तीच विकत घेतली. आठच दिवसांत या पुस्तकाची दुसरी आवृत्ती आली आणि पाहता-पाहता १३ आवृत्त्या आल्याही. सुप्रसिद्ध कादंबरीकार रणजित देसाई यांच्या पत्नी माधवी देसाईंचे हे आत्मकथन. वैधव्य, पुनर्विवाह आणि घटस्फोट या अशा वादळांच्या फेर्‍यात पाचोळ्यासारखी ती नाचत राहते, केवळ तिला तिचा ताल गवसेपर्यंत. ही अशीच नाचरी घुमा...माधवी यांच्यासारखी आपल्या पतीच्या गोष्टी सांगणारी चरित्रे किती तरी आहेत. नारायण सुर्वेंच्या पत्नीने लिहिलेले ‘मास्तरांची सावली’, लालन सारंग यांचे ’जगले जशी’, बाबा आमटेंनी चेतवलेल्या समाजसेवेच्या यज्ञात आपल्या आयुष्याची समिधा करून विनातक्रार उजळत राहिलेल्या, साधना आमटे यांचे ’समिधा’ही याच पठडीतील. अगदी अलीकडचे म्हणजे रवींद्र महाजनी यांच्या पत्नीचं ’चौथा अंक.’ लेखनशैलीपेक्षाही अनुभव असले दांडगे की, एका बैठकीत पुस्तक संपतं. ’आहे मनोहर तरी’ हे सुनीता देशपांडे यांचे पुस्तक गाजणार होतेच. लोकप्रिय पुरुषाशी लग्न केल्याच्या खाणाखुणा काळ्याकुट्ट शाईने कोरल्यासारख्या एकेका पानावरून भळभळताना दिसतात. त्या म्हणतात की, ”बाळ न होता, मी आई झाल्ये. कधी लेकरासारखं नवर्‍याला कुशीत घेतले, तर कधी त्याच्या वेगळ्या आयुष्याने कायम अनुल्लेखाने दुर्लक्षित राहिले.” पण, एकात एक गुंतलेल्या साखळीसारखी नवर्‍याच्या आयुष्याला बांधून राहिली ही बाई. ग्रेट!

मल्लिका अमर शेख यांनी ’मला उद्ध्वस्त व्हायचंय’ लिहिले, तेव्हा नामदेव ढसाळांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन पार बदलून गेला. काही गढुळलं वगैरे नाही मत; पण माणूस किती स्वतंत्र विचारांचा आणि तेवढाच स्वैर असू शकतो, हे लक्षात आलं. आपल्या नवर्‍यासोबत रस्त्यावरून हातात हात घेऊन चालत असताना, सिग्नलला क्रॉसिंगसाठी थांबल्यावर नवरा अचानक हात सोडून देतो आणि समोर दिसलेल्या वेश्येच्या मागे निघून जातो. पत्नीला तसेच रस्त्याकडेला ताटकळत ठेवून! हे असं वाचणं म्हणजे नीती मूल्यांनी जोजवलेल्या मनावर विखारी चाबकाचे आसूड ओढल्यासारखं नाही का? आपल्याच डोळ्यांनी का दैना करून घेतो, आपण आपल्या मनाची? का वाचतो हे? मुळात हे साहित्य काहीसं असंच, आपण का वाचतोय असा प्रश्न पडावा, इतकं विदिर्ण करणारं!शांताबाई कांबळेंच ’माज्या जल्माची चित्तरकथा’ असेल किंवा सिंधुताई सपकाळ यांचं ’मी वनवासी’ म्हणा किंवा बेबी कांबळेंच ‘जिणं आमुचं’ असेल, हा सगळं विद्रोह वाचताना, एक प्रकारची अपराधी भावना मनात व्यापून राहते. कोणाचा दोष हो? उर्मिला पवार कुडाच्या झोपडीत पुस्तक हातात घेऊन बसायच्या, पण, त्यांचं लक्षच मुळी शब्दांवर स्थिर होत नसे. आईच्या हातातले ’आयदान’ जसं गोल गोल फिरे तशी त्यांच्या मनाची भिंगरभिवरी व्हायची. वडील गेल्यावर आईने बांबूच्या चकत्यांपासून परड्या करून मुलांना वाढवले. या पारड्या म्हणजे ’आयदान.’ हेच त्यांचं चरित्र. त्यांच्या मनासारखं अजूनही त्यातच गुंतलेलं आणि त्याच्या वेगातच आपल्यापर्यंत पोहोचलेलं!

’अन्या ते अनन्या’ हे एका बंगाली स्त्रीचे आत्मचरित्र. प्रभा खेतान. बालवयातच आपले डोळे तपासण्यासाठी गेलेली प्रभा नेत्ररोग तज्ज्ञांच्या प्रेमात पडते. घरातून वडिलांचे हवे वाटलेले प्रेम थोडे कमी मिळाले की, स्त्रिया सहज आपल्यापेक्षा वयाने मोठ्या पुरुषांकडे आकर्षित होतात. पण, आकर्षणाचा तो एकच क्षण. त्यात तुम्ही वाहून गेलात, तर संपूर्ण आयुष्य तुम्हाला सांभाळून घ्यावे लागते. प्रभाने ते घेतले! आपल्या प्रियकरासोबत त्याच्या लग्नाच्या पत्नीला स्वीकारणे किती कठीण असते, केवळ भावनिक पातळीवरच नव्हे तर समाजाचे टक्केटोणपेही कुंकू नसलेल्या स्त्रीला खावे लागतात. कुणाचा संसार उद्ध्वस्त करणं गैरच, पण पडलोच प्रेमात तर काय करावं? कुढत जगावं का? कायम अनुत्तरित राहणार्‍या या प्रश्नांना प्रभा यांनी कसं थोपवले, ते वाचण्यासारखं आहे. त्यातून आकाराला येत असलेला तिचा दृष्टिकोनही दुर्लक्षित करुन चालत नाही. तसेच एक वेगळ्या प्रकारचे पुस्तक म्हणजे अंजली जोशी यांचे ’गुरू विवेकी भला.’ मानसशास्त्राची विद्यार्थिनी आपल्या गुरूच्या एकाच व्याख्यानाने इतकी प्रभावित होते की, तिचे शिष्यत्व त्यांनी पत्करावे, यासाठी व्याकुळ होते. मग त्यानंतरचा १२ वर्षांचा त्यांचा अखंड प्रवास या पुस्तकातून सांगताना, तिने आपल्या गुरुचे चरित्र आणि त्याजोडीने त्या काळातील आपल्या आयुष्याचे आत्मचरित्र असे काहीसे वेगळ्या साच्यातील पुस्तक लिहिले आहे. नात्याचा वेध घेताना, आपले मन सतत जोखण्याचा हा प्रवास लक्षपूर्वक समजून घ्यावा असाच...

रतन साळगावकर यांच्यावर परिस्थितीने लहान वयात अभिनय क्षेत्रात जाण्याची परिस्थिती उद्भवते. ज्या आपल्या भावासाठी त्या या मैदानात उतरतात, तोच त्यांना नाव बदलायला सांगतो. ‘सतत हसत राहणारी ती हंसा’ असं मामा वरेरकर तीचं नामकरण करतात आणि ती हंसा वाडकर होते. ’सांगते ऐका’ या आपल्या छोट्याशा पुस्तकात त्या चंदेरी दुनियेच्या बर्‍यावाईट गोष्टी लिहितात. हे पुस्तक वाचताना मला एकदा पाहिलेला प्रियांका चोप्रा आणि कंगना राणावतचा ’फॅशन’ चित्रपटच आठवला.एक अजून पुस्तक असे ज्याचा उल्लेख केला नाही, तर समस्त स्त्रीजातीच्या आत्मकथांचा अपमान होईल. वयाची १८ ही पूर्ण नसलेल्या ऍनची ही गोष्ट. ’डायरी ऑफ ऍन फ्रॅन्क’मध्ये ती तिच्या मनातल्या सर्व अनुभवांना मांडते. एका छोट्याशा खोलीतील तिची ही वर्ष. ज्यूंवर जेव्हा अत्याचार होत होते, तेव्हा हे लोक दाटीवाटीने इमारतींच्या तळमजल्यावर कोंडून घेऊन वर्षोवर्ष राहत. आपले आयुष्य केव्हा संपेल, याची सूतराम कल्पना नसताना जगणे कसे असते, ते यातून लक्षात येते. दुर्दैवाने ऍनचा मृत्यू होतो आणि पुढच्याच महिन्यात ज्यू स्वतंत्र होतात. तिची कोंडलेल्या दिवसातली रोजनिशी मात्र देशादेशांच्या सीमा पार करून, काळाच्याही पुढे येऊन, जगभर गाजत राहते, वाजत राहते.

यासोबत अशी अनेक स्त्री आत्मकथने आहेत. सर्वच काही मी वाचलेली नाहीत. पण, यापैकी गाजलेली म्हणजे स्नेहप्रभा प्रधान यांचं ‘स्नेहांकिता’, यशोदा पाडगावकरांचं ‘कुणास्तव कुणीतरी’, नसीमा हुरजूक यांचं ‘चाकाची खुर्ची’, मेहरुन्निसा दलवाई यांचं ‘मी भरून पावले आहे’, संगीता धायगुडे यांचं ‘हुमान’, प्रा. स्नेहल पाठक यांचं ‘स्पंदन’, ‘तुमची जोत्स्ना भोळे’, ‘मी दुर्गा खोटे’, डॉ. सुनंदा एडके यांचं ’सुनंदायन’, कुंदा महादेवकर यांचं ’फापट पसारा’, जोत्स्ना कदम यांचं ‘सर आणि मी’, मुक्ता सर्वगोड यांचे ‘मिटलेली कवाडे’, कुमुद पावडे यांचे ‘अंत:स्फोट’, यशोधरा गायकवाड यांचे ‘माझी मी’, जनाबाई गिर्‍हे यांचे ‘मरणकळा’, विमल मोरे यांचे ‘पालातील माणसं’ अशी किती तरी उदाहरणे देता येतील.स्त्री जाणती झाली, तिला आवाज फुटला की ती बोलू लागते. बहुतेकदा हा आवाज घराच्या चार भिंतीबाहेर ऐकू येत नाही. पण, जागृत झालेले आत्मभान आणि भाषेची जोड याच्या आधारे ती काळाच्याही कराल भिंती लांघून बोलू लागते. ती लिहू लागते. जनमानसापर्यंत पोहोचते; पण मधल्या काळात स्त्रिया शिकत नसत तेव्हा? तेव्हा ती व्यक्त झालीच नाही का? तेव्हा ती तिच्या काव्यरचनांतून आपली व्यथा-कथा मांडत होती. काश्मीरच्या लल्लेपासून केरळच्या नंगापेन्नूपर्यंत आणि पूर्व बंगालच्या चंद्रावतीपासून आपल्या बहिणाबाईंपर्यंत या स्त्रिया आपल्या रचनांतून आपली कथा सांगत होत्या. या सगळ्या त्या-त्या परिसरात, त्या-त्या भाषेत गुंजत राहिलेल्या कथा एकत्रित करून अरुणा ढेरेंनी ’भारतीय विरागिनी’ हे पुस्तक लिहिलंय. या स्त्रियांच्या अभिव्यक्तीचं मला जितकं कुतूहल वाटते, तेवढेच त्यांच्याविषयी प्रेम वाटते आणि म्हणूनच माझ्यातल्या स्त्रीत्वाची जाणीव मला करून देणार्‍या सर्व स्त्रियांना आणि पुरुषांना आजच्या ’जागतिक महिला दिना’निमित्त माझा सादर नमस्कार!
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.