
कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्याची एकमेव गुरुकिल्ली म्हणजे सातत्याने अधिकाधिक केलेला सराव होय! सरावच माणसाला परिपूर्ण करतो. मग या नियमाला नाट्यक्षेत्रही अपवाद नाहीच. बालकलाकारांच्या बालनाट्यातही सरावाला अर्थात तालीम म्हणजे सध्याच्या भाषेत ‘रिहर्सल’ला फारच महत्त्व असते. विविध पद्धतीने ही तालीम त्यांच्याकडून ती करून घेतली जाते. यादरम्यान काय घडते, विद्याथ तालीम कशी करतात, या पडद्यामागच्या विश्वाचा घेतलेला मागोवा...बालनाट्य बसवताना मी माझ्या विद्यार्थ्यांना ‘चला रिहर्सल करूया’ असे सांगते. कारण, हाच प्रचलित शब्द आहे. पूव त्याला ‘तालीम’ म्हणायचे, अजूनही म्हणतात. पण, ‘रिहर्सल’ पटकन कळतं, तालीम म्हणजे काय हे सांगावे लागते. घोटून केलेला अभ्यास म्हणजे तालीम. त्यातून रस उत्पत्ती होते आणि चंदनासारखा सुगंध त्या भूमिकेला लागतो. तालमीला नाट्य बसवण्याच्या प्रक्रियेत फार महत्त्व आहे. अभिनेता जेव्हा आत्मविश्वासाने भूमिका सहजपणे रंगमंचावर साकारतो, तेव्हा समजावं त्याने तालमीत स्वतःवर प्रचंड मेहनत घेतली असणार. उत्तम कलाकाराकडे कौशल्य तर असतंच पण, प्रचंड मेहनत आणि सातत्य असेल, तरच तो महान कलाकार म्हणून ओळखला जातो. प्रत्येक महान अभिनेत्याने सरावाचं महत्त्व मान्य केलेलेच आहे. सरावामुळे केवळ प्रयत्न करण्याची संधीच मिळत नाही, तर चुका करण्याची, प्रयोग करण्याची, शिकण्याची आणि सुधारण्याची संधी मिळते. पात्र, प्रसंग, इतर पात्रे व संहितेतील कथा समजून घेण्यासाठी, सराव उपयुक्तच ठरतो.
विद्यार्थ्यांचा विकास व्हावा यासाठी मी विशिष्ट पद्धतीने सराव रचले आहेत. या सरावांमध्ये काही ठराविक टप्प्यांनंतर नवीन घटकांचा समावेश केला जातो, यामुळे विद्यार्थ्यांची तालीम पद्धतशीरपणे होते.
तालमीतली रोजची दिनचर्या
विद्यार्थ्यांनी सरावस्थळी आल्यावर, आपले पादत्राणे सरळ रेषेत बाहेर लावायची सवय लावली जाते. यामुळे शिस्त आणि नीटनेटकेपणाची जाणीव होते. त्यानंतर विद्याथ क्रमाने सरावासाठी जागा स्वच्छ करतात. यातून पुढाकार घेण्यास प्रोत्साहन दिले जाते. या कामांमध्ये एकजण नेतृत्व करत असतो, बाकीचे त्याला मदत करतात. दुसरीकडे एक विद्याथ श्रीगणेश व नटराज यांच्या पूजेची तयारी करतो. कला व ज्ञानाचे अधिष्ठान म्हणून गणपती बाप्पा, नटराज यांच्या आशीर्वादाने कार्याला प्रारंभ होतो. ही आमच्याकडे परंपरा राहिलेली आहे, त्यामुळे का आणि कशासाठी या प्रश्नांचे फार समाधानकारक उत्तर प्रत्येकाला मिळेलच असे नाही. प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य मात्र विद्यार्थ्यांना आहे. मी विद्यार्थ्यांना रोज फुलं आणायला प्रोत्साहित करते.
वरील काम पूर्ण झाल्यावर, खालील लोकाचं पठण केलं जातं. (कवी कालिदासांच्या ‘मालविकाअग्निमित्रं’ या संस्कृत नाटकातून):
देवानामिदमामनन्ति मुनयः कान्तं ऋतुं चाक्षुषं |
रूद्रेणेदमुमाकृतव्यतिकरे स्वाङ्गे विभक्तं द्विधा |
त्रैगुण्योभ्दवमत्र लोकचरितं नानारसं दृश्यते |
नाट्यं भिन्नरूचेर्जनस्य बहुधाप्येकं समाराधनम ॥
या लोकाचा अर्थ विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी समजावून सांगितला जातो.
नाट्याची दैवी उत्पत्ती : नाटक हे केवळ करमणूक नसून देवांनी निर्माण केलेलं माध्यम आहे. शिव आणि पार्वती यांच्या संयोगातून ते उदयास आलं, ज्यात स्त्री-पुरुष तत्त्वांचं ऐक्य आहे.
त्रिगुण आणि जीवन : सत्त्व, रज व तम या त्रिगुणांच्या संयोगातून, मानवी वर्तन व भावना प्रकट होतात. नाटक या सर्व रसांना (प्रेम, राग, भीती, विस्मय इत्यादी) अभिव्यक्त करतं.
ऐक्य व विविधता : वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या लोकांना नाटक एक समान माध्यमातून जोडतं.
समजवताना भाषा सोप्पी ठेवते.
तालमीत भाषा विद्यार्थ्यांना समजेल अशी वापरली जाते. कधी इंग्रजी, हिंदी तर मराठी कारण, मुलं विविध संस्कृतींतून आलेली असतात. भाषा ही संवाद जोडण्यासाठी आहे, तोडण्यासाठी नाही. नाटकाचा सराव सुरू झाल्यावर नाटकात जी भाषा आहे, त्या भाषेतच वाक्य बोलली जातात. विद्याथ स्वर, व्यंजन व बाराखडी उच्चारतात आणि नंतर पाच सुवर्ण नियमांचं पठणही करतात.
उच्चार स्पष्टतेसाठी जिभेचे व्यायाम दिले जातात. त्यासोबत तालबद्ध हालचाली व संगीताच्या साथीने शरीरमुक्तीचे व्यायामही केले जातात. आवाजाचे व्यायाम ओठ, जीभ, घसा, अनुनासिक आवाज इत्यादींचे व्यायाम घेतले जातात. त्यानंतर नाटकाचा खेळ खेळला जातो. मग नाटकासंबंधी एखादा सुधारणेचा व्यायाम दिला जातो. यानंतर विश्रांती करता वेळही दिला जातो. त्यानंतरच नाटकाच्या तालमीला सुरुवात होते. शेवटी चर्चासत्र असतं, ज्यामध्ये प्रत्येकजण आपलं मत मांडतो. आज काय शिकलो, काय चांगलं झालं, काय सुधारण्याची गरज आहे, यावर चर्चा होते. शेवटी विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीनुसार व जबाबदारीनुसार छोटंसं बक्षीस दिलं जातं, मार्बलच्या स्वरूपात.
सरावातील विविध टप्पे
सुरुवातीला विद्यार्थ्यांना गोल करून बसायला सांगते. संहिता म्हणजेच स्क्रिप्ट वाचन केलं जातं. यामुळे कथा, पात्रे व संवाद समजतात. संवाद वाचताना विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने वाक्य उच्चारायला लावलं जातं. नंतर उभे राहून संवाद व हालचालींसह तालीम होते. यामुळे आंगिक अभिनय, हालचाली आणि हावभाव यांची जाणीव त्यांना होते. पुढे नाट्य सामग्रीचा वापर करायला शिकवलं जातं आणि मग जुजबी नेपथ्याचा वापरही केला जातो. ते व्यवस्थित ठेवणं, वापरून झाल्यावर जागेवर लावणं ही जबाबदारीही विद्यार्थ्यांनाच दिली जाते. पुढील टप्प्यात पार्श्वसंगीताची भर पडते, ज्यामुळे भावनांची अभिव्यक्ती करत असताना ते साहाय्यक ठरतं. नंतर वेशभूषा व रंगभूषेचा सराव होतो. अनुभवी मुलं मेकअपमध्ये मदत करतात. शेवटी रंगीत तालीम रंगमंचावर केली जाते. रंगीत तालीम आणि बालनाट्य यावर एक वेगळा लेख लिहेनच.
तालमीचं महत्त्व
वेगवेगळ्या भूमिका करून बघण्याची विद्यार्थ्यांना संधी मिळते.
चुका करून त्या सुधारता येतात.
शिक्षक व सहकाऱ्यांकडून योग्य सूचना व प्रोत्साहन मिळतं.
स्वतःची जाणीव, पात्राची जाणीव व संहितेचे ज्ञान वाढते.
सहकार्यातून संघ कार्य शिकतात.
कुतूहल, जिज्ञासा व सृजनशीलता वाढते.
सरावाचे टप्प्याटप्प्याने आयोजन झाल्याने, प्रगती स्पष्ट दिसते.
अंतिम प्रयोग जवळ आल्यावर चिकाटी, मेहनत व आत्मविश्वास वाढतो.
इतर महत्त्वाचे मुद्दे
जेव्हा विद्याथ रंगमंचावर नसतात, तेव्हा इतरांचे निरीक्षण करण्याची सवय लावली जाते. काही गृहपाठ जसे की, आरशासमोर बोलणे, पाणी भरून आणणे, दुकानदाराशी बोलण्यास सांगितले जाते. यामुळेही आत्मविश्वास वाढतो. या सर्व प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाट्यसंस्कार रुजतात. पालकांना हा सराव बघण्याची परवानगी नसते कारण, मुलांचं लक्ष विचलित होतं आणि त्यांना त्याचा तणावही वाटू शकतो. तसेच ज्यांचे पालक आले नाही आहेत, ते विद्याथ हिरमुसून जाण्याची शक्यता असते. तालीम ही एकट्यात करायची आणि प्रयोग हा सर्वांसमोर करण्याची गोष्ट आहे.
विद्यार्थ्यांनी सुटसुटीत कपडे घालावे अशा सूचना असतात. शाळेतून थेट आल्यास, कपडे बदलून सरावाला बसण्याची अट असतेच. कारण, गणवेशातली शिस्त वेगळी आणि तालमीतली शिस्त वेगळी. नाटक व पात्र गुप्त ठेवण्याची शिस्त कसोशीने पाळली जाते. नाटकाचा पडदा उघडण्याअगोदर काय घडत हे प्रेक्षकांसाठी नसतेच. पडदा उघडला की कलाकार आणि प्रेक्षकांमधलं अंतर नाहीसं होतं. वेळेचं काटेकोर पालन केलं जातं. वेळ कोणासाठी थांबत नसतो. आपण वेळेचा आदर केला की, वेळेत सगळ्या गोष्टी होतात. विद्याथ जेव्हा तालमीत येतात, तेव्हा ते ओल्या मातीसारखे असतात. परंतु, सरावाच्या प्रक्रियेतून ते सुंदर घडे घडविल्यासारखे तयार होतात. अनेक प्रक्रियेतून परिपक्व होतात आणि अंतिम प्रयोगासाठी सिद्धही ठरतात.
- रानी राधिका देशपांडे
[email protected]