समुद्र कोणताही असला तरी त्याने कायमच मानवी मनाला भूरळ घातली आहे. या समुद्राच्या जोडीला जेव्हा कोकणातील निसर्गसंपन्नता येते, तेव्हा हा समुद्री प्रवास अवर्णनीयच ठरतो. असाच प्रवास अनुभवण्यसाठी मुंबई-कोकण समुद्री मार्गावर रो-रो सेवा सुरु झाली. या सेवेचे अनेक लाभ आहेतच,तसेच या सेवेसमोर काही आव्हानेदेखील आहेत. सुरु झालेल्या या नव्या सेवेचे स्वागत करतानाच, त्याचा सेवा आणि प्रवासाच्या आर्थिक दृष्टिकोनातून घेतलेला आढावा...
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गपर्यंतच्या दहा ते 12 तासांच्या त्रासदायक प्रवासाला कमी करणारी, प्रवासाच्या अर्थकारणाला नवा आकार देणारी हाय-स्पीड रोल-ऑन/रोल-ऑफ (Ro-Ro) फेरीसेवा नुकतीच सुरू झाली. महाराष्ट्र शासनाचे बंदर विकासमंत्री नितेश राणे यांच्या दूरदृष्टीतून जयगड (रत्नागिरी)पर्यंतचा प्रवास फक्त तीन तासांत आणि विजयदुर्ग (सिंधुदुर्ग)पर्यंतचा प्रवास पाच तासांत करणे, आता शक्य झाले आहे. रो-रो सुरू झाल्यामुळे, लोकांना प्रवासाचा एक नवीन पर्याय उपलब्ध झाला. लोक आता थोडा खर्चिक परंतु वेगवान, आरामदायी आणि सोयीचा मार्ग निवडतात की, रस्ते-रेल्वेसारख्या पारंपरिक मार्गालाच पसंती देतात, हे बघणे महत्त्वाचे ठरेल.
जाहीर केलेल्या भाड्यांवरून मिळणारा आराम आणि खर्च यांच्यातील ताण सहज अधोरेखित होतो. रोरोच्या प्रवासी तिकिटांचे दर चार वर्गांमध्ये विभागले आहेत. इकोनॉमी 2 हजार, 500पासून सुरू होऊन, प्रीमियम इकोनॉमी चार हजार, बिझनेस क्लास 7 हजार, 500 आणि फर्स्ट क्लाससाठी नऊ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. वाहनांना घेऊन प्रवास करताना सायकलीसाठी 600, दुचाकीसाठी एक हजार, तर कारसाठी सहा हजार रुपये द्यावे लागणार आहेत. या जहाजात शेकडो प्रवाशांसोबत, प्रत्येक फेरीत सुमारे 50 चारचाक्या आणि 30 दुचाक्या जाऊ शकतात.
मुंबई-कोकण रो-रो फेरीच्या भाड्याच्या श्रेणीची तुलना सध्याच्या प्रवास पद्धतींसोबत केली जाते. रत्नागिरीपर्यंतचा 400 किमी रस्त्याचा प्रवास साधारण नऊ ते दहा तासांचा असून, यात इंधनाचा खर्च सुमारे 3 हजार, 500 ते चार हजार आणि टोलसाठी आणखी एक हजार लागतात. याशिवाय पावसाळ्यात पडलेल्या खड्यांमुळे, वाहनांची जास्त झीज होऊन खर्च वाढतो तो वेगळाच! तुलनेने रेल्वे सर्वांत स्वस्त पर्याय आहे. कोकण रेल्वेवरील शयनयान तिकीट 400-500 आणि एसी चेअर कार 1 हजार, 200 ते 1 हजार, 500 एवढे असते. मात्र, गणेशोत्सव काळात प्रचंड मागणीमुळे, प्रतीक्षा यादीवरील दर 200 टक्क्यांपेक्षा अधिक वाढतात. या पार्श्वभूमीवर फेरीचे 2 हजार, 500 इकोनॉमी भाडे रेल्वेपेक्षा जास्त असले, तरी रस्त्यांच्या प्रवासाच्या तुलनेत इंधन, टोल आणि वेळेची बचत लक्षात घेतली असता स्पर्धात्मक ठरते.
उच्च श्रेणींचे भाडे मात्र वेगळे चित्र दाखवते. बिझनेस आणि फर्स्ट क्लासच्या दरांची तुलना, मुंबई-गोवा प्रवासातील मध्यम अंतराच्या हवाई प्रवासाच्या तिकिटांच्या दराशी होऊ शकते. उच्च श्रेणींबाबत रो-रोची स्पर्धा ही तिकिटांच्या स्वस्त असण्याशी नसून सणासुदीच्या काळात होणारी गद, रस्त्याच्या तुलनेत प्रवासाला लागणारा कमी वेळ याबाबत आहे. रस्त्याच्या तुलनेत सात तासांपर्यंतची बचत ही व्यावसायिक, पर्यटक आणि कुटुंबांसाठी आकर्षक ठरते.
रो-रोमध्ये वाहन घेऊन जाता येत असल्याने, या सेवेच्या विलेषणाला अजून एक आयाम मिळतो. चारचाकीसाठी सहा हजार रुपयांचे भाडे जरी महाग वाटत असले, तरी इंधन आणि टोल यांची तुलना केली, तर ते स्पर्धात्मकच आहे. शिवाय आरामदायी प्रवास हा सुद्धा मोठाच फायदा आहे. चारजणांच्या कुटुंबासाठी व्यक्तिनिहाय खर्च पाहिला, तर तो वाजवी वाटतो. तसेच दुचाकीसाठी एक हजार आणि सायकलसाठी 600 या दरांमुळे, बजेट पाहून प्रवास करणारे आणि पर्यावरण-जागरूक प्रवाशांनाही या सेवेचा लाभ घेता येतो. गणेशोत्सवानंतर ही सेवा सुरू झाल्याने, प्रवाशांना नक्कीच फायदा होतो आहे. उत्सवांमध्ये प्रवासादरम्यान होणारी गद आणि धोकादायक महामार्गावरील प्रवास टाळण्यासाठी, त्याबरोबरच रेल्वेच्या लांबलचक प्रतीक्षा यादीला पर्याय म्हणून जास्त भाडे द्यायलाही प्रवासी तयार असतात. मात्र, हा उत्साह सणांनंतर टिकून राहील का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. वर्गानुसार भाडे बदलत असल्यामुळे, व्यवसाय म्हणून रो-रोचा बंद पडण्याचा धोका मात्र निश्चितच कमी होतो. फेरीची स्पर्धा ही रस्ता किंवा रेल्वे यांच्याशी नसून, ही सेवा स्वतःला प्रिमियम पर्याय म्हणून सादर करते. 600 पासून नऊ हजारांपर्यंतच्या भाड्यांमुळे, ही सेवा सायकलस्वार आणि स्कूटर स्वारांपासून ते श्रीमंत व्यावसायिक आणि पर्यटकांपर्यंतच्या सर्व सामाजिक विभागांसाठी उपयुक्त आहे. खर्च केवळ रकमेवर न मोजता वेग, आराम आणि लवचिकता यांनाही महत्त्व देऊन त्यावरही मोजणे, हे भारतीय प्रवास अर्थव्यवस्थेतील व्यापक बदलांचे प्रतिबिंब आहे.
मुंबई-कोकण रो-रोचे दीर्घकालीन यश प्रवाशांची तिकीट खरेदी क्षमता आणि आकांक्षा, यांच्यातील योग्य संतुलन साधण्यावर अवलंबून असेल. सध्याची भाडे श्रेणी स्वतःच एक उघड करणारी कहाणी सांगते; प्रवास म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे नव्हे, तर आराम आणि खर्च यांच्यात संतुलन साधणे आहे.
- मुग्धा महाबळ