नवी मुंबई विमानतळ : आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रतीक

    08-Oct-2025
Total Views |





बहुप्रतीक्षित आणि देशाच्या हवाई क्षेत्राला एक नवी उंची प्रदान करणारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे राष्ट्रार्पण आज, दि. ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या विमानतळामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईनजीक हवाई वाहतुकीचा एक नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. या विमानतळाची वैशिष्ट्ये, त्याची रचना या सर्वांचा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतलेला आढावा...

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण भारताच्या हवाई वाहतुकीच्या क्षेत्रात, एक क्रांतिकारी पायरी ठरत आहे. नवी मुंबईतील उलवे येथे उभारण्यात आलेला हा ग्रीनफील्ड प्रकल्प केवळ प्रवाशांसाठी नव्हे, तर राज्याच्या आर्थिक, औद्योगिक आणि पर्यटन विकासालाही गती देणारा ठरणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या वाढत्या गर्दी आणि जागेअभावी उड्डाणांना येणार्‍या मर्यादांमुळे, या प्रकल्पाची आवश्यकता निर्माण झालीच होती. मुंबईपासून सुमारे ३७ किमी अंतरावर स्थित हे विमानतळ ठाणे आणि रायगड जिल्ह्यांच्या जवळ असल्यामुळे, त्याचे भौगोलिक स्थानही अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.

‘नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड’ (एनएमआयएएल) ही महाराष्ट्रातील नवी मुंबई येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची रचना, विकास, बांधकाम, कामकाज, देखभाल, व्यवस्थापन व विस्तार आदी कामांसाठी स्थापन करण्यात आलेली कंपनी (स्पेशल पर्पज व्हेइकल) आहे. हा संपूर्ण विमानतळाचा प्रकल्प ‘मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड’ आणि ‘सिडको’ यांच्यातील सार्वजनिक-खासगी भागीदारीद्वारे (पीपीपी) उभारण्यात येत आहे.

विमानतळाची स्थापत्य रचना भारताच्या राष्ट्रीय पुष्प कमळावरून प्रेरित आहे. कमळाच्या पाकळ्यांसारखे उंचावणारे स्तंभ आणि भव्य छत या टर्मिनलला एक विशिष्ट ओळख प्रदान करतात. अंतिम टप्प्यात चार टर्मिनल्स तयार होतील, तर सुरुवातीला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कामकाजासाठी एकत्रित टर्मिनल सुरू होईल. वर्षभरात २० दशलक्ष प्रवाशांची क्षमता या टर्मिनलमध्ये असणार आहे. भविष्यात ९० दशलक्षांपर्यंत तिच्यामध्ये वाढ होईल. विमानतळावर दोन समांतर धावपट्ट्या आहेत. प्रत्येक धावपट्टी ३ हजार, ७०० मीटर लांबीची आणि ६० मीटर रुंदीची आहे. यामुळे सर्व प्रकारच्या विमानांना सुरक्षित उड्डाणाची सुविधा मिळते. प्रवासी विमानांचे २४५ स्टॅण्ड्स, मालवाहू विमानांचे सात स्टॅण्ड्स आणि सामान्य उड्डानासाठी ७९ स्टॅण्ड्स या टप्प्यात असतील. यामुळे विमानांची पार्किंग क्षमताही मोठ्या प्रमाणात वाढते.

‘एनएमआयएएल’ने कार्गो हाताळणी पूर्णपणे स्वयंचलित केली असून, प्रत्येक मालाची ट्रॅकिंग १०० टक्के करण्याची सुविधाही दिली आहे. औषधे, नाशवंत पदार्थ, धोकादायक वस्तू, मौल्यवान वस्तू आणि जिवंत प्राण्यांसाठी स्वतंत्र सुरक्षित व्यवस्था राबवण्यात आली आहे. मालवाहतुकीतील प्रक्रियेला तंत्रज्ञानाद्वारे अधिक सुरक्षित, जलद आणि विश्वसनीय बनविण्यासाठी, ‘अर्ध-स्वयंचलित साहित्य हाताळणी प्रणाली’ (एमएचएस) आणि ट्रक व्यवस्थापन प्रणालीचा वापर केला जातो.

विमानतळामध्ये अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाची रचना करण्यात आली आहे. फाईव्ह-जी कनेक्टिव्हिटीमुळे डेटा-ड्रिव्हन टर्नअराऊंड सुधारणा केली जाते. ओळखपत्रे आणि बोर्डिंग पासची मानवरहित तपासणी, स्मार्ट बोर्डिंग आणि स्वयंचलित सामान हाताळणी प्रणाली प्रवाशांसाठी प्रवास अधिक सोपा व वेगवान करतात. तसेच, आयओटीवर आधारित रिअल टाईम देखरेख, भक्कम सायबर सुरक्षा आणि अ‍ॅव्हिओ इन-हाऊस अ‍ॅप या सुविधांमुळे, विमानतळाचे कामकाज अत्यंत कार्यक्षम बनते.

प्रवाशांसाठी सुविधा आधुनिक आणि सोयीस्कर आहेत. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय फूड व बेव्हरेज सुविधा, किड्स प्ले झोन, सीआयपी लाऊंजेस, ट्रान्झिट हॉटेल्स आणि सामान सेवा उपलब्ध आहेत. डिजिटल टनेल्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंटरेक्टिव्ह अनुभवांमुळे, प्रवाशांना महाराष्ट्राच्या वारशाचा आणि संस्कृतीचा अनुभव मिळतो. शुल्कमुक्त विक्रीसाठी आणि रिटेलसाठी मोठ्या जागा राखण्यात आल्या आहेत. तसेच, टर्मिनलमध्येही ११० रिटेल व एफअ‍ॅण्डबी दुकाने आहेत. यामुळे प्रवाशांचा अनुभव अधिकच समृद्ध होतो.

विमानतळाचे नियोजन शाश्वततेच्या तत्त्वांवर आधारित आहे. अंतिम टप्प्यात ४७ मेगावॅट सौरऊर्जा निर्माण केली जाईल. पाणी व्यवस्थापनासाठी वर्षाजल संचयन, पाणी पुनर्वापर आणि कमी प्रवाहाचे फिक्स्चर्स वापरले जातील. विमानतळ परिसरात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर, ऑटोमेटेड पीपल मूव्हर्सद्वारे अंतर्गत वाहतूक आणि कमलाच्या स्तंभांच्या जाळीदार संरचनेमुळे, नैसर्गिक थंडावा निर्माण करण्याचे तंत्रज्ञान अंगीकारले गेले आहे. ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ हा प्रकल्प फक्त प्रवासी आणि मालवाहतुकीसाठीच नव्हे, तर महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक आणि पर्यटन विकासालाही गती देणारे ‘ग्रोथ इंजिन’ आहे. या विमानतळामुळे मुंबईवरील हवाई ताण कमी होईल, पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांसाठी प्रवास सोपा व वेगवान होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरला असून, महाराष्ट्राच्या आणि भारताच्या विकासाला नवे पंख देणारा ठरणार आहे.


मुरलीधर मोहोळ

(लेखक केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री आहेत.)