आपण या लेखमालेत वेगवेगळ्या मंदिरांची भेट घेत आहोत. पण, आज एक महत्त्वाचा आणि वेगळा विषय मांडणार आहे. भारतात झालेले परकीय आक्रमण, अनेक नैसर्गिक आपत्ती आणि स्थापत्यातल्या काही त्रुटी, यामुळे साधारण 48 हजारांपेक्षा जास्त मंदिरे उद्ध्वस्त झाली आहेत. या सर्व प्रक्रियेत त्या त्या भागातले अनेक अवशेष, हे एकत्रित संग्रहालयात ठेवण्यात आले. अशा अनेक अवशेषांचा खजिना असलेल्या एका महत्त्वपूर्ण संग्रहालयाचा घेतलेला मागोवा...
भारतीय संग्रहालय, कोलकाता
हे भारतातील तसेच आशियातील सर्वांत जुने संग्रहालय मानले जाते. याची स्थापना 1814 साली ‘एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल’ने केली. या संग्रहालयाच्या स्थापनेमागील प्रमुख व्यक्तिमत्त्व होते डॉ. नॅथॅनिएल वॉलिश, जे डॅनिश वंशाचे वनस्पतिशास्त्रज्ञ व शल्यचिकित्सक होते. या संग्राहलयात अनेक वेगवेगळ्या गॅलरी आहेत, जिथे नाण्यांपासून शिल्पांपर्यंत आणि मातीच्या तुकड्यांपासून ममीपर्यंत अनेक गोष्टी ठेवल्या आहेत. आपण आज इथल्या शिल्पांच्या दालनाला भेट देणार आहोत.
रंगपंचमी उत्सव
आपल्या सर्वच परंपरा-उत्सव किती जुने आहेत. शेकडो वर्षे कसे सुरू आहेत, याचे पुरावे आपल्याला मंदिरांमध्ये मिळतात. मधल्या काळात रंगपंचमी ही मुघल काळात सुरू झाली, अशा पद्धतीच्या काही पोस्ट आणि लेख फिरत होते. त्यांना चपराक लगावणारे हे शिल्पं आहे. साधारण 900 वर्षे जुने शिल्पं, तंजावर इथून प्राप्त झालेले आहे. यामध्ये मधोमध पाण्याने भरलेले कुंड असून, त्यातूनच पिचकारीने आपल्या सखीवर एकजण पाणी उडवत आहे. दुसऱ्या बाजूने रंग हातात घेऊन ती आपल्या सखीवर उडवत आहे. दोन्ही बाजूला आपल्याच नादात वादक वाद्य वाजवत आहेत, तर नर्तक नृत्य करत असताना आपल्याला बघायला मिळतात.
मुरलीधर
मंदिराच्या प्रवेशद्वारावरच्या पट्टीला ‘ललाट’ असे म्हणतात. त्या ललाटावर हे शिल्पं होते. कर्नाटकमधल्या हळेबिडू इथून हे शिल्पं मिळालेले आहे. दोन्ही बाजूला मकर तोरण असून, त्यांच्यापुढे दोन्ही बाजूला शंख, चक्र, गदा आणि पद्म घेतलेले विष्णु आहेत. मधोमध श्रीकृष्ण असून, तो बासरीवादन करत आहे. आजूबाजूला त्याला वंदन करत उभे असलेले अनेक भक्त दिसतात. तसेच, अनेक गाय आणि वासरूदेखील कोरलेले आहेत. वरच्या बाजूला मी, अधोमध कीर्तिमुख असून, त्यांच्या दोन्ही बाजूला आठ दिशांचे आठ देव कोरलेले दिसतात. त्यात हत्तीवर बसलेला इंद्र, मनुष्यावर बसलेला कुबेर, बैलावर बसलेला इशान हे स्पष्ट दिसतात.
गणपती
भारताचे बाहेरच्या देशांबरोबर किती घट्ट सांस्कृतिक संबंध होते, हे विशद करणारी ही मूत. साधारण 1 हजार, 100 वर्षे जुनी मूत इंडोनेशिया या देशातून मिळाली आहे. या गणेशाला चार हात असून, दुर्दैवाने तीन हात तुटलेले आहेत. पण, एका हातातली अक्षमाला इथे स्पष्ट दिसते. खांद्यावरून जाणारे यज्ञोपवित धारण करून कमळाच्या आसनावर गणपती बसलेला आहे. यातली बघायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोक्यावर जटा असून, त्यासमोर चामुंडेच्या किंवा भैरवाच्या मुकुटावर असते तसे नरमुंड दिसते. कदाचित तिथे होत असणाऱ्या तंत्र उपासनेशी निगडित ही मूत असावी, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
सूर्य
आपल्या संपूर्ण सृष्टीला प्रकाशमान करणारा देव म्हणजे सूर्यनारायण. या सूर्यमूत उपासनेचा प्रवास प्राचीन पर्शिया ते भारत असा झालेला आहे. सूर्याची मूत ओळखणे त्या मानाने सोपे आहे. हातात दोन कमळे धरून, हा सूर्य उभा असलेला आपल्याला दिसतो. पायाशी अरुण नावाचा सारथी असून, दोन्ही बाजूला उषा आणि प्रत्युषा या त्याच्या शक्तिरूप सहकारी दिसतात. दंड आणि पिंगळ हे त्याचे दोन सहकारीदेखील इथे कोरलेले आहेत. मूतच्या पायात असलेल्या बुटांवरून त्याची सूर्य म्हणून ओळख अधिक पक्की होत जाते. ही सर्व मंदिरे परंपरांचे केंद्र होती परंतु, इतिहासाच्या ओघात अनेक मंदिरे नष्ट झाली; कधी आक्रमणांमुळे तर कधी काळाच्या आघातामुळे. या मंदिरे उद्ध्वस्त झाली असली, तरी त्यांचे काही अवशेष, शिल्पे आणि मूत आज संग्रहालयांमध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मंदिरांचा इतिहास समजून घेण्यासाठी केवळ शिलालेख किंवा ग्रंथ नव्हे, तर संग्रहालयेदेखील महत्त्वाचा स्रोत ठरतात.
म्हणूनच मंदिर इतिहास समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने, संग्रहालयांना नक्की भेट द्यावी. संग्रहालयातील वस्तू केवळ कलाकृती नसून, त्या आपल्या इतिहासाच्या जिवंत साक्षी आहेत. ती आपल्याला सांगतात की, आपल्या पूर्वजांनी कोणत्या श्रद्धा, कल्पना आणि कौशल्याने मंदिरे घडवली. संग्रहालयातील अनुभवामुळे आपण मंदिरांच्या वारशाकडे अधिक आदराने आणि सखोल दृष्टिकोनातून पाहू शकतो. मंदिरांच्या अभ्यासासोबतच संग्रहालयांना दिलेली भेटही ,आपल्याला आपल्या सांस्कृतिक ओळखीचे अधिक परिपूर्ण आकलन करून देते.
7841934774
- इंद्रनील बंकापुरे