‌‘मिग-21‌’ निवृत्ती आणि भारतीय हवाई दलासमोरील आव्हाने आणि संधी....

    05-Oct-2025
Total Views |

भारताच्या आसमंतात गेली 50 वर्षे भीमपराक्रमाने गर्जना करणारे ‌‘मिग 21‌’ हे लढाऊ विमान अखेर निवृत्त झाले. या विमानाने भारतीयांना अनेक युद्धांमध्ये निर्णायक विजयाचा मार्ग सुकर करून दिला. त्यामुळे या विमानाबरोबर भारतीय वायू दलाच्या असंख्य आठवणीही आहेत. आज ‌‘मिग 21‌’च्या निवृत्तीमुळे भारतीय हवाई दलासमोरील आव्हांनामध्येही वाढ झाली आहे. विमानांची कमी होणारी संख्या भरणे, हे सर्वांत मोठे आव्हान. त्यानिमित्ताने ‌‘मिग 21‌’चा प्रवास आणि भारतासमोरील आव्हान असलेल्या संधीचा घेतलेला आढावा...

भारतीय हवाई दलात 1963 साली समाविष्ट झालेले ‌‘मिग 21‌’ लढाऊ विमान, सहा दशकांहून अधिक काळाच्या सेवेनंतर दि. 26 सप्टेंबर रोजी निवृत्त झाले. 1965 आणि 1971 सालच्या युद्धांमध्ये, 1999 सालच्या कारगिल संघर्षात ‌‘मिग-21‌’ने महत्त्वाची भूमिका बजावली होती. 62 वर्षांच्या राष्ट्रसेवेनंतर या विमानाला निवृत्ती देताना, हवाई दल प्रमुख ए. पी. सिंह यांनी 23 स्क्वॉड्रनमधील सहा विमानांसह शेवटचे उड्डाण केले.

1963 साली पहिले ‌‘मिग-21‌’ भारतीय आकाशात आले आणि 1964 साली ते नियमित सेवेत दाखलही झाले. त्यावेळी ‌‘मिग-21‌’ हे आशियातील सर्वांत आधुनिक युद्धविमान मानले जात होते. त्याची दोन मॅकपेक्षा जास्त गतीने उड्डाण करण्याची क्षमता, भारतीय हवाई दलाला प्रचंड आत्मविश्वास देणारी ठरली. लहान आकार, चपळ हालचाली आणि सोयीस्कर टेकऑफ क्षमतांमुळे हे वैमानिकांना लवकर आत्मसात करता आले.

1965, 1971चे भारत-पाक युद्ध, कारगिल युद्ध आणि ‌‘मिग-21‌’

‌‘मिग-21‌’ अधिकृतपणे 1965 सालच्या भारत-पाक युद्धाच्या मध्यावर कार्यरत झाले. या युद्धात त्याचा वापर तुलनेने कमी प्रमाणात झाला असला, तरी त्याने दाखवलेल्या प्रभावी क्षमतांमुळे पाकिस्तानच्या ‌‘सबरे‌’, ‌‘स्टारफायटर‌’ यांसारख्या विमानांना आव्हान देता आले.

1971 सालचे युद्ध ‌‘मिग-21‌’च्या इतिहासातील सर्वांत गौरवशाली अध्याय ठरले. ढाका, चिटगाव यांसारख्या महत्त्वाच्या हवाई तळांवर, ‌‘मिग-21‌’ने अचूक बॉम्बहल्ले केले. त्या युद्धात ‌‘मिग-21‌’ने पाकिस्तानचे अनेक ‌‘साबरे‌’ जेट आणि ‌‘स्टारफायटर‌’ पाडून, भारतीय हवाई दलाला विजयपथावर अग्रेसर केले.

कारगिल युद्धाच्या वेळीही ‌‘मिग-21‌’ भारतीय लष्कराच्या मदतीला धावून आले. जरी त्या वेळेस ‌‘मिराज-2000‌’सारख्या त्यावेळेच्या अत्याआधुनिक विमानांची मदत घेतली गेली असली, तरी सीमारेषेवरील गस्त, लो-लेव्हल बॉम्बिंग आणि इत्यर विमानांना युद्धसहकार्य देण्याच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या ‌‘मिग-21‌’ने उत्तम निभावल्या. फेब्रुवारी 2019 मधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतरही, पाकिस्तानी लढाऊ विमानांना प्रत्युत्तर देताना विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांनी, ‌‘मिग-21 बायसन‌’मधूनच पाकिस्तानी ‌‘एफ-16‌’ला पाडून एक इतिहास घडवला.

‌‘मिग-21‌’चे गुणविशेष आणि योगदान

सुपरसॉनिक गती, कमी अंतरावरून वेगाने उड्डाण करणे, रणांगणावर बहुउद्देशीय कार्ये, हवाई संरक्षण, गस्त, बॉम्बहल्ले, तांत्रिकदृष्ट्या साधे आणि भारतात परवडणारे, भारतीय वैमानिकांसाठी आत्मसात करण्यास सुलभ े असे हे अष्टपैलू विमान होते. त्यावेळी 872 हून अधिक ‌‘मिग-21‌’ विमाने भारतीय सेवेत आली होती.

‌‘फ्लायिंग कॉफिन‌’चे लेबल

मात्र काळाबरोबर ‌‘मिग-21‌’विषयी तक्रारी वाढू लागल्या. विमान जुने झाल्यामुळे त्यात तांत्रिक बिघाड होण्याचे प्रमाण वाढले. प्रशिक्षणाच्या वेळी किंवा प्रत्यक्ष उड्डाण करताना अचानक बिघाड होऊन, अपघात झाले. 1963 सालापासून 2020 सालापर्यंत शेकडो ‌‘मिग-21‌’चे अपघात झाले व अनेक शूर भारतीय वैमानिकांना प्राण गमवावे लागले. या अपघातांमुळेच ‌‘मिग-21‌’ला ‌‘फ्लायिंग कॉफिन‌’ किंवा ‌‘विडो मेकर‌’ अशी टोपणनावेही मिळाली. हवाई दलाने सुधारित बायसन अपग्रेड आणून त्याला आधुनिक रडार, क्षेपणास्त्र प्रणालीची जोड दिली. परंतु, तरीही मूलभूत रचना 50 वर्षांपेक्षा जुनी असल्याने धोका वाढताच राहिला. 2020 सालानंतर भारतीय हवाई दलाने टप्प्याटप्प्याने ‌‘मिग-21‌’ सेवेतून निवृत्त करण्यास सुरुवात केली.

‌‘मिग-21‌’चा प्रवास भारतीय हवाई दलाच्या प्रगतीचा आरसा

‌‘मिग-21‌’चा प्रवास म्हणजे भारतीय हवाई दलाच्या प्रगतीचा आरसा आहे. 1963 साली सुरू झालेला हा प्रवास 2025 साली संपतो आहे. या काळात युद्ध, संघर्ष, शौर्य, विजय, अपघात, बलिदान सर्व काही या विमानाने अनुभवले. ‌‘मिग-21‌’ हे भारतीय हवाई दलाचे पहिले सुपरसॉनिक विमान होते आणि त्याने अर्धशतकाहून अधिक काळ भारतीय आकाशाचे संरक्षण केले. त्याच्या मर्यादांवर टीका झाली असली, तरी त्याचे योगदान अमूल्य असेच आहे.

‌‘मिग-21‌’ निवृत्ती आणि भारतीय हवाई दलाच्या भविष्यातील आव्हाने

‌‘मिग-21‌’च्या निवृत्तीनंतर, हवाई दलाच्या स्क्वॉड्रनची संख्या 31 वरून 29 वर आली आहे. यामुळे आवश्यक 42-44 स्क्वॉड्रनच्या तुलनेत, लक्षणीय तूट निर्माण झाली. या पोकळीची भरपाई करण्यासाठी ‌‘तेजस‌’ या स्वदेशी हलक्या लढाऊ विमानाचा ताफ्यात समावेश करण्यात येत आहे. ‌‘तेजस‌’चे आगमन हे ‌‘आत्मनिर्भर भारता‌’साठी महत्त्चाचे असून, त्यातून भारताचे संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबन आणि तांत्रिक क्षमतेची चाचणी होणार आहे.

‘तेजस‌’ : स्वदेशी लढाऊ विमान

‌‘तेजस‌’ हा भारताचा पहिला स्वदेशी लढाऊ विमान प्रकल्प आहे. भारतीय हवाई दलाने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सोबत ‌‘83 तेजस एम के -1 ‌’ विमानांच्या खरेदीसाठी, सुमारे 48 हजार कोटींचा करार केला आहे. ही विमाने टप्प्याटप्प्याने हवाई दलात दाखल होणार आहेत.

तेजस‌’च्या मर्यादा
‌‘तेजस‌’ स्वदेशी यशाचे प्रतीक असले, तरी काही मर्यादा आहेत :


मोठ्या मोहिमांसाठी आवश्यक लांब पल्ल्याची क्षमता ‌‘तेजस‌’मध्ये अद्याप अपुरी आहे. मोठ्या प्रमाणावर उत्पादन व देखभालीसाठी पायाभूत सुविधा उभारणे गरजेचे आहे. चीनकडे ‌‘जी 20‌’सारखी ‌‘स्टेल्थ विमाने‌’ आहेत; त्याच्या तुलनेत ‌‘तेजस‌’ अद्याप चौथ्या पिढीत आहे. ‌‘एलसीए मार्क-1ए‌’ हे हवाई दलाच्या ‌‘मिग-21‌’ ताफ्याची जागा घेईल ‌‘तेजस‌’ प्रकल्प हा केवळ संरक्षणात्मक गरज भागवण्यासाठी नसून, ‌‘आत्मनिर्भर भारत‌’ या राष्ट्रीय दृष्टिकोनाचा गाभा आहे. स्वदेशी उत्पादनामुळे परकीय आयातीवरील अवलंबित्व कमी होईल. संरक्षण क्षेत्रात रोजगारनिर्मितीही होईल. भारत निर्यातदार देश म्हणून उदयास येईल.

फेब्रुवारी 2021 साली सरकारने ‌‘83 तेजस मार्क-1ए‌’ विमाने खरेदी करण्यासाठी ‌‘एचएएल‌’ सोबत 48 हजार कोटी रुपयांचा करार केला. परंतु, अमेरिकन इंजिनांच्या वितरणात विलंब झाल्यामुळे ‌‘एचएएल‌’ने अद्याप एकही विमान दिलेले नाही. ‌‘एचएएल‌’ 2028 सालापर्यंत सर्व विमाने हवाई दलाला देण्याची अपेक्षा आहे. ‌‘एलसीए मार्क 1ए‌’ हे ‌‘तेजस‌’ विमानाचे प्रगत रूप आहे. त्यात अपग्रेडेड एव्हियोनिक्स आणि रडार सिस्टम आहेत. ‌‘एलसीए मार्क 1ए‌’चे 65 टक्क्यांपेक्षा जास्त घटक भारतात तयार केले जातात. ‌‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ‌’ने विकसित केलेले ‌‘तेजस‌’ हे एकल इंजिन हलके लढाऊ विमान आहे. नुकतीच दि. 19 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने 97 ‌‘एलसीए मार्क 1ए‌’ लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी, 62 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.

‌‘एचएएल‌’चा सर्वांत मोठा कमकुवत दुवा म्हणजे, त्यांना अनेक कारणांमुळे नवीन विमाने बनवण्याच्या अपेक्षित वेग साधता येत नाही. हवाई दलामध्ये दरवष किमान 35 ते 40 नवीन विमानांचा समावेश होणे आवश्यक आहे. यामुळे आगामी काळात निवृत्त होणाऱ्या मिराज आणि ‌‘जग्वार‌’ लढाऊ विमानांची जागा वेळेत घेता येईल.

मात्र, या कामात ‌‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ‌’ला पूर्णपणे अपयश आलेले आहे. पुन्हा एकदा भारत सरकारने ‌‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ‌’ची क्षमता वाढवण्यासाठी, एका समितीची नियुक्ती केली आहे. जेणेकरून ‌‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड‌’आपले काम वेळेवर पूर्ण करू शकेल. आशा आहे की, येणाऱ्या काळात ‌‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ‌’ आपली उत्पादन क्षमता वाढवून, जुनी होणारी विमाने बदलण्याचा वेग वाढवेल. यामुळे हवाई दलाची युद्ध क्षमता कमी होणार नाही.

भारताचे आगामी उपाय

‌‘तेजस एमके-2‌’ - अधिक शक्तिशाली इंजिन, वाढलेली रेंज आणि पेलोड क्षमता.

‌‘एएमसीए‌’ - भारताचे पहिले पाचव्या पिढीचे स्टेल्थ विमान.

आंतरराष्ट्रीय सहकार्य - फ्रान्स, अमेरिका, इस्रायल यांच्याकडून तंत्रज्ञान हस्तांतरण.

मानवरहित यंत्रणा - भावी युद्धात ड्रोन स्वॉर्म मोठी भूमिका बजावणार आहे.

निष्कर्ष

‌‘मिग-21‌’ची निवृत्ती ही एका युगाचा अंत आहे, तर ‌‘तेजस‌’चे आगमन हे एका नव्या युगाची सुरुवात आहे. भारताला सध्या स्क्वॉड्रनच्या संख्येची आणि तंत्रज्ञानातील दरीची समस्या भासत असली, तरी ‌‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ‌’ची विमान उत्पादन क्षमता वाढवणे, ‌‘तेजस मार्क-2‌’चे संशोधन अधिक जलद करणे, नवीन राफेल विमाने घेण्याची आणि भारतात बनवण्याची योजना आखणे, तसेच ‌‘एएमसीए‌’ या आधुनिक विमानासाठी करार करणे अशा बहुआयामी योजना राबवून, हवाई दलाची शक्ती वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या विविध उपाययोजनांमध्ये आपल्याला यश मिळेल आणि भारतीय हवाई दल अधिक सक्षम बनेल, हीच अपेक्षा आहे.

- (नि.) ब्रि. हेमंत महाजन