ज्यावेळी भारतीय ऑलिम्पिक संघटना अनेक आरोपांना तोंड देत समर्थ होण्यासाठी संघर्ष करत होती, त्यावेळी तिची जबाबदारी आपल्या सक्षम खांद्यावर पेलून या संघटनेला शिस्त लावणारे, देशात धनुर्विद्येची पायाभरणी करणारे प्रा. विजयकुमार मल्होत्रा यांचे नुकतचे निधन झाले. यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा...
प्रा. विजयकुमार मल्होत्रा यांचे ९३व्या वर्षी दि. ३० सप्टेंबर रोजी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. एम्स येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. वार्ध्यक्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. प्रा.मल्होत्रा यांच्या निधनाने भाजपने एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व गमावले आहे. विजयकुमार मल्होत्रा यांची आठवण जेव्हा जेव्हा निघेल, तेव्हा क्रीडाविश्वातलेही त्यांचे योगदान कोणालाही विसरता येणार नाही.
लोकसभा खासदार प्रा. विजयकुमार मल्होत्रा हे गेल्या अनेक दशकांपासून दिल्लीतील सर्वांत लोकप्रिय व्यक्तींपैकी एक होते. त्यांनी असंख्य क्षेत्रांत विविध पदांवर, एकनिष्ठेने जनसेवा केली आहे.
प्रा. मल्होत्रा यांचा जन्म दि. ३ डिसेंबर १९३१ रोजी, लाहोरमधील एका मध्यमवर्गीय पंजाबी कुटुंबात झाला. प्रा. मल्होत्रा त्यांच्या घरातील जेष्ठ संतान. त्यांचे वडील डॉ. खजान चंद मल्होत्रा हे एक निष्णात आयुर्वेद वैद्य आणि व्यवसायिक होते. प्रा. मल्होत्रांचे संगोपन एका बौद्धिक, उदारमतवादी घरगुती वातावरणात झाले. त्यांचे आईवडील आर्य समाजाच्या परंपरांचे अनुयायी होते. परिणामी त्यांच्या पाच बहिणी आणि धाकटा भाऊ यांच्यासह, घरातील सर्वच मुलांना उच्च नैतिक मूल्ये आणि समकालीन शिक्षण देण्यावर मल्होत्रा यांच्या पालकांचा विश्वास होता.
१९७५ साली इंदिरा गांधी यांनी लादलेल्या निरंकुश आणीबाणीच्या काळात प्रा. मल्होत्रा यांनाही अटक झाली होती. दिल्ली, अंबाला, चंदीगढ आणि हिस्सार येथील तुरुंगात त्यांचा १९ महिने कठोर छळ करण्यात आला. यामुळे ते गंभीर आजारी पडले आणि त्यांना चंदीगढच्या ‘पीजीआय मेडिकल इन्स्टिट्यूट’मध्ये दाखल करावे लागले. चंदीगढच्या ‘पीजीआय’मध्ये १०० रुग्णांसाठी असलेल्या संपूर्ण वॉर्डमध्ये, त्यांना मात्र एकांतवासातच ठेवण्यात आले. परिणामी डॉ. मल्होत्रा यांना गंभीर मानसिक आघातही सहन करावा लागला.
जनसंघापासून ते आजच्या भाजपमधील एक अनुभवी राजकारणी असण्यासोबतच, विजयकुमार मल्होत्रा हे एक कुशल क्रीडा प्रशासकदेखील होते.
भारतातील क्रीडा विकासासाठी त्यांच्या समर्पणामुळे, त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडा जगतातील सर्वोच्च संस्थांमध्ये अनेक महत्त्वाची पदेही भुषवली. ‘भारतीय तिरंदाजी संघटने’चे अध्यक्ष आणि ‘आशियाई तिरंदाजी महासंघ’ तसेच ‘कॉमनवेल्थ तिरंदाजी फाऊंडेशन’चे संस्थापक अध्यक्षपदाची जबाबदारीही प्रा.मल्होत्रा यांनी सांभाळली. २०१० सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दिल्लीत आणणार्या आणि त्यासाठी कठोर परिश्रम करणार्या चमूचे ते अग्रगण्य सदस्य होते. २०१० सालच्या ‘कॉमनवेल्थ गेम्स’च्या कार्यकारी मंडळाचेही ते सदस्य होते. देशात धनुर्विद्येच्या खेळाला अग्रस्थानी आणणारा माणूस म्हणून, त्यांना कायमच स्मरण केले जाईल.
२०१० सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणात सुरेश कलमाडी यांना अटक झाल्यानंतर, मल्होत्रांना दि. २६ एप्रिल २०११ ते दि. ५ डिसेंबर २०१२ रोजीपर्यंत ‘भारतीय ऑलिम्पिक संघटने’चे (आयओए) कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते. एक स्वच्छ आणि संघर्षरहित प्रशासक म्हणून त्यांची ओळख होती. २०१० सालच्या राष्ट्रकुल क्रीडा घोटाळ्यामुळे देशाची क्रीडा प्रतिमा मलिन झाली होती, तेव्हा त्यांनी ‘आयओए’ला कठीण काळात मार्गदर्शन केले. खरं तर, त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी ‘आयओए’ प्रशासनात सुसूत्रता आणण्यात यश मिळवले. गटबाजीने ग्रस्त असलेल्या ‘आयओए’च्या राजकारणापासून ते दूर राहण्यात यशस्वी झाले. त्यांच्या अंतरिम कार्यकाळानंतर निवडणूक झाली, ज्यामुळे अखेर ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती’ने ‘आयओए’ला निलंबित केले होते.
अभय सिंग चौटाला अध्यक्ष आणि ललित भानोत सरचिटणीसपदी निवडून आलेल्या निवडणुकीनंतर दि. ४ डिसेंबर २०१२ रोजी, ‘आयओए’वर बंदी घालण्यात आली. परंतु, दि. ११ फेब्रुवारी २०१४ रोजी ‘आयओसी’ने ती रद्द केली आणि अखेर मल्होत्रा ‘आयओए’चे आजीवन अध्यक्ष झाले.
१९७४ साली तेहरान आशियाई क्रीडा स्पर्धेत, ते भारतीय पथकाचे ‘शेफ-डी-मिशन’देखील होते. तथापि, भारतीय तिरंदाजीला मल्होत्रा यांनीच जोपासले. १९७३ ते २०१५ सालापर्यंत ते ४० वर्षांहून अधिक काळ राष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष होते. दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी, त्यांच्या नेतृत्वाखाली ‘एएआय कार्यकारी समिती’ सदस्य म्हणून काम पाहिले आहे.
१९७२ सालच्या म्युनिक गेम्समध्ये हा खेळ ऑलिम्पिक म्हणून निवडल्यानंतर, एका वर्षानंतर १९७३ साली स्थापन झालेल्या ‘आर्चरी असोसिएशन ऑफ इंडिया’ (एएआय)अंतर्गत मल्होत्रांच्या चिकाटीमुळे भारतात तिरंदाजीने मूळ धरले. याच काळात ते दिल्लीचे मुख्य नगरसेवकदेखील होते. १९७२ सालच्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये मल्होत्रा भारतीय पथकासोबत असतानाच ही कल्पना उदयास आली. त्यांच्याशी संबंधित असलेल्या जुन्या काळातील लोकांच्या मते, मल्होत्रांनी म्युनिकमध्ये भारतीय धनुर्धारींची अनुपस्थिती पाहिली आणि परतल्यानंतर त्यांनी भारतीय धनुर्धारी संघटनेची स्थापना केली.
‘एएआय’चे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांच्या प्रयत्नांतून, एप्रिल १९७३ मध्ये दिल्ली येथे पहिल्या वरिष्ठ राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे ५० पुरुष आणि महिला खेळाडूंनी, बांबूपासून बनवलेल्या धनुष्यबाणांसह भाग घेतला होता.
मल्होत्रा आणि तत्कालीन ‘एएआय’चे सरचिटणीस गोपेश मेहरा यांनी आशियामध्ये धनुर्विद्या खेळाची सुरूवात केली आणि १९७८ साली आशियाई खेळांदरम्यान, बँकॉकमध्ये ‘आशियाई धनुर्विद्या महासंघ’ (आता ‘जागतिक धनुर्विद्या आशिया’ म्हणून ओळखले जाते)ची स्थापना करण्यात आली. मल्होत्रा हे त्या संस्थेचे पहिले अध्यक्ष आणि पी. एन. मुखर्जी हे पहिले सरचिटणीस म्हणून निवडले गेले. १९८० मध्ये भारताने कोलकाता येथे, पहिली आशियाई स्पर्धा आयोजित केली होती. १९९५ साली नवी दिल्ली येथे पहिली कॉमनवेल्थ आर्चरी चॅम्पियनशिप आयोजित करण्यासाठी, मल्होत्रा यांनीच पुढाकार घेतला होता. कॉमनवेल्थ अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान, ‘कॉमनवेल्थ आर्चरी फेडरेशन’ची स्थापना झाली. त्याच्या अध्यक्षपदीही मल्होत्रा यांचीच म्हणून निवड झाली. २०१० सालच्या कॉमनवेल्थ गेम्सच्या यादीत तिरंदाजीचा समावेश करण्यात, त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
२०१२ ही ‘एएआय’ अध्यक्ष म्हणून मल्होत्रांची शेवटची निवडणूक ठरली. व त्यावेळी त्यांचे वय ८० होते. ते सरकारच्या क्रीडा संहितेंतर्गत वय आणि कार्यकाळ निर्बंध कलमाचे उल्लंघन होते. परिणामी, सरकारला ‘एएआय’ची मान्यता रद्द करावी लागली.
गेल्या काही वर्षांत ऑलिम्पिक पदकाची वाट पाहिली जात असली, तरी आशियाई, राष्ट्रकुल आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदके जिंकणार्या धनुर्धारी खेळाडूंची संख्या झपाट्याने वाढली आहे. २०१५ साली मल्होत्रा यांनी राजीनामा दिला आणि त्यांना ‘अखिल भारतीय क्रीडा परिषदे’चे (एआयसीएस) अध्यक्ष बनवण्यात आले. ही क्रीडा मंत्रालयाची सल्लागार संस्था होती आणि या संस्थेने मोठ्या नेत्याला राज्यमंत्रिपदाचा दर्जादेखील दिला होता.
‘क्वीन्स बॅटन’ म्हणजे ‘राणीचा संदेशवाहकाचा दंड’
हा एक खास दंड असून, तो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या सुरुवातीच्या समारंभात वापरला जातो आणि त्यात स्पर्धेचा संदेश असतो. ‘क्वीन’ म्हणजे ‘राणी’ आणि ‘बॅटन’ याला मराठीत ‘दंड’ किंवा ‘काठी’ असे म्हटले जाते. याचा वापर एखाद्या विशिष्ट संदेशासाठी केला जातो. हा दंड एका राज्याकडून दुसर्या राज्याकडे पाठवला जातो, ज्याच्या माध्यमातून राष्ट्रकुल खेळांच्या स्पर्धेचा संदेशही दिला जातो. सगळ्या राष्ट्रकुल देशांतील प्रमुख ठिकाणी ‘क्वीन्स बॅटन’ दिमाखात फिरवण्यात येतो. सन २०१४च्या ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांचा ‘क्वीन्स बॅटन’ दि. ११ ऑक्टोबर २०१३ रोजी भारतात दाखल झाला होता. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘भारतीय ऑलिम्पिक संघटने’चे तत्कालीन प्रभारी प्रमुख विजयकुमार मल्होत्रा आणि इतर अधिकार्यांनी त्याचे स्वागत केले. हा स्वागत समारंभ काही मोजक्याच खेळाडू आणि अधिकार्यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आला.
या वर्षीचा दसरा दि. २ ऑक्टोबर रोजी झाला, तसा २०१३ साली दसरा दि. १३ ऑक्टोबर रोजी होता. दि. १३ ऑक्टोबर रोजी होणार्या दसरा महोत्सवामुळे सुरक्षा व्यवस्थेतील अडचणी लक्षात घेऊन, ‘क्वीन्स बॅटन’चे भारतातील काही कार्यक्रम रद्द करण्यात आले.
या अशा कुशल क्रीडा प्रशासकाच्या सन्मानार्थ दिल्ली सरकारने, एक दिवसाचा दुखवटाही जाहीर केला. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील या नेत्याला जशी दिल्ली मुकली, तसेच देशाचे क्रीडाविश्वदेखील मुकले आहे. भारतीय क्रीडाविश्वाला विजयी करण्यासाठी झटलेल्या विजयकुमार यांना, आपण या ठिकाणी आदरांजली अर्पण करूया.
श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४