दुर्दम्य अभिलाषा...

    19-Mar-2024   
Total Views |
Abhilasha Vartak

आई, पत्नी, सून, मुलगी इथंपासून ते शिक्षिका, समाजसेविका, क्रिकेटर अशी अनेक बिरुदे मिरवणार्‍या आणि तेवढ्याच साकल्याने त्या सर्व जबाबदार्‍या पेलून, आपलं अस्तित्व सिद्ध केलेल्या अभिलाषा वर्तकविषयी...

माधवी देसाईंचं आत्मचरित्र आहे-’नाच गं घुमा.’ त्या म्हणतात की, ”स्त्री नेहमी नाचत असते, कधी तिला समाजाच्या तालावर नाचावं लागतं, तर कधी तिला स्वतःचा ताल सापडतो. पण, नाचणं अपरिहार्य असतं.” अभिलाषाची गोष्ट थोडी वेगळी. थोडी नवलाईची आणि थोडी सुंदरसुद्धा. ती अशीच आहे-हसरी, खेळकर, सतत लोकांच्या मदतीसाठी धावणारी, समंजस. तीच गाव मूळचं पुण्याजवळचं. पण, जन्मापासून ती वसईतच वाढली. तिथेच शाळा, जवळच महाविद्यालय आणि आता सासरसुद्धा वसईतच.तिचे बाबा गिरणी कामगार. गिरण्या बंद पडल्या आणि नोकरीही गेली. काही रात्रींचा गुजराण केवळ खिचडीवरच निभावून नेला. वडील मग कामगार चळवळीचे नेते झाले. हे नेतेपण त्यांच्या रक्तातच होतं. आता घर नीट चालू लागलं. घरात सुबत्ता आली. पण, तरीही खर्च करताना, विचार करावा लागेच. अभिलाषा शाळेत सर्व खेळाच्या संघाची कॅप्टनच; परंतु तिच्याचकडे घालायला ट्रॅकसूट नाही. वडिलांनी दादरवरून मग तो आणला. अशी ती वडिलांची लाडकी. बहीण नोकरी करत होती. आपलीही शाळा संपली की, महाविद्यालय करता-करता आपण घराला आर्थिक हातभार लावायला हवा, असं तिला वाटायचं. बहिणीच्याच वाणिज्य शाखेत तिने काम सुरू केले. पण, एका जागी बसून करावं, ते काम कसलं?

पहिल्याच दिवशी घरी येऊन, रड रड रडली. शेवटी एका कॉम्प्युटर क्लासमध्ये समुपदेशक म्हणून नोकरी मिळाली. इथे मात्र तिच्या आवडीचं काम. रमली. एवढी रुळली की बस्स! लग्नानंतरही याच संस्थेत ती होती. अर्थात, या संस्थेनं तीचं आयुष्य पार बदलून गेलं. बोलण्याचं, समजावून सांगण्याचं, सल्ला देण्याचं काम होतं. आवडीचं. पण, फावल्या वेळात मग ती एखादा चालू वर्गात जाऊन बसायची. सगळं येऊ लागलं. परीक्षा दिल्या आणि मग शिक्षक म्हणूनच काम करू लागली. या काळात अंगभूत हुशारीने संगणक या विषयातलं हार्डवेअर ते सॉफ्टवेअर एवढं सगळं आत्मसात करून घेतलं. या काळात सुद्धा समाजकार्याची साथ तिने सोडली नाहीच. कुणाला वह्या घेऊन दे, कुणाला पुस्तक दे, पेन्सिली जमवून दे, गणवेश दे असं चालू होतच; पण आता ती कमावती झाली होती. आपल्या घरी तिने दोन-तीन दान म्हणून मागून आणि काही वापरलेले संगणक आणून ठेवले. ज्या मुलांना शुल्क भरणे शक्य नसायचे, त्यांना ती आपल्या घरी विनामोबदला शिकवत असे. लहानपणी भुकेजल्या पोटी खाल्लेल्या खिचडीचा मान ठेवून!

महाविद्यालयात असताना, खेळाच्या संघात अभिलाषा चमकत असायची. अशातच दोन डोळे तिच्या वाटेकडे लागून राहिलेले असायचे. एकदा त्यांनी तिला गाठलंच आणि या मुलीला नवं अंगण मिळालं! लग्न करून ती उमेळा गावात आली. उमेळा गाव म्हणजे वसईच्या कला आणि क्रीडाविश्वाचा आत्मा. इथले सगळेच लोक भन्नाट. कलाकार, साहसी, खेळाडू आणि उत्साहाने सदा प्रफुल्लित. तिचं आयुष्य बहराला येण्यासाठी, सगळंच उत्तम जुळून आलं होतं. पण, यावेळी तिला संसार करायचा होता, फुलवायचा होता. सासरहून विरोध झाला होता; परंतु काही काळाने तो मावळला आणि तिने इथेही सगळ्यांना जिंकून घेतलं. सासरची सर्व मंडळी तिच्या बाजूने उभी राहिली आणि ती त्यात गुरफटून गेली. तिला गोंडस बाळ झालं. तिच्यासारखंच धीराचं बाळ. त्याने फार लहान वयात कमवायला सुरुवात केली. अनेक बक्षिसं मिळवली. आईसारखाच स्मार्ट. पण, २०१५ साली तिच्या आयुष्यात एक वादळ आलं. अभिलाषाला बळ त्या वादळानेच दिलं. संसार म्हटलं म्हणजे भांड्याला भांडं लागायचेच. पण, आजवर आपल्या आयुष्याचं संगीत इतरांच्या हातात देऊन, त्या तालावर नाचणारी अभिलाषा आता जागृत झाली. आपलं आत्मभान जागृत होणं गरजेचं असतं. तिला आता तिच्या अस्तित्वाचा अर्थ पुन्हा शोधायचा होता.

आपलं स्वतःचं अस्तित्व पुन्हा सिद्ध करायचं होतं. घरातल्या सर्व नातेवाईकांनी आणि नवर्‍यानेही तिला यात साथ दिली आणि आता तिची घोडदौड पुन्हा सुरू झाली. २०१५ साली तिने उमेळा गावात महिलांचे क्रिकेट सामने भरवले. आपल्या समाजकार्याला पुन्हा जोरदार सुरुवात केली. वेळ देऊ लागली. अवघा पालघर जिल्हा पादाक्रांत केला. विक्रमगडपासून वसईपर्यंत सर्व भागांत, वनवासी खेड्यांतून ती अन्नवाटप, कपडे, शैक्षणिक साहित्य वाटण्यासाठी फिरू लागली.या काळात तिच्या नावाचा उदोउदो होत असताना, भाजपकडून तिला पक्षप्रवेश करण्यासंबंधी वारंवार विचारणा होत होती. एक निवडणूक लढवायची, या इर्षेने तीही प्रचारास लागली. आता मात्र घरातून विरोध होऊ लागला. ‘राजकारणात तू स्वतःची ओळख हरवू नकोस,’ असे घरच्यांचे म्हणणे असे. परंतु, पक्षाचे काम सांभाळून, तिचे समाजकार्य चालूच होते. समाजकार्यात ना पद असतं, ना प्रमोशन. असते केवळ दुर्दम्य इच्छाशक्ती! तिला समाजकार्यासाठी मदत करणारे लोक, जुन्या साड्या, भांडीकुंडी दान करणार्‍या आयाबाया केवळ एकाच पक्षाचे नसल्याने आपल्या समाजकार्याला पक्षाचे नाव जोडणे, तिला योग्य वाटेना. मग तिने आपल्या पदाचाही राजीनामा दिला आणि सर्वस्वी मुक्त झाली. आता आपलं संपूर्ण आयुष्य तिने आपल्या संस्थेसाठी वाहून घेतले आहे. गेल्यावर्षीच ’वर्तक वेलफेअर फाऊंडेशन’ची स्थापना करून, आज तिचे काम स्थानिक पातळीवरून नक्कीच वरच्या पातळीपर्यंत गेले आहे. अनेक संस्थांकडून तिच्या कार्याची दाखल घेऊन, पुरस्कारही जाहीर झाले आहेत, तिचे काम असंच पुढेही सुरू राहावे, हीच दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून सदिच्छा!

 

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.