शेतमजुराचा मुलगा ते आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक!

    31-Jul-2025
Total Views |

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे दिला जाणारा ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार’ आंतरराष्ट्रीय युवा दिग्दर्शक रमेश होलबोले यांना प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय आणि मराठीतील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या शुभहस्ते, ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज’ (डिक्की)चे संस्थापक ‘पद्मश्री’ डॉ. मिलिंद कांबळे व ‘अखिल भारतीय होलार समाज संघटने’चे संस्थापक व समाज नेते अ‍ॅड. एकनाथ जावीर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली आज, दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’तील संत नामदेव सभागृहात संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने...

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे अलौकिकत्व कशात आहे? त्यांच्या जीवनसंघर्षात की त्यांनी लिहिलेल्या अक्षर साहित्यात? अण्णाभाऊंनी स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वातंत्र्य कशासाठी पाहिजे? यांची स्पष्टता करणारे विपुल साहित्य निर्माण केले. अन्याय-अत्याचाराबद्दल त्यांना प्रचंड चीड होतीच. त्याचा त्यांनी प्रतिकार करणे हे स्वाभाविकच होते. पण, त्याच्याही अलीकडे जाऊन माणसांच्या मांगल्याचे गाणे त्यांनी गायिले. त्यांचे जीवन दुःख, वेदना, कष्ट, उपेक्षा आणि अपमान यांनी व्यापलेले आहे. त्याचे प्रतिबिंब त्यांनी आपल्या साहित्यावर पडू दिले नाही. आपल्या दुःख, वेदनांना बाजूला सारून ते समाजाच्या सुख-दुःखाशी समरस झाले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊंना आपला आदर्श मानणारा एक तरुण आपल्या ध्येयाने वेडा होतो, त्याचे नाव आहे रमेश होलबोले.

अभिनय, दिग्दर्शनाच्या क्षेत्रात करिअर करण्याची जिद्द उराशी बाळगून घराबाहेर पडलेल्या रमेश होलबोले या नांदेड जिल्ह्यातील तरुणाने नाट्य दिग्दर्शक, लघुपट निर्माता-दिग्दर्शकापासून ते आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक असा थक्क करणारा प्रवास अवघ्या काही वर्षांतच पूर्ण केला.

होलबोले यांनी ‘भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थे’ची (ऋळश्रा ढशश्रर्शींळीळेप खपीींर्ळीीींंश ेष खपवळर)चित्रपट दिग्दर्शन व पटकथा लेखनविषयक पदवी संपादन करणार्‍या या तरुणाने दिग्दर्शित केलेला ‘पाणी’ ही मुख्य समस्या असलेल्या ‘आगासवाडी’ या लघुपटातून मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. ‘आगासवाडी’ ही सर्वसामान्य माणसाच्या दुःखाला, अभावग्रस्ततेला, वेदनेला मुखर करणारी कहाणी आहे. स्वातंत्र्याला पाऊणशे वर्षे उलटूनदेखील एका खेड्यात प्राथमिक व मूलभूत सुविधाही पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे अस्वस्थ होऊन ‘आगासवाडी’ या लघुपटाची निर्मिती केल्याचे रमेश सांगतो. हा लघुपट ५० पेक्षा अधिक देशांमध्ये पोहोचला.

त्यांना आजपर्यंत जपान, अमेरिका, कॅनडा, रशिया, इटली, जर्मनी आणि पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात २०पेक्षा अधिक पारितोषिके मिळाली आहेत. आता जर्मनीमधील ‘फिल्म केडमी’, ‘बाडेन उटेम्बर्ग’ येथे सांस्कृतिक आदानप्रदान उपक्रमांतर्गत होलबोले यांना जर्मन सरकारची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील हादगाव तालुयातील पळसा या छोट्या गावात एका शेतमजुराच्या घरी जन्मलेल्या रमेशला पुण्यात येऊन अभिनय आणि दिग्दर्शन क्षेत्रात नशीब आजमावयाचे होते. त्यासाठी त्याने फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. हलाखीची कौटुंबिक पार्श्वभूमी, गरिबी, भाषेचा न्यूनगंड आणि आपल्या गावाच्या मानाने पुण्यातील वातावरणाशी जुळवून घ्यायला काही काळ जावा लागला. महाविद्यालयाचे वातावरणही त्याला मानवले नाही. परिणामी, नाटकात काम करण्याची संधी मिळाली नाही. पण, मराठी विषयात ‘एमए’ केले. मुळातच हुशार असल्याने ‘नेट’ व ‘सेट’ परीक्षेतही यश मिळवले. उराशी बाळगलेल्या स्वप्नांच्या मागे धावण्याचा प्रयत्न चालूच ठेवला. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, दिल्ली’ येथे प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न केला. परंतु, तेथे त्याला प्रवेश मिळाला नाही.

पुण्यात ‘भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थे’ची चित्रपट दिग्दर्शन व पटकथा लेखनविषयक पदवी मिळविली. परंतु, या ‘एफटीआय’च्या प्रवेशासाठी तब्बल सात वेळा त्याने परीक्षा दिली. लेखी परीक्षेत त्याला सर्वांत कमी गुण मिळाले. मात्र, ‘ओरिएन्टेशन’ आणि वैयक्तिक मुलाखतीमध्ये सर्वाधिक गुण मिळवत, आपला प्रवेश निश्चित केला. प्रचंड वाचन करत होतेच. विविध चित्रपटही पाहिले. यातूनच एक दृष्टी निर्माण होत होत याच दरम्यान तो मुंबईत आणि बालाजी फिल्म सिटी येथे फिल्म एडिटिंगचे काम शिकला. ‘आगासवाडी’च्या निर्मितीमुळे त्याची ओळख जगभरातील रसिकांशी जोडली गेली. २०२० सालच्या ‘कोविड’ महामारीनंतर जर्मनीमधील ‘फिल्म केडमी’, ‘बाडेन उटेम्बर्ग’ संस्थेची फेलोशिप मिळाली. त्याची भारतातून ‘इंटरनॅशनल कल्चरल प्रोग्राम’साठी निवड करण्यात आली. या संस्थेच्या फेलोशिपसाठी रमेश हा एकमेव भारतीय दिग्दर्शक होता. एकही दिवस सुटी न घेता गरज म्हणून काबाडकष्ट करणार्‍या रमेशच्या आईवडिलांनी त्याला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची जिद्द दिली. मात्र, रमेशची ही यशस्वी वाटचाल पाहण्यासाठी त्याचे आईवडील या जगामध्ये नाहीत, याचे रमेशला मनोमन वाईट वाटते.

रमेशने ‘अजान’, ‘द ब्युटी ऑफ बीबी का मकबरा’, ‘चिरेबंद’, ‘आगासवाडी’, ‘कोलाहल’ आदी लघुपटांची निर्मिती केली आहे. ‘पद्मश्री’ पुरस्कारप्राप्त सुधाकर ओलवे यांच्या जीवनावर आधारित ‘अपार्ट अपार्ट’ या माहितीपटाचे काम जर्मन संस्थेने दिले आहे. त्याला जगभरातील २० नामांकित दिग्दर्शकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली.

रमेशने इटली येथे ‘शोले लुना डॉयुमेंटरी फिल्म फेस्टिवल’मध्ये ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल’मध्ये पारितोषिक मिळवले. इटलीतीलच ‘वाका पापा फिल्म फेस्टिवल’मध्ये ‘माना वैरोवा प्राईज बेस्ट इंडिजिनस डायरेटर’ पारितोषिक पटकावले. रोमानियात ‘सिने मायबीट आंतरराष्ट्रीय विद्यार्थी महोत्सवा’त ‘पाऊल यालेनेस्यु बेस्ट डॉयुमेंटरी’ पुरस्कार पटकावला. त्याचबरोबर जपान, अमेरिका, कॅनडा, रशिया या देशांतील शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक पारितोषिक मिळवली. ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त ‘बेस्ट नॉन फिशन फिल्म’ पुरस्कार मिळाला. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केल्यानंतर जर्मनीतील ‘१९व्या स्टूटगार्ड इंडियन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘परीक्षक’ म्हणूनही काम करण्याचा बहुमान रमेशला मिळाला.

रमेश म्हणतो, "गेल्या १०-१५ वर्षांपासून चित्रपट क्षेत्रात उभे राहण्याचा प्रयत्न करतो आहे. एका मराठी माणसाला या झगमगत्या क्षेत्रात उभारी घेता येईल का? अशी शंका त्याचे अनेक मित्र त्याला बोलून दाखवत होते. परंतु, नागराज मंजुळे यांच्यासारखे मराठी दिग्दर्शक चांगले काम करत असल्याचे पाहून माझा आत्मविश्वास वाढत गेला. चित्रपटाची भाषा समजून घेतली, तर आपणही चांगले काम करू शकतो, असा विश्वास माझ्या मनात निर्माण झाला.” यामुळेच आजचे यश त्याने खेचून आणल्याचे म्हणता येईल. अशा जिद्दी, कष्टाळू रमेशला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासना’चा ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार’ प्रदान करण्यास अतिशय आनंद होत आहे.

(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राचे प्रमुख आहेत.)
डॉ. सुनील भंडगे