मुंबई : 'तथाकथित जाणता राजांनी लोकांची घरे फोडली, पण आज त्यांचंच घर फुटले, असा टोला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शरद पवारांचे नाव न घेता लगावला. ते पुढे म्हणाले, देवाच्या दारात हे कर्म फेडावंच लागतं, असे म्हणत पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. दरम्यान, शरद पवारांना कार्यकर्त्यांकडून जाणता राजा संबोधल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय स्थित्यंतरे पाहावयास मिळण्याची शक्यता आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून लोकसभेसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाकडून आतापर्यंत २० जणांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांनंतर आता भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे.
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आता शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. शरद पवारांनी लोकांची घरे फोडली त्यामुळे आज त्यांचा राष्ट्रवादी पक्ष फुटला आहे. मंत्री विखे-पाटील यांनी शरद पवारांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. पण आज, त्यांचंच घर फुटलं असून देवाच्या दारात हे फेडावंच लागतं, असेही विखे-पाटलांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी करत राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडवून आणला होता. या बंडखोरीनंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट राज्यात निर्माण झाले. सद्यस्थितीत अजित पवार गट सत्तेत सहभागी झालेला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारासंह इतर आमदारांच्या पाठबळावर राष्ट्रवादी पक्षावर दावा ठोकला आहे.