महाविकास आघाडीची वंचितला ऑफर; प्रकाश आंबेडकरांनी निर्णय कळवावा- संजय राऊत

महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला ४ जागांचा प्रस्ताव दिल्याची माहीती संजय राउत यांनी दिली आहे.

    15-Mar-2024
Total Views |

mahavikas

मुंबई : महाविकास आघाडीने वंचित बहुजन ( Vanchit Bahujan Aaghadi ) आघाडीला ४ जागांचा प्रस्ताव दिल्याची माहीती संजय राउत यांनी दिली आहे. देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु झाली आहे. भाजपने आत्तापर्यंत उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. भाजपने महाराष्ट्रात लोकसभेसाठी २० उमेदवारांची घोषणा केली आहे. महायुतीच्या जागा आणि उमेदवार सोमवारपर्यंत जाहीर होतील असंही शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
 
दुसरीकडे महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा मात्र सुटलेला नाही. त्यात महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेणार का हा तिढाही कायम आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी मविआकडे १२ जागांची मागणी केली होती. त्यावर महाविकास आघाडीची चर्चा सुरु होती.
काही दिवसांपुर्वी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी वंचितला पाच जागा देण्याची तयारी आहे असं म्हटलं होतं. आता उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी या विषयी महाविकास आघाडीचं मत स्पष्ट केलं आहे. वंचित बहुजन आघाडीला चार जागा देण्याची तयारी आहे. त्यावर त्यांनी निर्णय कळवावा असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
 
महाविकास आघाडीत येण्यासाठी वंचितने १२-१२-१२-१२ अशा फॉर्म्युलाची मागणी केली होती. पण महाविकास आघाडीने त्यांना आता चार जागा देण्याची तयारी दाखविली आहे. आता प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
 
वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेनंतर ही त्यांनी दुसरी लोकसभा निवडणुक असणार आहे. वंचितचे मागिल निवडणुकीत खासदार निवडुण आले नसले तरी महाराष्ट्रातील मतांपैकी सहा टक्के मते या पक्षाने घेतली होती. त्यामुळे जय पराजयाच्या निर्णयात वंचितची भुमिका महत्वाची ठरु शकते.