एसटी महामंडळ 'एलएनजी'चा वापर करणारी पहिलीच बससेवा!, 'एलएनजी' नेमकं काय?
15-Mar-2024
Total Views |
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या ताफ्यातील बसेसचे एलएनजीमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. एलएनजीमध्ये रुपांतरित केलेली एसटी महामंडळ ही देशभरातील पहिलीच बससेवा ठरली आहे. या एलएनजीच्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील पर्यावरणासह हातभार लागणार आहे. तसेच, इंधनावरील खर्चदेखील कमी होणार आहे.
दरम्यान, डिझेलच्या तुलनेत एलएनजीच्या वापरामुळे पर्यावरणपूरक तसेच, डिझेल इंधनावरील खर्चदेखील कमी होण्यास मदत मिळणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या एलएनजी बसचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी बस उद्घाटनाबरोबरच त्यांनी या बसची पाहणीदेखील यावेळी केली आहे.
या उद्घाटनादरम्यान, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, खासदार हेमंत पाटील, आमदार संजय रायमूलकर, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर उपस्थित होते.
एलएनजी इंधन म्हणजे काय?
(एलएनजी)द्रवीकृत नैसर्गिक वायू हा मिथेन या नैसर्गिक वायूपासून बनविला जातो. सदर वायू द्रवीकरण प्रकल्पापर्यंत आणला जातो. व तेथून हा वायू द्रवरूपात बदलला जातो. त्याचबरोबर, या नैसर्गिक वायूचा आकारमान कमी झाल्याने त्याची साठवणूक व वाहतूक खर्च कमी होतो. विशेष म्हणजे एलएनजी वायू पर्यावरणपूरक असून डिझेल, पेट्रोल यांसारख्या इंधनाच्या तुलनेत सदर वायूच्या वापराने पैशांची बचत होण्यास मदत होते.