छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित कादंबरीविषयी..

    11-Mar-2024   
Total Views |

sambhaji  
 
एखादी व्यक्ती शूर असते, बुद्धिमान असते आणि सुस्वभावीही असते. पण तरीही ती जर मुत्सद्दी नसेल तर या सर्व गुणांचा फायदा राजकारणात करता येतो का? संस्कृतची उत्तम जाण, कलावंत मित्रमंडळी, सर्वगुणसंपन्न अशी सहचारिणी, पहाडासारखा बाप आणि साक्षात देवी अशी आजी. हो, आईविना पोराला या जवळच्या माणसांकडून निरतिशय प्रेम मिळालं. राजपुत्र होता तो, आपल्याला शोभेल असा युवराजासारखाच राहिला, कलेचा भोक्ता आणि गाढ विद्वान. न्याय्यी वृत्ती तर नसानसात भरलेली. मला संभाजी समजला तो विश्वास पाटील यांच्या कादंबरीतून. संभाजी महाराजांविषयी हा व्हिडीओ नाहीये, विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या कादंबरीविषयी आहे. तसे शिवाजी सावंत यांनी लिहिलेले चव सुद्धा उत्तम आहे. संभाजी या कादंबरीची निवड मी जाणीवपूर्वक केलीये. आज छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी आणि त्यानिमित्ताने या कादंबरीतील खुबीने केलेली मांडणी आणि हृदयाला घातलेला हात, वाखाणण्याजोगंच!
 
स्वराज्याचे दुसरे छत्रपती. अत्यंत संवेदनशील आणि तेवढेच स्पष्टवक्ते व कठोर. साम दाम दंड भेद वडिलांकडून जसेच्या तसे उचलले पण माणसे जोपासायचे कसब? आपण म्हणतो न्यायव्यवस्था व राजकारण वेगळे ठेवावे हे खरेच आहे. या दोन गोष्टी एकमेकांस पूरक आहेत पण त्या जेव्हा एका हातात येतात तेव्हा बाह्य आघाड्यांसोबतच आंतरआघाड्यांवरही लढत द्यावी लागते. हे मसले नाजूक. केवळ प्रेमाच्या जीवावर जपता येत नाही. राज्याभिषेकानंतर सलग ८ वर्षे मुघल सत्तेशी त्यांनी निकराचा लढा दिला. धर्माच्या बाजूने अखेरपर्यंत राहिले. हींदुत्वासाठी त्यांनी आपला जीव कुर्बान केला. उंच ध्येयासक्ती असेल तर मानसिक त्रासाने काहीही फरक पडत नाही माणसाला. पण शारीरिक त्रासाचे काय? जीभ छाटून तळपत्या सळईने डोळे जाळणे हे अमानुष हाल स्वतःच्या शरीराचेक सहन करावे त्या राजाने? केवळ धर्मासाठी. आपल्या वडिलांनी जो हिंदू संघटित केला, जे हिंदवी स्वराज्याच्या स्वप्न पाहिलं, त्या आपल्या प्राणप्रिय पित्याची अवहेलना कसा करू धजेल हा पुत्र? संभाजी राजे गादीवर होते त्या काळात औरंगजेबाच्या नेतृत्वाखालील मुघल सैन्याने मराठा किल्ल्यापैकी एकही कब्जा केला नाही. जेव्हा शंभूला पकडण्यात आले आणि त्याची हत्या करण्यात आली तेव्हा ते फक्त 32 वर्षांचे होते.
 
खरेतर हे संभाजींचे एक काल्पनिक चरित्र आहे, जे त्यांच्या जन्म, प्रेम आणि राज्याभिषेकाच्या लढाईपासून ते मृत्यूपर्यंतच्या प्रवासात एक निरीक्षकाचा दृष्टिकोन मांडते. संभाजी महाराज आणि त्यांचे जीवन मनातून मनाच्या डोळ्यांनी पाहण्यास मदत होते. वडिलांच्या स्वप्नाचा सन्मान करण्याचा त्यांचा संकल्प. पाहून आपण प्रभावित होतो. खरेतर इतिहास हा जसच्या तास लिहावा असं अट्टाहास आपल्या बरेचदा पाहायलामिळतो आणि म्हणूनच एतिहासिक लेखन बऱ्याचदा वादाच्या भोवऱ्यात सापडतं. परंतु आपल्याला हे लक्षात येत नाही की एखादी घटना त्या ठिकाणी उपस्थित असलेली दोन माणसे वेग्वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. तर इतिहास साच्यात बसवल्यासारखाकसा लिहिला जाईल? बरे, तसे करायचे ठरवलेच तरीही एक मोठा परिप्रेक्ष्य आपण गमावून बसतो. उपलब्ध कागदपत्र आणि दस्तऐवज संपूर्ण माहितीउपलब्ध करूच शकत नाही. अशावेळी कादंबरी विविध आयामातून एका व्यक्तिरेखेला स्पर्श करू शकते. या कादंबरीचे कथानकाचा मुळात गोदेच्या घटनेपासून सुरु होते. स्त्रीदाक्षिण्य राजाकडे कसे असावे हे शंभू राजांकडूनच शिकला होता तेव्हा त्यात नवल काही नाही. पण तरीही या कादंबरीचे समाजमनावर परिणाम काय आहेत?
 
विश्वास पाटलांना एखादी व्यक्तिरेखा उत्तम रंगवता येते. ती खुलायला हवी या तीव्र इच्छेतून ते त्या व्यक्तिरेखेचा अभ्यास करतात आणि जीव ओतून त्या व्यक्तिमत्वाला मांडतात. पुस्तकाचा जसजसा शेवट जवळ येतो, तसे आपण या चरित्राशी किती एकरूप झालोय हे आपल्याला समजते. एकेका शब्दागणिक वेदना आपल्याला दंश करत असतात. ही किमया केवळ लेखकाची. जो लेखक आपल्याला एखाद्या न पाहिलेल्या, काळाच्याही फार मागच्या भूमिकेशी इतके बांधून ठेऊ शकतो, हसवू शकतो राबवू शकतो तो लेखक म्हणजे एक मनस्वी कलाकार. त्याच्या प्रतिभेला मोजदाद नाही, तिचे मूल्यमापन करायच्या भानगाडीतही आपण पडू नये.
यातून आपल्याला शिवाजी महाराज नेमके कसे होते हे सांगता येत नाही मात्र त्यांच्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन मात्र आपल्या लक्षात येतो.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.