१३० लोकांसमोर निर्वस्र परेड; केरळमध्ये डाव्या संघटनेच्या अमानुषपणामुळे 'सिद्धार्थन'चा मुत्यू
10-Mar-2024
Total Views | 1445
कोची : फेब्रुवारी महिन्यात केरळमधील वायनाड येथील मेडिकल कॉलेजमधील जेएस सिद्धार्थन या विद्यार्थ्याच्या मृत्यूबाबत नवीन खुलासे समोर आले आहेत. वसतिगृहात रॅगिंगदरम्यान अत्याचार झाल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या रॅगिंगमध्ये डाव्या विचारसरणीची विद्यार्थी संघटना एसएफआयच्या गुंडांचाही समावेश होता. आता याप्रकरणी अँटी रॅगिंग समितीचा अहवाल आला आहे.
समितीच्या अहवालात असे म्हटले आहे की सिद्धार्थन दि. १५ फेब्रुवारी २०२४ रोजी कॉलेजमधून घराकडे निघाला होता. मात्र, त्याला पुन्हा वसतिगृहात बोलावण्यात आले. दि. १६ फेब्रुवारीला सकाळी सिद्धार्थन वसतिगृहात परतला. यानंतर अत्याचाराचा टप्पा सुरू झाला. इतर हल्लेखोर विद्यार्थ्यांनी त्याला महाविद्यालयाजवळील एका टेकडीवर नेले आणि तेथे त्याला अमानुष मारहाण करण्यात आली असे अहवालात म्हटले आहे.
वायर, बेल्ट आणि तत्सम वस्तूंचा वापर करून त्याला मारहाण करण्यात आली. यानंतर त्याला पुन्हा पकडून वसतिगृहात आणण्यात आले. येथे खोली क्रमांक २१ मध्ये त्याच्यावर पुन्हा अत्याचार करण्यात आला. त्याच्या पोटात आणि पाठीवर ठोसे मारण्यात आले. अनेक विद्यार्थी त्यांना बराच वेळ मारहाण करत राहिले. त्यानंतर सिद्धार्थनला जाहीर माफी मागण्यास सांगण्यात आले. सिद्धार्थनवर एका मुलीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप होता.
सिद्धार्थनला अंडरवेअरमध्ये हॉस्टेलमध्ये आणण्यात आले आणि सर्वांसमोर माफी मागायला लावली. यानंतर त्यांच्या वसतिगृहात परेड काढण्यात आली. या परेडदरम्यानही त्याच्यावर हल्ला झाला आणि छळ सुरूच होता. सर्वांच्या मध्येच सिद्धार्थनला मारहाण झाली. यानंतर सिद्धार्थनला पुन्हा वसतिगृहात आणून त्याच्यावर अत्याचार केला.
सिद्धार्थनला एवढी मारहाण झाली की त्याच्या पोटात दुखू लागले. त्याची तपासणी करून काही विद्यार्थ्यांनी त्याला औषध दिले. सिद्धार्थनला जेवणही दिले जात नसल्याचे सांगण्यात आले. यानंतर दि. १८ फेब्रुवारीला सिद्धार्थनचा मृतदेह बाथरूममध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. याची माहितीही डीनला देण्यात आली. यावर कारवाई करण्याऐवजी कॉलेज व वसतिगृह प्रशासनाने प्रकरण लपविण्याचा प्रयत्न केला.
समितीच्या अहवालात १३० विद्यार्थ्यांनी सिद्धार्थनवर अत्याचार होत असल्याचे पाहिले. याप्रकरणी ९७ विद्यार्थी व शिक्षक समितीसमोर हजर झाले. मात्र, अनेकजण संपूर्ण माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी शिंजो जॉन्सन असून त्याने सिद्धार्थनचा सर्वाधिक छळ केला. या प्रकरणी १८ विद्यार्थ्यांना आरोपी करण्यात आले होते. हे सर्वजण पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यापैकी काही डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनेचे सदस्य होते.
सिद्धार्थनच्या वडिलांचे म्हणणे आहे की, त्यांच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांवर कारवाई न करण्याचा आरोपही त्यांनी केला. सिद्धार्थनच्या पालकांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचीही भेट घेतली. त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. मात्र, त्यांनी राज्य पोलिस कारवाई करत आहे, असे सांगितले.