काँग्रेसचे ७ आणि शरद पवार गटाचे २ आमदार अजितदादांच्या संपर्कात?

    22-Feb-2024
Total Views | 91

Pawar & Patole


मुंबई :
काँग्रेसचे ७ आमदार आणि शरद पवार गटाचे ५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केला आहे. तसेच लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचेही ते म्हणाले. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
 
अमोल मिटकरी म्हणाले की, "काँग्रेसचे आणि शरद पवार गटाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. लोकसभेच्या पुर्वी त्यांचे प्रवेश होतील. काँग्रेसचे सात आमदार आणि शरद पवार गटाचे पाच आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे लोकसभेपुर्वी महाभुकंप होणार असून लवकरच काँग्रेस आणि शरद पवार गटातील काही लोकं अजितदादांच्या नेतृत्वात काम करताना दिसतील."
 
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांना पक्षात घेण्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, "जाणीवपुर्वक हा संभ्रम निर्माण केला जात आहे. अनिल पवार यांचं नाव मी पहिल्यांदाच ऐकलं. अनेक वर्षांपासून सुनिल तटकरे हेच लोकसभेचं प्रतिनिधित्व करत आहेत. याशिवाय युगेंद्र पवार हे नावदेखील मी पहिल्यांदाच ऐकलं आहे. पण त्यांची आम्हाला काही अडचण असण्याचं कारण नाही. तिकडच्या गटात बालमित्र मंडळाच्या अध्यक्षांसाठी ही सावध घंटा आहे. त्यांना जे वाटतंय की, आपण अजितदादा होऊ पण त्यांना काऊंटर करायला पवार साहेबांनीच एक युगेंद्र पवार आणून ठेवला आहे. त्यामुळे त्यांनी जास्त हवेत जाऊ नये. कितीही युगेंद्र, जोगेंद्र आले तरी काहीही फरक पडणार नाही," असेही ते म्हणाले.
 
तसेच पवार परिवारात वितुष्ट निर्माण करण्याचं काम मुंब्रा कळव्यातून सुरु आहे. जितेंद्र आव्हाडच याचे मास्टरमाईंड आहेत. त्यामुळे घरफोडीचे काम करणाऱ्यांपासून सावध राहायला हवं, असे म्हणत त्यांनी आव्हांडांवर निशाणा साधला.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121