अखेर मराठी भाषेत ‘छत्रपती संभाजी’ चित्रपट प्रदर्शित होणार

    01-Feb-2024
Total Views | 86


sambhaji  
 
मुंबई : बहुप्रतिक्षित ‘छत्रपती संभाजी’ चित्रपट गेली अनेक वर्ष रखडला आहे. २६ जानेवारी २०१४ रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत अडकल्यामुळे नियोजित तारखेला प्रदर्शित होऊ शकला नाही. चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश दुलगज यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेत या प्रकरणाची माहिती दिली. सेन्सॉर बोर्डाने प्रदर्शनाची तारीख उलटून गेली तरीही प्रमाणपत्र दिले नसल्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, अखेर अथक परिश्रमांनंतर मराठीत 'छत्रपती संभाजी' हा चित्रपट २ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.
 
'छत्रपती संभाजी' हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत अडकण्यासाठी प्रादेशिक सीबीएफसी अधिकारी सय्यद रबीहाश्मी जबाबदार होते. कारण त्यांनी चित्रपटात औरंगजेबाविरुद्ध ज्या घटना, इतिहास दाखवला आहे त्याचा लेखी पुरावा मागितला असून असा दावा केला होता की चित्रपटात ऐतिहासिक घटनांमध्ये चुकीचे चित्रण करण्यात आले आहे. यावर उत्तर देत असताना भाजप नेते नितेश राणे पत्रकार परिषदेत म्हणाले होते की, सेन्सॉर बोर्ड, एम.एस.सी.बी अशा बऱ्याच ठिकाणी जिहादी विचारसरणीची लोकं आहेत. आणि आता या सगळ्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. परंतु, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित कोणताही चित्रपट तयार होत असेल तर त्यामागे आम्ही खंबीरपणे उभे राहू आणि या जिहादींना कसे ठेचायचे ते आम्हाला चांगल्यापद्धतीने ठाऊक आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आम्ही ताकद लावू, असा विश्वास नितेश राणे यांनी निर्माते आणि दिग्दर्शकांना यावेळी दिला.
 
काय म्हणाले दिग्दर्शक? 
 
“छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाला सेन्सॉर बोर्डाची अग्निपरीक्षा द्यावी लागत आहे की अतिशय दु:खद बाब आहे. आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाने इस्लाम कबूल करण्यास सांगितल्याचे चित्रपटातील दृष्य काढून टाकण्यास सांगितले होते, परंतु, हा सत्य इतिहास असून तो सर्वांना कळलाच पाहिजे या मतांचे आम्ही असल्यामुळे आम्ही यासाठी नकार दिला. तसेच, आम्ही संबंधित सर्व पुरावे सादर केले असूनही जाणूनबुजून आम्हाला प्रमाणपत्र देण्यास अडवणूक केली जात आहे. तुर्तास मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सेन्सॉरचे प्रमाणपत्र मिळाले आहे. परंतु अजूनही हिंदी चित्रपटाचे प्रमाणपत्र देण्यात आले नाही याची खंत असून त्यासाठी आमचा लढा सुरुच राहणार आहे.”
 
काय आहे प्रकरण?
 
‘छत्रपती संभाजी’ या चित्रपटात औरंगजेब आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यातील काही घटना दाखवण्यात आल्या आहेत. या दृष्याबाबतचे प्रादेशिक अधिकारी सय्यद रबीहाश्मी यांनी लेखी पुरावे मागितले. दुलगज यांनी इतिहासकारांची पत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर केली. सर्व कागदपत्रे सादर करुनही प्रमाणपत्र वेळेत देण्यात आले नसल्यामुळे नियोजित प्रदर्शनाची तारीख हुकली होती.
 
मात्र, आता अथक परिश्रमांनंतर मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र देऊ केले आहे. त्यामुळे मराठीत हा चित्रपट २ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित होत आहे. २०१४ साली मराठी आणि हिंदी भाषेत तयार होणाऱ्या छत्रपती संभाजी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. मराठीसह हा चित्रपट हिंदी भाषेतही प्रदर्शित केला जाणार होता, परंतु, हिंदीच्या प्रदर्शनासाठी सेन्स़ॉर बोर्डाचे प्रमाणपत्र न मिळाल्याने हिंदीतील प्रदर्शनाची अडचण निर्माण झाली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121