बोट अपघातातील मृत व्यक्तींना योग्य ती मदत करण्यात येईल!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
18-Dec-2024
Total Views | 46
नागपूर : नीलकमल बोट अपघातातील ( Boat Accident ) जखमी आणि मृत व्यक्तींना योग्य ती मदत करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे. बुधवार, १८ डिसेंबर रोजी एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल बोटीचा अपघात घडला असून यात आतापर्यंत एकाचा मृत्यू आणि ५ जण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.
हिवाळी अधिवेशनादरम्यान, सुरुवातील उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करत अपघातातील मृतांना सरकारकडून मदत करण्याची मागणी केली. त्यानंतर भाजप आमदार महेश बालदी यांनीदेखील हा मुद्दा उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले.
यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मी अपघाताचा व्हिडीओ पाहिला आहे. ती बोट अतिशय वेगाने आली असून बहुतेक तिचा कंट्रोल गेला आणि तिने प्रवाशी बोटीला धडक दिली. या दुर्घटनेतील किती लोक गहाळ झाले याचा आकडा लक्षात येत नाही. पण अंदाजे ७ ते ८ असा हा आकडा आहे. काही लोक पर्यटक असतात आणि ते बाहेरचे असतात. त्यामुळे यासंदर्भात ठामपणे सांगण्यास थोडा वेळ लागतो. सुदैवाने अपघात स्थळावर योग्य वेळी मदत पोहोचल्याने अनेक लोकांना वाचवता आले आहे. काही लोक अजूनही सापडलेले नाहीत. पण निश्चितपणे जखमी आणि मृत व्यक्तींना योग्य ती मदत केली जाईल," असे आश्वासन त्यांनी दिले.
बचावकार्यासाठी सर्व यंत्रणा तैनात करण्याचे आदेश!
एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या बोटीचा अपघात घडल्याचे वृत्त प्राप्त झाले. नौदल, कोस्टगार्ड, पोर्ट, पोलिस पथकच्या बोटी तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. जिल्हा आणि पोलिस प्रशासनाशी सातत्याने आम्ही संपर्कात असून, सुदैवाने बहुसंख्य नागरिकांना वाचविण्यात आले आहे. तथापि अजूनही बचावकार्य सुरू आहे. बचावकार्यासाठी सर्व त्या यंत्रणा तैनात करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.