‘पुष्पा २’चा बॉक्स ऑफिसवर धमाका! जगभरात १४०० कोटींहून अधिक कमाईचा केला रेकॉर्ड
17-Dec-2024
Total Views | 64
मुंबई : अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ चित्रपटाने सध्या प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळवला असून त्याचा सकारात्मक परिणाम बॉक्स ऑफिसवर दिसून येतो आहे. ५ डिसेंबर २०२४ रोजी देश आणि जगभरात प्रदर्शित झालेल्या पुष्पा २ चित्रपटाने १२ दिवसांमध्ये जगभरात १४०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.
‘पुष्पा २’ चित्रपट २०२४ या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. ‘पुष्पा २’ने इतर भाषांपेक्षा हिंदीत जास्त कमाई केली असून तेलुगू भाषेपेक्षाही चित्रपटाची हिंदीतील कमाई अधिक आहे. सोमवारी १६ डिसेंबर २०२४ रोजी चित्रपटाने भारतात २७.७५ कोटी रुपयांची कमाई केली असून यापैकी हिंदी भाषेतील कमाई २१ कोटी इतकी आहे.
सॅकनिल्कच्या वृत्तानुसार, पुष्पा २ चे भारतातील १२ दिवसांचे एकूण कलेक्शन ९२९.९५ कोटी असून यापैकी हिंदी भाषेत चित्रपटाने ५७३.१ कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर तेलुगू भाषेत १२ दिवसांत २८७.०७ कोटी कमावले आहेत. या चित्रपटाने जगभरात १४०१ कोटींची कमाई केली आहे.
सुकुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पुष्पा २’ चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानासह मल्याळम अभिनेता फहाद फासिल महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘पुष्पा २’ हा अल्लू अर्जुनच्या २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा: द राइज’चा सिक्वेल असून या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.