शमीम खान यांच्या खोट्या, तथ्यहीन आरोपांची चौकशी करा : नजीब मुल्ला
16-Nov-2024
Total Views | 54
1
ठाणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून गलिच्छ राजकारण सुरू झाले आहे. जितेंद्र आव्हाड समर्थक शमीम खान यांनी मुंब्रा-कळवाचे राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला ( Najeeb Mulla ) यांच्या विरोधात केलेल्या बदनामीकारक, खोट्या आणि तथ्यहीन आरोप केले होते. याची चौकशी करण्याची मागणी नजीब मुल्ला यांनी परिमंडळ-१ चे ठाणे पोलीस उपायुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे मुंब्रा परिसरातील पदाधिकारी शमीम खान यांनी, बुधवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्रकार परिषदेत मुल्ला यांच्यावर अनेक बदनामीकारक, खोटे व तथ्यहीन आरोप केले. यात, ‘नजीब मुल्ला मुझे दुबईसे फोन करवाता है, मुझे ईडी की धमकी देता है, मेरे साथ कोई हादसा होता है, या मुझे मार दिया जाता है, तो इसका जिम्मेदार नजीब मुल्ला होगा’, अशा प्रकारचे जाहीर वक्तव्य शमीम खान यांनी माध्यमांसमोर बोलताना केले होते. शमीम खान यांनी केलेल्या बदनामीकारक, खोटे व तथ्यहीन आरोपांचे प्रकरण अतिशय गंभीर स्वरुपाचे असून संबंधित प्रकरणी सखोल चौकशी करावी. तसेच शमीम खान यांना आलेले फोन कॉल्स तसेच त्यांचे सर्व कॉल डिटेल्स तपासून याबाबत तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नजीब मुल्ला यांनी पोलीस उपायुक्त यांच्याकडे केली आहे.