ठाणे : “नगरसेवकाने काम केले तरी बोर्ड आमदाराचा, असे कारनामे येथील आमदाराने केले. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून तब्बल साडेतीन हजार कोटींचा निधी दिला. मात्र तरीही निधी मिळाला नसल्याची बोंब मारतो. तेव्हा, नजीब मुल्ला हा कोकणी पोरगा मराठी आहे. त्यालाच बहुमताने निवडून देत येथील बंटीची (जितेंद्र आव्हाड) ‘घंटी’ वाजवायची आहे,” असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी व्यक्त केला.
मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारार्थ कळवा नाका येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेला मुख्यमंत्री शिंदे यांनी संबोधित केले. यावेळी खा. नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, दशरथ पाटील, खासदार आनंद परांजपे, राजन किणे, उमेदवार नजीब मुल्ला तसेच राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, रिपाईचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “धर्मवीर आनंद दिघेंचा बालेकिल्ला म्हणजे ठाणे जिल्हा आहे. ठाणे महापालिका गाजवणार्या नजीब मुल्ला या उमेदवाराला घड्याळ या चिन्हाचे दोन नंबरचे बटण दाबून आता विधानसभा गाजवण्यासाठी पाठवायचा आहे. निधीची कमतरता पडू देणार नाही,” अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. यावेळी नजीब मुल्ला यांच्या जाहिरनाम्याचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.