मुख्यमंत्र्यांचा विश्वास सार्थ ठरविणार : राजेश मोरे
14-Nov-2024
Total Views | 14
डोंबिवली : (Rajesh More) डोंबिवलीचे शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांना येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीतर्फे कल्याण ग्रामीण मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. निवडणुकीच्या रिंगणात तेरा उमेदवार असले, तरी विद्यमान आ. राजू पाटील आणि माजी आ. सुभाष भोईर यांच्याशी मोरे यांची थेट लढत असल्याचे मानले जात आहे. आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेची उमेदवारी दिली आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठरविणार असल्याचे मोरे यांनी सांगितले. समोर तुल्यबळ उमेदवाद असताना राजेश मोरे येत्या विधानसभेच्या निवडणुकीला कसे सामोरे जातात, याबाबत दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या प्रतिनिधीशी त्यांनी साधलेला संवाद.
आपण पहिल्यांदाच विधानसभा लढवत आहात. समोर आजी-माजी आमदार रिंगणात आहेत, काय सांगाल?
- कल्याण ग्रामीणमध्ये माझ्यासमोर दहा वर्षांपूर्वी निवडून आलेले आणि पाच वर्षांपूर्वी निवडून आलेले आमदार आहेत. कल्याण ग्रामीण भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. हा विभाग धर्मवीर आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे इथे कोण आमदार आहेत? ते काय करतात? यापेक्षा हा आमचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते पूर्ण ताकदीनिशी हा मतदारसंघ जिंकण्याचा प्रयत्न करीत आहेत.
या निवडणुकीत तुम्ही कोणते मुद्दे घेऊन मतदारांसमोर जात आहात?
- प्रत्येक मतदारसंघात काहीना काही प्रश्न असतात. कल्याण ग्रामीण मतदारसंघात दिवा हा दाट लोकवस्तीचा विभाग आहे. दिवा स्थानकातून सकाळी मुंबईला कामावर जाणार्या लाखो चाकरमान्यांसाठी दिवा ते सीएसएमटी लोकल सुरू करण्याची माझी पहिली मागणी असणार आहे. त्यामुळे दिवावासियांना प्रवासात दिलासा मिळेल. कोकण रेल्वे मार्गावर दिवा किंवा दातीवली स्थानकात थांबा मिळावा, हीदेखील माझी प्रमुख मागणी असणार आहे.
कल्याण ग्रामीणमध्ये प्रामुख्याने कोणत्या समस्या आहेत? त्यावर तुमचा काय प्लॅन आहे?
-‘अमृत योजने’च्या माध्यमातून या मतदारसंघात पाण्याच्या टाक्या, पाईपलाईनचे काम सुरू आहे. याच्या नियोजनात थोडे व्यत्यय आल्याने या भागात पाणीटंचाई निर्माण झाली होती. पुढील वर्षी मार्च महिन्याअखेर या योजनेचे काम पूर्ण होईल. रस्ते, पथदिवे, वीज, पायाभूत सुविधांची जी कामे अपूर्ण आहेत, ती मी सर्वात आधी पूर्ण करणार.
या मुलाखतीच्या माध्यमातून मतदारांना काय आवाहन कराल?
- एका सामान्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्री आणि खासदार साहेबांनी उमेदवारी दिली आहे. मी कधीही नेतेगीरी केली नाही. मी बंगल्यात राहत नाही. २४ तास जनतेसाठी माझा फोन सुरू असतो. एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आम्ही शिंदेसाहेबांच्या आदेशावर काम करीत आलो. शासनाच्या माध्यमातून आलेल्या योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याची मी मतदारांना ग्वाही देतो. येत्या दि. २० नोव्हेंबर रोजी धनुष्य बाण या चिन्हाचे बटण दाबून मला निवडून द्या, ही नम्र विनंती मी मतदारांना करतो.
जनतेने आमदार म्हणून निवडून दिल्यास आपले व्हिजन काय असणार आहे?
- कल्याण ग्रामीणचे मतदार मला निवडून देतील, अशी मला आशा आहे. मुख्यमंत्री आणि खासदारांनी केलेली विकासकामे, जनतेसाठी अहोरात्र कष्ट करून उपलब्ध असणारा आमचा पक्ष आहे. निवडणूक आली म्हणून कामे करायची, ही आमची पद्धत नाही. माझ्यावर प्रचंड विश्वास ठेवून मुख्यमंत्र्यांनी मला उमेदवारी दिली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मी चार वेळा दत्तनगर भागातून नगरसेवक, तसेच माझी पत्नी भारती मोरे या दोन वेळा नगरसेविका राहिल्या आहेत. दिवा रेल्वेस्थानकाचे प्रश्न मी प्राधान्याने सोडविणार आहे. विभागातील सर्व प्रलंबित कामे पूर्ण करणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासारखे मोठे नेते आपल्या पाठीशी आहेत, निवडणुकीत याचा कसा फायदा होईल?
- राज्याचे कर्तव्य तत्पर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही कल्याण ग्रामीणमध्ये विजयाचा गुलाल उधळणार आहोत. त्यांनी या विभागात अनेक लोकोपयोगी कामे केली आहेत. शेतकरी, गोरगरीब जनता, समाजातील प्रत्येक घटकासाठी त्यांनी योजना आणल्या आहेत. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’च्या माध्यमातून लाडका भाऊ म्हणून मुख्यमंत्री घराघरात पोहोचले आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘तीर्थयात्रा योजने’तून त्यांना आशीर्वाद मिळत आहेत.