मिठी नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता; काय म्हणाले मंत्री आशिष शेलार?

    19-Aug-2025
Total Views |


मुंबई : गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले असून नागरिकांचे अतोनात हाल होत आहे. अशातच मुंबईतील मिठी नदी लवकरच धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, पालकमंत्री आशिष शेलार यांनी या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

मंत्री आशिष शेलार माध्मांशी बोलताना म्हणाले की, "मध्य आणि पश्चिम रेल्वे, मुंबई महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अन्य सर्व यंत्रणांच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. वारा आणि पाऊस मोठ्या प्रमाणात असून वेधशाळेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यानुसार नागरिकांपर्यंत सर्व यंत्रणा पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. मिठी नदीच्या पातळीवर लक्ष ठेवून आहोत. धोक्याची परिस्थिती निर्माण झाल्यावर तिथल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची सोयीचा आढावा घेतला आहे. नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये. मुंबई उपनगरातील सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन नागरिकांच्या आणि प्रशासनाच्या सहकार्यातून कुठलीच अप्रिय घटना घडू नये, यादृष्टीने सूचना आणि निर्देश दिले आहेत."

"मिठी नदीचे रुंदीकरण, खोलीकरण आणि गाळ काढण्यासंदर्भात गेल्या कित्येक वर्षात जे काही घडले त्याबद्दल चौकशी सुरु आहे. आज मुंबईकरांना कुठलीही अडचण आणि त्रास होणार नाही याकडे आमचे जास्त लक्ष आहे. मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी बोललो आहे. त्यामुळे सगळ्या यंत्रणा चोखपणे काम करतात का, याची पाहणी आपण करतो आहोत. मुंबई उपनगर आणि मुंबई शहरात नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी मी सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे," असेही त्यांनी सांगितले.

...तर राऊतांचे दात त्यांच्याच घशात जातील
"कुणी कुणाला काय पत्र लिहावे हा त्याचा अधिकार आहे. संविधानाने प्रत्येकाला तक्रार करण्याचा अधिकारही दिला आहे. पण बोलताना, लिहिताना आणि तक्रार करताना त्यात तथ्य, सत्य आणि माहितीच्या आधारे लिहिले पाहिजे. त्यांनी त्या प्रकरणातील सगळी माहिती घेऊन बोलावे. त्या पत्रात पंतप्रधान किंवा अमित शाह यांचा उल्लेख करताना संजय राऊत अतिशय हुशारीने कुणाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांचेच दात त्यांच्या घशात जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या कर्तुत्वाने देशात स्वच्छ कारभाराचा प्रत्यय सर्वांनी पाहिला आहे. त्यात चलाखीने स्वत:ची बुद्धी निर्बुद्धपणे वापरून संजय राऊतांनी अमित शाह यांचा उल्लेख करणे टाळावे. अशा गोष्टींवर जनता विश्वास ठेवत नाही," असेही मंत्री आशिष शेलार म्हणाले.